रशियाने युक्रेन वर केलेल्या आक्रमणानंतर युद्धग्रस्त भागातून स्थानिक नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर झालं. यावेळी मोठी समस्या उभी राहिली ती युक्रेनमधल्या परदेशी नागरिकांची त्यात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांना असुरक्षित वातावरणात दिवस काढावे लागलेच, परंतु त्यांचा मायदेशी परतण्याचा मार्गही अतिशय खडतर होता. या सर्व काळात भारत आणि भारतीय दूतावासाची अनुपस्थिती भरून काढली अज्ञात भारतीय सैनिकांनी !
युक्रेनमध्येच शिक्षणासाठी गेलेले आणि 'सिनियर्स' या बिरुदावलीने वावरणारे भारतीय विद्यार्थी या नव्या भारतीय विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले. तेच सर्व काळात त्यांचे कुटुंब होते, पालक होते, मार्गदर्शक होते आणि पाठीराखे होते आणि लीडरही होते. डाॅक्टर करण संधू, डॉ. पुजा, डॉ. स्वाधीन, डॉ. वसू ही लढवय्या सिनिअर्सपैकी मीडिया भारत न्यूज कडे पोचलेली काही नावं आहेत.
ज्या काळात युक्रेनवर युद्धाचं सावट होतं, त्याच काळात तिथल्या विद्यापीठांनी कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी विद्यार्थ्यांना विचारणा केली होती. त्यामुळे युद्धाची चिंता विद्यार्थ्यांच्या मनात आली नाही. युक्रेन सरकारने विद्यापीठांना वेळीच खबरदारीच्या सूचना दिल्या असत्या, या भरवशावर विद्यार्थी राहिले. शिवाय परीक्षा तोंडावर होत्या. विद्यापीठ ऑनलाईन पाठांना तयार नव्हतं.
कीवमधील भारतीय दुतावासाची युक्रेन सोडण्याची पहिली मार्गदर्शक सूचना 'ज्यांचं राहणं अत्यावश्यक नाही' त्यांच्यासाठी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ती फार मनावर घेतली नाही. अखेर जे व्हायचं ते झालं. कीव / खारकीवमधले विद्यार्थी युद्धाच्या माऱ्याखाली आले आणि तिथून सुरू झाला मदतीचा धावा !
'विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत' असं वारंवार म्हणणाऱ्या भारतीय दुतावासाकडे प्रत्यक्ष उपाययोजना काहीही नव्हत्या ना विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या विचारणांवर दुतावासाकडे कृतीशील उत्तर होतं.
विद्यापीठ प्रांगणातून बाहेर पडावं की पडू नये, नाही पडलो तर सुरक्षिततेचं काय, पडलो तर जायचं कुठे, कुठून, कसं? कशाचंही उत्तर दुतावासाकडे नव्हतं. युद्ध सुरू झाल्यानंतरही कीव/खारकीव प्रत्यक्ष आक्रमणाखाली येईपर्यंत भारताकडे सुटका मोहिम आखायला पुरेसा वेळ होता.
रशियाशी असलेल्या संबंधांचा वापर करून त्या देशापर्यंत भारतीयांसाठी 'सुरक्षित जोडमार्ग' उपलब्ध करून घेण्याचा मार्ग भारताकडे होता. त्यावर काम झालं नाही आणि युक्रेनच्या पूर्वेकडून पश्चिमी सीमांकडे आणण्याची योजनाही भारताने आखली नाही. भोवताली युद्ध सुरू असलेल्या गंभीर परिस्थितीतून 'तुम्ही तुमचे' सीमांवर पोहचा, मग तिथे आम्ही तुमचं स्वागत करू, असं अजब 'ऑपरेशनगंगा' भारताने राबवलं. थोडक्यात, वाईट भाषेत सांगायचं तर 'आमच्यापर्यंत स्वत:च्या जोखमीवर जिवंत पोचलात तर पुढे घरी पोहचवू' असा हा सुटकेचा 'मोदीपॅटर्न' होता.
एकप्रकारे, युक्रेनमध्ये खास करून कीव/खारकीवमधले भारतीय वाऱ्यावर सोडून दिलेले होते. ते चिंतीत होते, भयभीत होते, तणावाखाली होते. पुरेशी झोप मिळत नव्हती. पुरेसं खायला मिळत नव्हतं. प्रचंड असुरक्षित आणि अनिश्चित वातावरणात या मुलांना आसरा झाला सिनिअर्सचा !
सिनिअर्सना युक्रेन परिचित होतं. कुठे काय मिळतं, कुठून कसं जायचं, कुठे कसं पोचायचं, त्यासाठी साधनं काय आहेत याची त्यांना इत्यंभूत माहिती होती. स्थानिकांसोबत परिचय होता, स्नेहसंबंध होते. ते त्यांनी पणाला लावले. विद्यापीठ प्रांगणाच्या बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या एकेका तुकडीला पश्चिमेकडील सीमांवर सुरक्षित आणण्याचं काम या सिनिअर्सनी केलं. तेही अडकलेल्यांपैकीच आहेत, पण इतर विद्यार्थ्यांना धीर देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. इतकंच नाही तर वेळप्रसंगी इकडून तिकडून खाण्यापिण्याची व्यवस्था करणंही त्यांच्याच खांद्यावर होतं.
अगदी आजच्या टप्प्यावरही युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी आपल्या जगण्याची लढाई स्वत:च लढताहेत. रशियाकडून बाहेर काढलं जाईल, बसेसची व्यवस्था होईल, या वल्गना बातम्यांपुरत्याच उरल्यात. तशी प्रत्यक्ष हालचाल दिसत नसल्याने जोखीम घेऊन विद्यार्थीच बाहेर पडलेत. खारकीवमधून पिसोचीनमध्ये थांबल्यावर पुढचा प्रवास हंगेरीच्या दिशेने सुरू झालाय.
सिनिअर्स आजुबाजुच्या गावांतून पाव, सॅन्डवीच, बिस्किटं गोळा करून कशीबशी भूकेची वेळ मारून नेतायंत. मायदेशाकडे प्रवास सुरू आहे. तो खडतर असला तरी प्रवासादरम्यान पुढे पुढे सरकण्याची उमेद देण्याचं काम सिनिअर्स करताहेत. अडकलेली मुलं भारतात सुरक्षित परतलीत, त्यात सिनिअर्सची महत्वाची भूमिका आहे. तेच विद्यार्थ्यांसोबत भारतीय सोल्जर्सची भूमिका निभावताहेत. जयजयकार मात्र आयतोबांचा होतोय.
राज असरोंडकर
संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ
mediabharatnews@gmail.com