साडेपाच कोटींची जमीन ; प्राॅपर्टी डिलरने खरेदी केली २ कोटींना ; काही मिनिटांतच रामजन्मभूमी ट्रस्टने खरेदी केली साडेअठरा कोटींना !

साडेपाच कोटींची जमीन ; प्राॅपर्टी डिलरने खरेदी केली २ कोटींना ; काही मिनिटांतच रामजन्मभूमी ट्रस्टने खरेदी केली साडेअठरा कोटींना !

साडेपाच कोटींची जमीन ; प्राॅपर्टी डिलरने खरेदी केली २ कोटींना ; काही मिनिटांतच रामजन्मभूमी ट्रस्टने खरेदी केली साडेअठरा कोटींना !

भारतीय राजकारणात राममंदिराचा मुद्दा एक महत्वपूर्ण स्थान बनवून आहे. या मुद्द्यावरून दंगली, जाळपोळ, हत्या झाल्या, इतकंच नव्हे तर भारतीय राजकारणात उलथापालथ झाली आणि देशालाही मोठी किंमत चुकवावी लागली. हिंदुंच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा, जीवनमरणाचा विषय बनलेलं राममंदिर बांधकाम मात्र हितसंबंधितांच्या पोटापाण्याचा उद्योग झालाय. २ करोड रुपयांना खरेदी केलेली जमीन त्या व्यवहारानंतर संबधितांकडून अवघ्या ५ मिनिटात श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केल्याचा खळबळजनक घोटाळा समोर आलाय.

९ नोव्हेंबर, २०१९ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी अनुकूल निर्णय दिला. त्यानंतर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन होऊन मंदिर उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या. देशभरातून निधी संकलनाचं काम सुरू झालं. या निधी संकलनाच्या हिशोबाबाबतही आरोप प्रत्यारोप झाले आहेत.

सुरूवातीला ७० एकर जागेत राममंदिर उभारणी व परिसर विकास होणार होता. मात्र, यंदाच्या वर्षी जानेवारीमध्ये ट्रस्टने सदर कामाचा विस्तार करत अतिरिक्त जमीन खरेदीचा निर्णय घेतला, जो ७० एकर ऐवजी १०७ एकर जमीन विकासापर्यंत पोहचला. याचाच भाग म्हणून १२ हजार ८० चौरस फूट जमीन खरेदी करण्यात आली. हाच व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

कागदोपत्री नोंदीनुसार, ५ करोड ७० लाख बाजारभावाची संबंधित जमीन कुसुम पाठक यांच्याकडून सुलतान अन्सारी यांनी २ करोड रुपयांना १८ मार्च, २०२१ रोजी खरेदी केली आणि त्याच दिवशी सुलतान अन्सारीकडून श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने १८ कोटी ५० लाखांना खरेदी केली. या दोन्ही व्यवहारांच्या ई-स्टॅम्प प्रमाणपत्रात केवळ ११ मिनिटांचा फरक आहे.

कुसुम पाठक-सुलतान अन्सारी या व्यवहारात ४० लाख २३ हजार ९२० रूपयांचं मुद्रांक शूल्क अदा करण्यात आलंय. तर सुलतान अन्सारी - रामजन्मभूमी ट्रस्ट मधील व्यवहारात १ कोटी २९ लाख ४९ हजार ८६० रूपये इतकं मुद्रांक शुल्क भरण्यात आलंय.

कुसुम पाठक आणि सुलतान अन्सारी यांच्या व्यवहार झाल्यानंतर काही मिनिटातच रामजन्मभूमी ट्रस्ट आणि सुलतान अन्सारींमध्ये खरेदीखत बनलं आणि तितक्या वेळात २ करोडना खरेदी केलेली जमीन १८ कोटी ५० लाखांची झाली, असा दावा आम आदमी पार्टीचे नेता संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत संबंधित कागदोपत्री पुराव्यांसह केलाय.

खासदार संजय सिंह यांनी रामजन्मभूमी ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांना लक्ष्य केलंय. त्यांचं नाव नटवरलाल असायला हवं होतं, असा टोला संजय सिंह यांनी लगावलाय. हिंदुंनी श्रद्धेने दिलेल्या देणगी रक्कमेचा चंपत राय यांनी अपाहार चालवलाय, असा आरोप संजय सिंह यांनी केलाय. विशेष म्हणजे, काही मिनिटात पाठोपाठ झालेल्या दोन्ही व्यवहारात ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा हेच साक्षीदार आहेत, याकडेही संजय सिंह यांनी लक्ष वेधलंय.

लखनौमध्ये याच विषयावर सपाचे माजी आमदार पवन पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन रामजन्मभूमी जमीन खरेदी व्यवहारात घोटाळ्याचा आरोप केला. या व्यवहारात दोन्ही ठिकाणी रवि मोहन तिवारी, अयोध्येचा महापौर ऋषिकेश उपाध्याय आणि ट्रस्ट सदस्य अनिल मिश्रा साक्षीदार आहेत. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतान अन्सारी, रवि मोहन तिवारी आणि ऋषिकेश उपाध्याय हे तिघेही प्राॅपर्टी डिलर आहेत.

वास्तविक पाहता, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट राजकारणविरहित आहे, असं मानलं जातं. परंतु, चंपत राय यांनी संजय सिंह यांनी केलेल्या आरोपांवर सारवासारव करताना, महात्मा गांधींच्या हत्येचा अनावश्यक मुद्दाही मध्ये आणलाय.

' आरोपांना घाबरत नाही', असं म्हणताना, 'आमच्यावर महात्मा गांधीजींच्या हत्येचा आरोपही झाला आहे', असा उल्लेख चंपत राय यांनी अधिकृतपणे जारी केलेल्या खुलाशात केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत कित्येक लोकांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली आहे ; शिवाय उत्तर प्रदेश सरकारने ही अयोध्येच्या सर्वांगीण विकासासाठी जमीन खरेदी केली आहे, त्यामुळे जमिनीचे भाव वाढले असल्याची सारवासारव चंपत राय यांनी करण्याचा प्रयत्न आपल्या खुलाशात केला आहे. शिवाय संबंधित जमीन ही रेल्वे स्थानकाजवळ असल्याचं नमूद करून जमिनीला दिलेल्या चढ्या भावाचं समर्थन करण्याचा हास्यास्पद आणि केविलवाणा प्रयत्नही चंपत राय यांनी केला आहे.

या खुलाशानंतर, पुन्हा पलटवार करीत, ट्रस्टने महागात जमीन खरेदी केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच चंपत राय यांच्या खुलाशात असल्याचं खासदार संजय सिंह यांनी म्हटलंय.

दरम्यान, अयोध्येतील जुन्या हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी सदर व्यवहारांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलीय. संजय सिंह यांचे आरोप खोटे निघाल्यास त्यांच्याविरोधात ५० लाखांचा मानहानीचा दावा ठोकेन, असंही राजू दास यांनी म्हटलंय.

चंपत राय यांनी अयोध्येतील जमीन महागल्याचे दाखले देत सदर व्यवहार झालेला असल्याचीच अप्रत्यक्ष कबुली दिलेली असतानाही, अपेक्षेप्रमाणे केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सदर व्यवहाराच्या समर्थनार्थ व ट्रस्टच्या बचावार्थ पुढे आलीय.

भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता संजू वर्मा यांनी राम मंदिराच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं असल्याची प्रतिक्रिया दिलीय. साडे 18 कोटींचा व्यवहार दहा रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कसा काय होऊ शकतो आणि सायंकाळी सातनंतर तो कसा काय कार्यान्वित होऊ शकतो, असा सवाल संजू वर्मा यांनी उपस्थित केलाय. जी कागदपत्रं पत्रकार परिषदेत दाखवली गेली, ती मूळ कागदपत्रं नसल्याचंही वर्मा यांनी म्हटलंय.

दरम्यान, भाजपाचा आयटी सेलही लागलीच संजय सिंह यांची वैयक्तिक बदनामीची मोहिम राबवत कार्यरत झालाय. नेहमीप्रमाणेच, हिंदुंविरोधी षडयंत्रं वगैरे भावनिक मुद्द्यांवर चर्चा आणून घोटाळ्यावरून लोकांचं लक्ष अन्यत्र वळवण्याचा आटोकाट प्रयत्न समाजमाध्यमात सुरू झालाय.

मात्र, राफेलपासून ते पीएमकेअर्सपर्यंत प्रत्येक घोटाळ्याकडे मोदींवरच्या प्रेमापोटी दुर्लक्ष करणारा भाजपाई हिंदुत्ववादी मतदार रामजन्मभूमी जमीन खरेदी घोटाळ्याच्या बाबतीतही तीच भूमिका घेईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे, सदर प्रकरणात कठोर कारवाईचं पाऊल उचलल्याशिवाय, केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारकडे काहीही पर्याय नाही. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी या प्रकरणात भाजपाची अवस्था झालीय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!