…कारण कॅमेरा खोटं बोलत नाही !

…कारण कॅमेरा खोटं बोलत नाही !

…कारण कॅमेरा खोटं बोलत नाही !

पुलित्जर पुरस्कार 2020 मधल्या फीचर फोटोग्राफी ह्या विभागात असोसिएट प्रेसच्या (AP) चन्नी आनंद , मुख्तार खान आणि दार यासीन यांना काश्मीर मधील वर्तमान परिस्थितीच्या छायाचित्रणात्मक वार्तांकनासाठी पुलित्जर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर काश्मीर मधील लॉकडाऊनचे सलग नऊ महिने हा त्यांच्या फोटोग्राफीचा साधारण विषय होता.

पण आपल्या देशातील काही लोकांना ही गोष्ट रुचली नाही, आपल्या देशातील परिस्थिती जगासमोर मांडणे हा त्यांना देशद्रोह वाटू लागलाय. ह्या वादाने आणखीनच जोर धरला जेव्हा कॉग्रस नेते राहुल गांधीनी ह्या विजेत्यांचं अभिनंदन करणारं ट्विट केल. आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी राहुल गांधींवर तुटून पडली.

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार हे तिन्ही पत्रकार भारताची एक खराब प्रतिमा जागतिक पातळीवर निर्माण करु पहातायंत. वेगवेगळ्या चॅनलवरही ही बातमी चालू लागली की,भारताची प्रतिमा ह्या पत्रकारांनी खराब केलीय,ते देशद्रोही आहेत आणि राहुल गांधी हे अशा लोकांच्या पाठीमागे उभे आहेत.

भाजपचे संबित पात्रांनी तर राहुल गांधी कसे देशद्रोही आहेत अशा आशयाचा एक व्हिडीओच प्रसारित केला. त्यात ते सोनिया गांधी ह्यांना जाब विचारतायत की तुम्ही देशासोबत आहात की देशद्रोह्यांसोबत? अगदी नियोजनपूर्वक #Rahul_gandhi_gaddar_hai हा ट्रेंड चालू केला आणि पुलित्जर ही संस्था काश्मिरला भारताचा भाग मानतच नाही अशी अफवा पसरवली गेली.

आपल्या देशातलं भयान वास्तव पत्रकारांनी मांडलं तर ते देशद्रोही ठरतात ही गोष्ट खेदजनक आहे. उलट पत्रकारांनी अशा गोष्टी अधिक जोमाने समोर आणायला हव्यात. तडजोड मिडियाच्या ह्या काळात असे पत्रकार व्यवस्थेला पचवणं जड जातंय, ही गोष्ट ह्यातून आधोरेखित होते. तुमच्या गलिच्छ राजकारणामुळे काश्मिरच्या लोकांना काय समस्यांना तोंड द्यावं लागतंय हे तुमच्या गावीही नसतं आणि मग एखादा पत्रकार तिथली सत्य परिस्थिती जगासमोर आणू पहातो, तर त्याला देशद्रोही ठरवून मोकळे होतात.

कित्येक वर्षानंतर भारतात एक मानाचा पुरस्कार येणे हे भारतात पत्रकारिता जिवंत असल्याची साक्ष आहे. जगातल्या असंख्य पत्रकारांनी आपआपल्या देशातील व्यवस्थेने लादलेली परिस्थिती आणि त्यांचे भयाण परिणाम जगासमोर आणलेले आहेत. जगाच्या दुस-या कोप-यातून आलेले फोटो आपण आनंदाने चघळतो आणि त्यांना दोष लावतो की बघा तिकडे कसा अन्याय होतो. भारत कसा गुण्यागोविंदाने नांदतोय आणि आपल्या देशातून असं कोणी धाडस केलं की तो देशद्रोह ठरतो असा हा दुहेरी मापदंडाचा काळ आहे.

पत्रकारांनी सत्य जगासमोर आणलंच पाहिजे,देशाची प्रतिभा वगैरे असल्या रचलेल्या भाकडकथांना भिक न घालता त्यांनी सत्याचा शोध घेणे गरजेच आहे. व्यवस्थेच्या विरोधातला हा विवेकी आवाज अजून समृद्ध होणे गरजेचं आहे.विरोधकांना फार मनावर घेऊ नये. ह्या सत्तेतील लोकांनी न्यायाधीश मिडियासमोर आले, म्हणून त्यांनाही देशद्रोही असा शिक्का मारलेलाच होता.

तुमच्या अभिनंदनाचं ट्विट जसं ह्यांना पटकन दिसतं तस करोनाकाळात हजारो किलोमिटर पायपीट करणारे मजूर ह्यांना दिसत नाहीत. त्यांची घरी पोहचण्याची धडपड ह्यांना दिसत नाही. ह्यावरुन तुम्ही अंदाज बांधू शकता सत्ताधारी किती आंधळे आहेत,आणि आंधळ्या लोकांना फोटोज् मागचा खरा हेतू दिसेल अशी आशाही करु नये. पत्रकार, कलाकारांनी,साहित्यिक लोकांनी आपलं काम चालू ठेवावं.  देशाचं वास्तव अधिक जोमाने समोर आणावं. तथाकथित विकासाच्या भिंतीआड असलेला देश समोर आणावा

आजपर्यंत इतर देशातल्या पत्रकारांनी हे काम केलं. व्यवस्थेविरुद्ध सतत संघर्ष उभा केला. आता तीच गोष्ट भारतात होऊ लागलीय ही उद्याच्या भारतासाठी, इथल्या लोकशाहीसाठी आशादायक बाब आहे. ज्यांना हेतू समजून न घेता केवळ विरोध करायचाय ते आजही विरोध करतील आणि उद्याही ! हे लोक दुहेरी मापदंड लावणारे असतात हे वेळोवेळी सिद्ध होतं आलंय.

आणि विजेत्यांना देशद्रोही ठरवणा-यांनो-

१) वेगवेगळ्या देशातील कलाकाराने आपल्या आपल्या देशातील ब-याच गोष्टी जगासमोर आणल्यात ही काय पहिलीच वेळ नाही.

२) मलाला ने पाकिस्तानातील दहशदवाद आणि शिक्षण व्यवस्था आपल्या पुस्तकात मांडल्या ते आपल्याला चालून गेलं आणि पाकिस्तान कसा अत्याचार करतो ह्या साठी आपण मलालाचे दाखले आजही वापरतो.

३) Vietnam War चे परिणाम दाखवणारा जगप्रसिद्ध Napalm Girl हा फोटोही आपल्याला चालून गेला.

४)जर्मनीतील ज्युंच्या आत्याचार आणि होलोकॉस्टच वास्तव मांडणारी Anne frank ची डायरीही आपण दाखल्यासाठी वापरतो. आणि ह्या डायरीचे वेगवेगळ्या भाषेत भाषांतर करुन संपूर्ण देशभर ही डायरी वाचल्या गेलीय.

पण भारतात असं काही झालं की, लगेच देशद्रोह.
भारतातल्या कलाकारांनी देशातली परिस्थिती दाखवली की ते देशाविरुद्ध कृती ठरते. पण कोणाला काहीही वाटो…विजेत्यांचं अभिनंदन !!!


अंकुश हंबर्डे पाटील

लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे नांदेड जिल्हा समन्वयक आहेत.

MediaBharatNews

Related Posts
comments

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!