मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
कोणत्याही कृतीमागे प्रामाणिकता असेल, तरच त्यातून सकारात्मक फलश्रुती होते. रक्षाबंधन हा भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा सण. भावाने बहिणीला दिलेली संरक्षणाची हमी. पण इथे बहिण भावाला राखी बांधत असल्याने बहिणीने भावाला संरक्षणासाठी केलेली आर्जव म्हणू़या आपण !!! प्रत्यक्षात हे भाऊ लोक बहिणींचं नेमकं काय संरक्षण करत असतात ? तर काही नाही !!! बहिणीने वेडंवाकडं वागू नये, यावर नजर ठेवण्यासाठीची भाऊ ही एक व्यवस्था आहे. नजर चुकवून बहिण काही वेडंवाकडं वागलीच, तर तिला क्रूरपणे संपवण्यासाठीही केलेली भाऊ ही सामाजिक व्यवस्था आहे.
इथे भाऊ वेडावाकडा वागला तर नजर ठेवण्याचा अधिकार बहिणींना वयाने मोठी असली तरी दिलेला नाही.
बरं संरक्षणाची हमी म्हणजे फक्त आपल्याच बहिणीच्या संरक्षणाची हमी का ? मग इतरांच्या बहिणींच्या किंवा ज्यांना भाऊच नाही, अशा बहिणींच्या संरक्षणाची हमी कोणी घ्यायची ?
नाक्यानाक्यावर उभं राहून मुलींना छेडणारे, शेरेबाजी करून जिणं मुश्कील करणारे भाऊ, शाळाकॉलेजांतील मुलींचा त्यांच्या मनाविरूध्द भयावह पाठलाग करणारे भाऊ, बलात्कार करणारे भाऊ, बलात्कारावेळी अन्यायअत्याचारांची परिसीमा गाठत मुलींची हत्या करणारे भाऊ, या सगळ्या भावांतलं भाऊपण जातं कुठे ? ते रक्षाबंधन किंवा भाऊबीजेच्या दिवसांपुरतंच मर्यादित इतकं ढोबळ कसं असू शकतं ? आणि हे भाऊ जेव्हा समाजात स्त्रियांना नामोहरम करतात, तेव्हा इतर भाऊ नेमकी काय भुमिका निभावत असतात ?
वास्तविक, रक्षाबंधन करताना, स्त्रियांनी भावाला, माझी जशी काळजी करतोस, तशी समाजातल्या सगळीच मुलींची कर, असं आवर्जून सांगायला हवं.
तसं झालं तरच, मला मुक्तपणे वावरता येणार आहे. मनमोकळं जगता येणार आहे. माझे निर्णय घेताना ते तुझ्याशी निरोगी चर्चा करून घेता यावेत, असं आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं आपल्यात असलं पाहिजे. माझं आत्मभान तुला मान्य करता आलं पाहिजे. केवळ स्वत:च्या तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर माझीही व्यक्तिगत प्रतिष्ठा जपण्यासाठी तुझं पाठबळ हवं. माझंही माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्व तू मान्य करायला हवंस. तुला असलेलं व्यक्तिगत स्वातंत्र्य मलाही असलं पाहिजे, म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा. केवळ बहिण म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून जगण्याचा माझा अधिकार तू मान्य केला पाहिजेस आणि तुझ्यावरच अवलंबून न राहता, मलाच माझं स्वत:चं संरक्षण प्रसंगी करता आलं पाहिजे, असं सक्षम घडण्यासाठी मला पूरक साथ दे, असं आज बहिणीने भावांना सांगितलं पाहिजे.
रक्षाबंधन हा सण भाऊबहिणींच्या रक्ताच्या नात्यातून जन्माला आलाय, असे संदर्भ पुराणात, इतिहासात कुठेच नाहीत.
बळीराजाशी कपटीपणा करायला गेलेल्या विष्णूला बळीने बुध्दिमतेच्या जोरावर अडकवून ठेवले, तेव्हा लक्ष्मीने सोयीस्कररित्या बळीला हातात धागा बांधून बळेच भाऊ मानले व त्याबदल्यात विष्णूची सुटका करून घेतली, असा एक संदर्भ आहे.
सूर आणि असूरांच्या लढाईत इंद्राचा विजय व्हावा, म्हणून इंद्राणीने त्याला हातात धागा बांधला, हा संदर्भ भावाबहिणीतील नसून पतीपत्नीतील आहे.
इतिहासकाळात लढाईत पराभव होत असताना, पुढचा अनर्थ टाळण्यासाठी एका राजाच्या पत्नीने दुसऱ्या राजाला सोयीस्कररित्या भाऊ मानल्याचं आपल्याला दिसतं.
भावाबहिणीतील नातं पवित्रच असतं. पण रक्षाबंधन हा सण त्या पवित्रतेतून सुरू झालाय, असं दिसून येत नाही. म्हणूनच तो सामाजिकदृष्ट्या जबाबदार, दीर्घकालीन ठाम भाऊ घडवत नाही. रक्षाबंधन करणारा भाऊ रक्षाबंधनादिवशीच संपतो. त्यानंतर असतो, तो फक्त पुरूष. स्वत:च्या बहिणीसकट समस्त स्त्रियांना आपल्या नजरकैदेत ठेवू पाहणारा, त्यांचं माणूस म्हणून अस्तित्व नाकारणारा पुरूष.
हे चित्र बदलायला हवं. बहिणीने भावाला हातात धागा बांधल्यावर भावानेही बहिणीच्या हातात धागा बांधण्याची प्रथा सुरू व्हायला हवी.
फक्त तुलाच नाही, तर समाजातील सर्वच स्त्रियांना संरक्षणाच्या मेहेरबानीची गरजच लागणार नाही व मुक्तपणे वावरता येईल, असं निकोप सामाजिक वातावरण तयार करण्याची मी हमी देतो, असं भावाने बहिणीला सांगितलं पाहिजे.
सण, उत्सव हे व्यापाऱ्यांचा धंदा व्हावा, म्हणून रूढींमागे फरफटत जावून पार पाडावयाचे उपचार ठरता कामा नयेत. जातीधर्मभाषाप्रांतांच्या पलिकडे माणुसकीची नाती निर्माण करण्यासाठी, एक चांगला समाज घडवण्यासाठीही सणउत्सवांचा वापर बदलत्या काळानुसार झाला पाहिजे.
कारण,
माणूसपण जपणारं
मन तितकं मोठं असतं,
आपुलकीचं नातं खरं
बाकी सगळं खोटं असतं !!
——–राज असरोंडकर——-