कोरोनावर पुणे पोलिसांची माऊथवाॅशची मात्रा !

कोरोनावर पुणे पोलिसांची माऊथवाॅशची मात्रा !

कोरोनावर पुणे पोलिसांची माऊथवाॅशची मात्रा !

घरात जर नियमित कापूर जाळला आणि रोज नियमितपणे माऊथ वॉशचा वापर केला तर कोरोनाची बाधा होत नाही, असा विश्वास महाराष्ट्रातील पोलिसांमध्ये निर्माण झाला आहे. हा कापूरसुद्धा भीमसेन कापूर असावा आणि माऊथ वॉश लिस्टरीनच असावं, अशी सुद्धा पोलिसांची खात्री झाल्याचे दिसून येत आहे.

या उपायांचा वापर सुरुवातीला कल्याण पोलिसांनी केला होता आणि कल्याणात काम करणाऱ्या पोलिसांना कोणालाही कोरोनाची बाधा झालेली नाही, अशी पोलिसांकडे माहिती आहे. त्याचं कारण विचारलं असता कल्याणातील पोलिसांनी भीमसेन कापूर जाळून घराचं व कार्यालयाचं निर्जंतुकीकरण तसंच लिस्टरीन माऊथवाॅशचा वापर तोंडाच्या निर्जंतुकीकरणासाठी नियमित केल्याचं कळल्यानंतर, आता पुण्यातील पोलिसांनीही कल्याण पोलिसांकडून त्याची माहिती घेऊन आपल्या अधिपत्याखालील सर्व पोलीस ठाण्यांना व अधिकाऱ्यांना भीमसेन कापूर आणि लिस्टरीनच्या चा उपायाबद्दल कळवलं आहे व त्याचा अवलंब करायलासुद्धा सांगितलं आहे.

तशा प्रकारचं पत्रच पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या स्वाक्षरीने जारी झालेलं आहे. हे पत्र समाज माध्यमात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. पोलिसच या उपायांचा अवलंब करत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचाही त्या उपायांवर पटकन विश्वास बसत आहे.

मीडिया भारतने या पत्राबाबत पुणे ग्रामीण पोलिसांना संपर्क करून सदरचे पत्र हे त्यांच्याकडूनच जारी झालेलं आहे, याची खात्री केली. पोलिसांकडून कळलं की हा उपाय परिणामकारक आहे व पोलिसांच्या काळजीपोटीच त्याबाबतची माहिती सर्वांना दिलेली आहे. सदरचं पत्र आमचा अंतर्गत पत्रव्यवहार असून ते बाहेर कसं पडलं याबाबतही पुणे पोलिसांना आश्चर्य वाटलं.

सदरच्या लिस्टरीनबद्दल अधिक माहिती काढली असता जाॅन्सन एन्ड जाॅन्सन कंपनीचं ते उत्पादन आहे. युकॅलिप्टाॅल, मेंथाॅल, मिथाईल सॅलिसिलेट आणि थायमाॅल या घटकांचा त्यात समावेश आहे.

डॉक्टरांकडे त्याबाबत विचारणा केली असता लिस्टरीन हे माऊथवाॅश अॅन्टीबॅक्टरियल आहे याचा अर्थ ते जीवाणूंवर काम करतं. कोरोना हा विषाणू आहे, तो जिवाणू नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक लोकांनी कित्येक वेळा सांगितलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की लिस्टरीन हे कोरोनावरचं औषध नाही.

परंतु अनेक उपाय हे रोग प्रतिकारकशक्ती वाढवणे किंवा प्रतिबंधात्मक उपाय किंवा कधीकधी योगायोग म्हणून सुद्धा परिणामकारक ठरत आहेत. समाजमाध्यमात अनेक उपायांबाबतचे संदेश धडकत असून लोक त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत आहेत. काही घरगुती प्रतिबंधात्मक उपाय सरकारकडूनही अधिकृतपणे जारी झाल्याने खरं काय नि खोटं काय, याची वर्गवारी करणं कठीण झालं आहे.

कापूर आणि लिस्टरीनचा उपाय सुचवणारं पत्र बनावट असावं असा अंदाज होता. परंतु ते धक्कादायकरित्या खरं आहे. कोवीडसारख्या जागतिक संकटात कुठल्याही प्रकारचे औषध किंवा उपाय हे त्याला अधिकृत मान्यता नसताना पोलिसांनी ते अधिकृतपणे स्वीकारावेत आणि तेही विशिष्ट कंपनीचंच उत्पादन, हे कितपत योग्य आहे याबद्दल मात्र प्रश्न निर्माण झालेला आहे.

भीती किंवा काळजीपोटी पोलिस विभागच मिथ्याचा बळी पडत असेल तर सामान्य जनतेने दाद तरी कुठे मागावी, हाही सवाल आहे. येत्या काळात कोविडबाबतच्या घरगुती उपायांचा गोरखधंदा फोफावेल, कदाचित लोक अंधश्रद्धांच्या आहारी जातील, ही शक्यता आहे. सरकारपुढे त्यातून लोकांना बाहेर काढण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

News by Raj Asrondkar

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!