पुढे काय? राजकीय संघर्ष की रस्त्यावरचा राडा ?

पुढे काय? राजकीय संघर्ष की रस्त्यावरचा राडा ?

पुढे काय? राजकीय संघर्ष की रस्त्यावरचा राडा ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात प्रक्षोभक विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अपेक्षेप्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल झालाय.

राणे आणि त्यांची दोन्ही मुलं वारंवार शिवसेनेला डिवचण्याचं काम करताहेत. इतकंच नव्हें तर उद्धव ठाकरेंविरोधात वैयक्तिक टीपण्याही त्यांनी केल्या आहेत. शिवसेना राज्य सरकारलातील प्रमुख घटक पक्ष आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपदच शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेला शिवसेनेसारखं वागायला मर्यादा आहेत, हे भाजपा ओळखून आहे.

त्याचाच गैरफायदा घेत, शिवसेना कमजोर झाली असून ती बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा नेतृत्व करतं आहे. शिवसेना भवन फोडण्याच्या वल्गनाही त्यातूनच आल्या आहेत.

राज्यातलं सरकार हातातून गेल्यावर काॅंग्रेस-राष्ट्रवादीशी सलगी केल्यावरून शिवसेनेला बदनाम करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न भाजपाने करून पाहिले. हिंदुत्व सोडल्यावरूनही भाजपाने शिवसेनेची कोंडी केली. पण संघभाजपाचं देश तोडणारं हिंदुत्व मान्य नसल्याची स्पष्टोक्ती करून उद्धव ठाकरेंनी भाजपालाच अडचणीत आणलं.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंना गोवण्याचा डाव रचण्यात आला, प्रताप सरनाईकांमागे चौकशी लावून दबावाखाली घेण्याचा खटाटोप झाला, कोविड संकटकाळात मंदिरं उघडण्यावरून किंवा पंढरपूर वारीवरून उद्धव ठाकरेंना विचलित करण्याची धडपड झाली, पण उद्धव ठाकरेंनी संयम ढळू दिला नाही.

राज्य हातातून गेलं, निदान मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडून हिसकावावी, यासाठी आता भाजपाचा आटापिटा सुरू आहे. नारायण राणेंचा त्यासाठी हत्यार म्हणून वापर होतो आहे. राणेंना पुढे करावं लागणं हे खरं तर देवेंद्र फडणवीस यांना पक्षनेता म्हणून आलेल्या अपयशावर भाजपाने केलेलं शिक्कामोर्तब आहे. चंद्रकांत पाटील यांची लवकरच अध्यक्षपदावरून गच्छंती होईल, अशी चिन्हं आहेत.

केंद्र सरकारच्या पाठबळावर नारायण राणे फाॅर्मात आहेत. इतके की केंद्रीय मंत्री झाल्यावरही ते अजूनही राणेच आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेला उकसवण्याची कामगिरी दिल्लीने आपल्यावर सोपवलीय, याची जाणीव त्यांना आहे. बादशहा कशाने खूश होईल, हे ते ओळखून आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली आवाज काढण्याची मग्रुरी दिल्लीच्या खुशामतीचाच भाग आहे. पण गेल्या काही वर्षात राणेंचं राजकारण ब्रेकफेल वाहनासारखं झालंय. ज्याला अपघातासाठी इतर कोणी कारणीभूत व्हावं लागत नाही.

अपघात झालाय आणि राणेंवर गुन्हाही दाखल झालाय. केवळ शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने राणेंना आणि सोबत भाजपाला शिंगावर घ्यायची पूर्ण तयारी केलीय, याचेच हे संकेत आहेत. हा संघर्ष संविधानिक मार्गाने चालेल की तो रस्त्यावरच्या राड्यांचं रूप घेईल, ते लवकरच दिसून येईल.

 

 

 

राज असरोंडकर

संपादक, मिडिया भारत न्यूज |संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

mediabharatnews@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!