आयुष्यातील रिकाम्या जागांचा प्रश्न

आयुष्यातील रिकाम्या जागांचा प्रश्न

आयुष्यातील रिकाम्या जागांचा प्रश्न

जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ?.... कवीवर्य भा रा तांबेच्या ह्या ओळी आपल्याला कायम वास्तवतेचं भान देतात.

बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटत असतं आपण इथून गेल्यावर कसं व्हायचं या साऱ्यांचं ! पण मुळात तसं काहीच नसतं . गाळलेल्या काही जागा पुन्हा भरतात. होय मान्य आहे मला, काही काळाकरता पोकळी निर्माण होते. पण पुन्हा काही कालावधीनंतर ती भरूनही निघते. कोणी ना कोणी घेतोच की जागा त्यांची.

काळ थांबत नाही , ही एक निरंतर चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे . आज मी ज्या ठिकाणी आहे काल कोणीतरी वेगळ तिथं होतं. उद्या आणखीन वेगळं कोणीतरी असेल, पण ती जागा रिक्त राहणार नाही. भरेल कोणीतरी. येईल कोणीतरी. कामं होतच राहतील.

पडलेल्या झाडांच्या जागीसुद्धा काही ना काही उगवलेलं दिसतं. काहीच नाही तर दगडधोंड्यांनी, मातीने का होईना ती जागा भरलेली दिसतेच .

बॉसची रिकामी झालेली जागासुद्धा दुसरा येऊन घेतोच की , मग तो स्टाफमेंबर का असेना. पुन्हा तोच खुर्चीचा गुण त्यालाही लागलेला दिसतो, त्यामुळे त्या पदाचा गुणही तिथे दिसून येतो. थोड्याफार फरकाने असतं, पण बरंच साम्यसुद्धा असतं .

वय वाढतं तसा मित्रपरिवारही वाढत जातो. वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळे लोक भेटत जातात. काही लोक आपल्या सोबत येतात . तर काही लोक तेवढ्यापुरतेच आपल्याला भेटतात. रिकाम्या जागा करुन जातात. तरीही पुढे पुढे जायचं असतं. सोबत येणा-यांना घेऊन आणि सोबत न येणा-यांच्या आपल्याबरोबर आठवणी घेऊन चालत राहावं लागतं .

थांबता येत नाही. जगरहाटी चालूच राहते. कुणीच कुणासाठी थांबत नाही. पुढे जावंच लागतं. काही रिक्त जागा मात्र अशा असतात की त्या कधीच भरून निघत नाहीत .

आपल्या जिवलगांचे आपल्या आयुष्यातून निघून जाणे , पुन्हा कधीही न दिसण्यासाठी. अशा जागा रिक्त राहतात. आई-वडिलांच्या जिवलग मित्रांच्या या जागा अशाच असतात, ज्या कधीच भरून येत नाहीत .भरता भरत नाहीत. भरल्या तरी नीट फिट होत नाहीत.

कधी कधी या गाळलेल्या जागा चुकीच्याच भरल्या जातात, ज्याने हमखास आपल्यावर नापास होण्याची वेळ येते. बरं चुकीच्या भरल्यात हे माहीत असूनही आपण ते खोडून टाकू शकत नाहीत . खोडता येते तोपर्यंतच , जोपर्यंत त्या कच्च्या असतात . एकदा का त्या पक्क्या झाल्या मग मात्र मार्क गेलेच म्हणून समजा.

आयुष्यात काही रिकाम्या जागांचा प्रश्न असतोच. सतत तो आपण भरत राहतो , कधी बरोबर तर कधी चुकीची रिकामी जागा भरली जाते. आयुष्याचे मार्क जातात. चुकीची माणसं घेऊन आयुष्य कंठावं लागतं. याचसाठी रिकाम्या जागेचा साधा प्रश्न जरी असला तरी साधेपणाने घेऊ नये. आयुष्यात हा प्रश्न कोणाचाच चुकू नये.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!