पुलवामा हल्ला आणि मोदींची जंगल सफारी !!!

पुलवामा हल्ला आणि मोदींची जंगल सफारी !!!

पुलवामा हल्ला आणि मोदींची जंगल सफारी !!!

नरेंद्र मोदी ही स्वतःच्याच प्रेमात असलेली व्यक्ती आहे. ते प्रेम इतकं आहे की त्यापुढे देशसुद्धा दुय्यम आहे. पुलवामा हल्ल्यावेळी ते दिसून आलं. प्रधानमंत्रीपदी बसलेली एखादी व्यक्ती आपल्या देशाप्रती किती असंवेदनशील बेफिकीर असावी, हे त्या दिवशी देशाने पाहिलं. अर्थात, पुढे जाऊन ते अधोरेखितही झालं. या कथित देशभक्त टोळीतील एक कथित पत्रकार अर्नब गोस्वामी याच्या अलिकडेच उघड झालेल्या चॅटमधून तर केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा भेसूर चेहरा समोर आलाय. पुलवामा हल्ला घडला दुपारी साडेतीनच्या सुमारास आणि मोदींचं पहिलं ट्वीट आलं, पावणेसातच्या सुमारास ! छोट्या मोठ्या घटनांत लागलीच ट्वीट करणारे मोदी तीन तास होते तरी कुठे, हा प्रश्न माझ्या मनात भिरभिरू लागला आणि तीन दिवस कित्येक बातम्या, माहितीचं संशोधन केल्यावर सगळा घटनाक्रम समोर आला. २० फेब्रुवारी, २०१९ रोजी तो मी फेसबुक पोस्ट द्वारे मांडला. तोच पुढे देत आहे.


 

भारताला हादरवणाऱ्या पुलवामा हल्ल्याने देशातलं वातावरण ढवळून निघालंय. आजवरचा हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला समजला जातो. गुरूवारी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा हल्ला झाला. मोदींनी ट्वीटरवर या हल्ल्याचा निषेध ६ वाजून ४६ मिनिटांनी केला. दरम्यानच्या तीन तासात मोदी कुठे होते, तर ते विश्वप्रसिध्द जिम काॅर्बेट राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी करत होते. तसेच डिस्कवरी चॅनलसोबत एका कार्यक्रमाची शुटींगमध्ये सहभागी होण्यात व्यस्त होते.

मोदींनी पावणे सात वाजता म्हणजेच हल्ल्यानंतर तब्बल सव्वातीन तासांनंतर घटनेवर दुःख व्यक्त केलं. तत्पूर्वी १७ मिनिटं आधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ६ वाजून २९ मिनिटांनी हल्ल्याबाबतच्या आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या. त्यांच्याही पूर्वी ६ वाजून ९ मिनिटांनी राहुल गांधींचं ट्वीट आलं होतं. मी हा संदर्भ घेऊन फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यावर मोदीप्रेमींनी माझ्यावर टीका केली. प्रथमदर्शनी ती टीका योग्यही वाटते. पण तिला तथ्याचा आधार नाही.

एका फेबु युजरने म्हटलंय की पीएम ट्वीट करण्याऐवजी माहिती घेण्यात, सूचना देण्यात व्यस्त असतील. ही शक्यताही नाकारता येत नाही. राहुल गांधी विरोधी पक्षात आहेत. ते रिकामटेकडे आहेत. त्यांच्याकडे ट्वीट करायला भरपूर वेळ आहे, पंतप्रधानांना अशा घटनेनंतर परिस्थिती हाताळण्यावर लक्ष केंद्रीत करायचं असतं, हे आपण गृहित धरायला हवं, असा त्या फेबुयुजरचा सूर होता.

पण खरंच प्रत्यक्षात तसंच घडत होतं का? मोदीप्रेमींनी मला त्याचा मागोवा घ्यायला प्रवृत्त केलं.

नितीशकुमार भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले, त्यांनी शपथ घेतानाच्या काही सेकंदानाच मोदींचं अभिनंदनाचं ट्वीट आलं. काल शिवसेना-भाजपा युती झाल्यानंतरही मोदींनी आवर्जून आनंदाचं ट्वीट केलं. कुठल्याही गोष्टींचा प्रपोगंडा करायची सवय झालेल्या प्रसिध्दीग्रस्त मोदींनी इतक्या मोठ्या घटनेवर लागलीच ट्वीट केलं नाही, हे मनाला पटत नाही. नक्कीच ते जबरदस्त व्यस्त असणार!!!!

ती व्यस्तता लोकांसमोर यायलाच हवी.

१४ फेब्रुवारीला मोदींची उत्तराखंड येथील रूद्रापूरमध्ये संध्याकाळी सभा होती. मोदी सकाळी ७ वाजताच डेहराडूनला पोचल्याचं गुगलसर्च सांगतं. डेहराडूनच्या जाॅली ग्रान्ट विमानतळावरून आकाशमार्गे रूद्रापूरपर्यंतचा प्रवास एक तासांचा आहे. मग मोदी सकाळीच डेहराडूनला का आले? कारण त्यांना जिम काॅर्बेटमध्ये डिस्कवरीसोबत शुटींगही करायचं होतं.

मोदींची जंगल सफारी नियोजित नव्हती, अशी सारवासारव आता प्रशासन करतंय. पण डेहराडूनहून वायुसेनेच्या MI – 17 या हेलिकॉप्टरने कालागढजवळील बिजनौर जिल्ह्यातील भिक्कावाला स्थित सेंट मेरी इंटर काॅलेजच्या प्रांगणात मोदींसाठी हेलिपॅड तयार होतं, म्हणजेच कार्यक्रम पूर्वनियोजित होता. हेलिपॅडवरून ते पुढे वाहनाने कालागढ व तिथून मोटारबोटने पश्मिमी रामगंगा नदीच्या मार्गाने ढिकाला येथे गेले.

जवळजवळ चार तास मोदी जिम काॅर्बेट पार्कमध्ये होते. संपूर्ण पार्कचं त्यांनी भ्रमण केलं. निसर्गसौंदर्य अनुभवलं. हरणं, हत्तीचे कळप पाहताना मोदी हरखून गेले. डिस्कवरी चॅनलसोबत मोटारबोटीतून नदीत मगरी पाहतानाचं शुटींग केलं. संध्याकाळ उशिरापर्यंत ते पार्कात होते.

धनवडी गेटमधून बाहेर पडताच झिंदाबादच्या घोषणांनी लोकांनी मोदींचं स्वागत केलं. सुंदरखाल, ढिकोली, रिंगोडा या मार्गाने रामनगर येथील पीडब्लुडीच्या रेस्ट हाऊसला येईपर्यंतच्या प्रवासातही मोदींचं झिंदाबाद झिंदाबादने लोकांनी स्वागत केलं.

सव्वा पाच वाजता मोदींनी रेस्टहाऊसमधूनच मोबाईलवरून रूद्रापूर येथील रॅलीला संबोधित केलं. लोक एक वाजल्यापासूनच रॅलीला गर्दी करून होते. खराब वातावरणामुळे मी येऊ शकलो नाही, असं खोटं सांगून मोदींनी भाषणात लोकांची माफीही मागितली.

अमर उजालाच्या बातमीनुसार, मोदी पावणेसात वाजता जंगल सफारी वगैरे सगळी टूरमधून मोकळे झाले आणि तीच त्यांची ट्वीटची वेळ आहे.

इंटरनेटवर उपलब्ध विविध बातम्यांमध्ये मोदींच्या १४ फेब्रुवारीच्या दिनक्रमाच्या वेळा आणि वर्णन एकमेकांशी जुळत नाहीत. परंतु, मोदी दुपारनंतर जिम काॅर्बेट नॅशनल पार्कमध्ये होते, तिथे ते मनमुराद फिरले, बोटीतून नदीभ्रमण केलं, डिस्कवरी चॅनलसोबत शुटींग केलं, रेस्टहाऊसला गेले, चहानाश्ता केला, मोबाईलवरून भाषण केलं वगैरे माहिती सामाईक आहे.

पुलवामातील हल्ला साडेतीन वाजताच्या सुमारास झाला. इतक्या मोठ्या हल्ल्यानंतर पंतप्रधानांना खबर गेली नसेल याची सुतराम शक्यता नाही. मात्र, मोदींनी ती भटकंती, शुटींग आटोपतं घेतलं, रूद्रापूरचं भाषण टाळलं आणि दिल्लीकडे किंवा पुलवामाकडे तडक रवाना झाले असं दिसत नाही.

जिम काॅर्बेट पार्कसारख्या ठिकाणांहून मोदी फोटुगिरी करून ट्वीट करणार नाहीत, हे त्यांची आजवरची शायनिंग पाहता, त्यांना तसा मोह झाला नसेल हे संभवत नाही, पण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यावर तिखट प्रतिक्रियांची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी ते टाळलं असावं. अन्यथा, कदाचित देशाच्या दबावाने त्यांना शुटींग अर्ध्यावर सोडावं लागलं असतं.

ढिकाला रेस्ट हाऊसच्या विजिटर बुकमध्ये मोदींनी लिहिलं, मैं यहां आकर बहोत खूश हुं, फिर आऊंगा!!!!

ते बोटीत फिरत असतानासुध्दा हल्ल्याची माहिती घेत असतील, सूचना देत असतील, तुम्हाला काय माहिती, अशी माझीच लालवाली चाटुगिरी करणारी बुध्दीबधीर माकडं या देशात कमी नाहीत. पण लवकरच या सगळ्या सत्यतेची डिस्कवरी लोकांसमोर येईलच. देशभावनेच्या आड लपवण्याचा कितीही प्रयत्न झाला, कोणी कितीजरी भलामण केली तरी, भारतीय जवानांच्या बलिदानाबाबत नरेंद्र मोदींचं वर्तन एक पंतप्रधान म्हणून बेजबाबदारपणाचं, बेफिकीरीचं होतं, हे झाकलं जाऊ शकत नाही.

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

संपादक, मिडिया भारत न्यूज

mediabharatnews@gmail.com / 9175292425

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!