मनाला वेड लावतो, बेभान करतो तो पहिला पाऊस. देहभान हरपून मनभरून अंगावर थेंब झेलायला भाग पाडतो तो पहिला पाऊस. रुक्ष रुक्ष मनाला ओलेचिंब करतो. तोच तर पहिला पाऊस...
थंड ओल्याशार सरींचा शिडकावा झाला न् झाला तोच धरणीला डोहाळे लागतात ते स्वतःत बी रुजवून घेण्याचे. बी रुजून कोवळी पानं डोकं वर काढू लागतात आणि सगळीकडे दिसते ते रमणीय हिरवेगार दृश्य.

ज्याची आपण सर्वजणच वाट पाहत असतो. चोहीकडे हिरवीगार राने दिसू लागतात. धरणी हिरवा शालू पांघरुन नव्या नवरीसारखी भासू लागते. वर निरभ्र आकाश जणू तिला कवेत घेण्यासाठी क्षितिजावर तयारच असते मिलनासाठी.

उगीचच का रोपं भराभर वाढायची घाई करतात या पावसात. का कुणास ठाऊक? पण एक वेगळीच आस आकाशाला आणि एक वेगळीच ओढ धरणीला लागलेली असते. क्षितीजावर दोघांच्याही उत्कट भावना इंद्रधनुष्याच्या रुपात दिसू लागतात.

प्रत्येकाचं भिजणं वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. ते ज्याचं त्यानंच ठरवावं लागतं. पाऊस पुन्हा पुन्हा आपल्याला खुणावतो. मागे वळून पाहतो, बरसून घेतो. पण तरीही काहीजण या ओल्या पावसातही कोरडेच राहतात.
तुम्ही कोरडे राहा किंवा ओलेचिंब भिजून जा. पण एकमेकांची मने मात्र हलक्या सरींनी भिजवायचं टाळू नका. थंड, शीतल, हलक्या करून टाका त्यांच्या सुद्धा भावना. होऊ द्या नाहीसा त्यांचाही कोरडेपणा, रुक्षपणा.

आयुष्यात असा मन ओलंचिंब करणारा पाऊस एकदा तरी अनुभवायचा. मिळेल त्या संधीच सोन करायचं. कधी रिमझिम बरसायचं, तर कधी कोसळून घ्यायचं. पण मनसोक्तपणे पाऊसमय व्हायचं. तालासुरात गाणी गात मस्त मजेने भिजून जायचं.
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com