महिलांच्या ताणतणावाची कारणं धर्मश्रद्धा व समाजव्यवस्थेत लपलीत ! : राज असरोंडकर

महिलांच्या ताणतणावाची कारणं धर्मश्रद्धा व समाजव्यवस्थेत लपलीत ! : राज असरोंडकर

महिलांच्या ताणतणावाची कारणं धर्मश्रद्धा व समाजव्यवस्थेत लपलीत ! : राज असरोंडकर

धर्मश्रद्धा व अज्ञानातून आलेल्या जुन्या समजुती भारतातील महिलांच्या मानगुटीवर घट्ट बसलेल्या असल्यामुळे त्यांच्यात लैंगिक आरोग्यविषयक काम करणं मोठे जिकरीचं आणि आव्हानात्मक असतं. इथल्या धार्मिक पगडा असलेल्या समाजव्यवस्थेत महिलांना अजूनही जशी म्हणावी तशी पुरेशी मोकळीक नाही, तिथे लैंगिक विषयांवर समाजात जनजागृतीचं आव्हानात्मक काम तुम्ही करत आहात, अशा शब्दांत कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी एफपीए इंडियात काम करणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.


एफपीए इंडिया अर्थात फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या ठाणे जिल्हा प्रकल्प कार्यालयाने 'केअरिंग ऑफ केअर गिव्हर्स' या उपक्रमांतर्गत 'मानसिक आरोग्य व तणावमुक्ती' या विषयावर बोलण्यासाठी राज असरोंडकर यांना निमंत्रित केलं होतं. यावेळी ठाणे प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ के शेषागिरी राव आणि पत्रकार प्रफुल केदारे मंचावर उपस्थित होते.  टीडीपीच्या ( कुटुंब नियोजन आदर्श केंद्र ) मेडिकल ऑफिसर इन्चार्ज डॉ. श्वेतांबरी पडवळ यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं.

१९४९ मध्ये स्थापन झालेली FPA India, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबईतील एक जुनी आणि यशस्वी परोपकारी संस्था आहे. आंतरराष्ट्रीय नियोजित पालकत्व निधी (IPPF) चे संस्थापक सदस्य म्हणून, FPA इंडियाचा भारत सरकारसह अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहयोग आहे.
लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य (SRHR) आणि अधिकारांसाठीच्या लढयात संस्था अग्रेसर आहे.‌ संस्थेचा भारताच्या १८ राज्यांमध्ये ४१ शाखांचा विस्तार आहे. केवळ गेल्या वर्षभरात संस्थेने ३० दशलक्ष भारतीयांची सेवा केलीय. भारतातील गरीब, उपेक्षित आणि असुरक्षित समुदाय व युवांपर्यंत SRHR सेवा तरतुदी आणि गर्भनिरोधक, सुरक्षित गर्भपात, एचआयव्ही/एड्स व लैंगिक शिक्षणाशी संबंधित माहिती पोहचवण्याचं काम संस्था करते.

रोजच्या जगण्यातली चपखल उदाहरणं देत समोर बसलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत, कविता, गाण्यांचा वापर करत राज असरोंडकर यांचं दीड तास चाललेलं सत्र सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकलं. महिला म्हणून वाट्याला आलेले सामाजिक प्रश्न, कौटुंबिक प्रश्न आणि संकुचित समाजात वावरताना कोंडी करणारी नोकरी यामुळे आरोग्य महिला कर्मचारी ताणतणावाखाली येत असतील, हे साहजिक आहे ; परंतु परिस्थितीला भिडल्याशिवाय गत्यंतर नाही ! असं असरोंडकर म्हणाले.

लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे, हा शाळेत वाचायला मिळणारा तथाकथित सुविचार बदलला पाहिजे व तो, 'लज्जा हे स्त्रीच्या सर्व समस्याचं मूळ आहे' असा केला पाहिजे, असं मत असरोंडकर यांनी व्यक्त केलं, तेव्हा उपस्थित महिलांनी त्यांना टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

आपल्या कामाचा परिणाम केवळ देशावर, समाजावर होत नसतो तर आपल्यावरही ते वैयक्तिक परिणाम करत असतं, त्यामुळे राग, चिडचिड, अस्वस्थता, संकोच यांची कोंडी फोडून कामाचं आव्हान झेलणं गरजेचं आहे. बुद्धाच्या 'अत्त दीप भव' मध्येच तणावमुक्तीचा मार्ग दाखवलेला आहे. आपण कुठल्या क्षणी कुठल्या मूडमध्ये असतो, हे खरंतर आपणच ठरवत असतो; त्यासाठी आपल्या मनावर अर्थात मेंदूवर आपलं नियंत्रण हवं, असं राज असरोंडकर म्हणाले.

छोट्या छोट्या आवडीनिवडीतून, छंद जोपासण्यातून, जीवन पद्धती, विचार करण्याची पद्धती बदलण्यातून, सभोवतालाकडे सकारात्मकरित्या बघण्यातून तसं सकारात्मक नियंत्रण होऊ शकतं. एखादं रेडिओ टीव्ही वरचं स्टेशन बदलावं तितक्या सहजपणे आपल्याला स्वतःचा मूड बदलता आला पाहिजे. असं प्रतिपादन करताना राज असरोंडकर यांनी मंगेश पाडगावकरांची 'चिऊताई' कविताही सादर केली.

वास्तववादी मांडणी, पण चिमटे काढणारी असरोंडकरांची शैली सोबत सकारात्मक प्रेरणादायी संदेश देणाऱ्या गाण्यांचं सादरीकरण यांमुळे व्याख्यानादरम्यान त्यांनी वातावरण सतत हलकंफुलकं ठेवलं. प्रश्नोत्तरावेळीही असरोंडकर यांनी आकस्मिक प्रश्नांनाही नेमकी उत्तरं दिली.

अपेक्षेपेक्षा खूप काही मिळालं, अशी प्रतिक्रिया डॉ. के शेषागिरी राव यांनी समारोपावेळी व्यक्त केली. लगेच सगळं काही शिकता येत नाही, पण नवी सकारात्मक सुरुवात करण्यासाठी पौष्टिक खाद्य आमच्या स्टाफला मिळालं, असं ते म्हणाले.

एफपीए इंडियाच्या ठाणे जिल्हा प्रकल्पातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी केळकर, प्रोजेक्ट मॅनेजर प्रीती सकट, प्रोग्राम ऑफिसर सुनंदा गवळी, भिवंडी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाश्री कुलकर्णी, Fsw unit 2 कल्याणच्या प्रोग्राम मॅनेजर मनिषा देसाई, भिवंडी युनिटच्या प्रोग्राम मॅनेजर संध्या सोनारकर आदी कर्मचारी अधिकारी यांची कार्यक्रमात उपस्थिती होती. मराठी भाषा अभ्यासक वृषाली विनायकसुद्धा सत्र ऐकण्यासाठी आवर्जून हजर होत्या. क्लिनिक सेक्रेटरी श्वेता नाईक यांनी सर्वांचे आभार मानले.

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!