धार्मिक उन्माद, बिहार पोलिसांचा दिल्ली पॅटर्न आणि निवडणुकांचं राजकारण !

धार्मिक उन्माद, बिहार पोलिसांचा दिल्ली पॅटर्न आणि निवडणुकांचं राजकारण !

धार्मिक उन्माद, बिहार पोलिसांचा दिल्ली पॅटर्न आणि निवडणुकांचं राजकारण !

बिहार विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली आणि एक हिंसाचाराची घटना घडली. पण हा निवडणुकीतला राजकीय हिंसाचार नाही. बहुतांशी भारतीयांना ज्याची चटक लागलीय, तो धार्मिक उन्मादाचा कोविडहूनही भयंकर असा संसर्गजन्य आजार आणि तो मोदीपॅटर्नने मागचा पुढचा विचार न करता हाताळणारे निवडणुकांच्या तणावाखालील पोलिस यांनी अनुराग पोद्दार नावाच्या अवघ्या १८ वर्षांच्या आईबापाला एकूलता एक मुलगा असलेल्या निरापराध युवकाचा बळी घेतला.

खरं तर कोविड संकटकाळात एकदा सुरक्षित अंतर राखण्याचा देशपातळीवर निर्णय झाला की तो आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतूदींचा कठोर वापर करून अंमलात आणणे हाच संसर्ग रोखण्याचा मार्ग केंद्र आणि राज्य सरकारांनी अवलंबणं अपेक्षित आहे. पण देशावरील संकटकाळातही कुरघोडींचं राजकारण करणारे राज्यकर्ते असतील, तर संसर्ग आटोक्यात येण्याऐवजी तो वाढणार हे निश्चित आहे.

लोकांची समजूत काढण्याऐवजी, सर्वसामान्यांच्या जिवितापेक्षाही राजकीय स्वार्थाला महत्त्व देणाऱ्यांनी लोकांच्या धार्मिक भावना चेतवण्यावर जोर दिला. बिहारमध्ये तर निवडणुकीचा काळ ; त्यामुळे कोविडसंसर्ग वाढला तरी बेहत्तर, पण मतदार नाराज होता कामा नयेत, हेच राजकीय पक्षांचं धोरण असणार ! त्यातूनच देवी विसर्जनावेळी वेळकाढूपणा करण्याची मस्ती नवरात्र मंडळांनी केली.

रात्री उशीरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. पोलिसांना निवडणुकांसाठी बंदोबस्ताचं नियोजन करायचं होतं. त्यामुळे विसर्जन मिरवणुका मध्यरात्रीपूर्वीच आटोपाव्यात, यासाठी पोलिस प्रयत्नशील होते. मंडळं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यावरून पोलिस आणि मंडळांमध्ये बाचाबाची सुरू होती. एक मंडळ रस्ता अडवून बसल्यावर पोलिसांनी दुसऱ्या मंडळाला मिरवणूक पुढे घ्यायचा आग्रह केला. तिथे प्रथा आडवी आली.

मुंगेरमधली देवीची मोठी मूर्ती पुढे राहणार व तिचं विसर्जन झाल्याशिवाय इतर मूर्त्यांचं विसर्जन होत नाही, या चालत आलेल्या परंपरेत खंड पाडायलाही मंडळं तयार नव्हती. त्यामुळे कोंडी होऊन तणाव वाढला आणि दीनदयाळ उपाध्याय चौकात पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. सोबत गोळीबारही झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अनुराग पोद्दारचा मृत्यू पोलिसांच्या नव्हें, तर समाजकंटकांच्या गोळीने झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी मिरवणुकांतून पिस्तुलं, जिवंत काडतूसं जप्त केली आहेत.

मात्र, या घटनेचं प्रत्युत्तर देताना बिहार पोलिसांनी जो दिल्ली पोलिसांचा पॅटर्न वापरला, तो कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय ठरत नाही. दंगल करायची त्यांनी केली असेल, पोलिसांनी देवीच्या मिरवणुकीत सामील भलत्याच भाविकांना घेरून सूडाच्या भावनेने निर्दयतेने बदडलंय. कोणताही हल्ला किंवा प्रतिकार करत नसलेल्या जमावावर पोलिसांनी क्रूर लाठीमार केलाय. त्यात कित्येकजण जखमी झालेत. पोलिसांचं म्हणणं आहे, दगडफेकीत त्यांच्यातीलही कर्मचारी-अधिकारी गंभीर जखमी आहेत.

इतकी गंभीर घटना घडूनही ती वृत्तवाहिन्यांचा पडदा व्यापू शकली नाही. समाजमाध्यमांतही म्हणावा तसा असंतोष उमटला नाही. दुर्गा विसर्जनावेळी पोलिसांच्या लाठीमाराची घटना घडते, तरी हिंदुत्ववाद्यांनी कमालीचा संयम दाखवला. अर्थात, तो निर्लज्ज सोयीचा संयम होता. कारण बिहारात भाजपाचं‌ सरकार आहे. इथे भाजपाचं आणि टोळधाडीचं हिंदुत्व केवळ राजकीय सोयीचं असतं, ही बाब पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली.

हीच घटना जर महाराष्ट्र किंवा पश्चिम बंगालात घडली असती तर हिंदुत्ववाद्यांनी आकाशपाताळ एक केलं असतं. विखारी फूत्कार सोडले असते. देशभर विद्वेषाचा नंगानाच केला असता. पण तसं झालं नाही. भाजपा आणि तिची टोळधाड या घटनेवर चीडीचूप आहे. ज्यांना स्वस्थ बसवत नाही, त्यांनी कोडगेपणाने नीतिशकुमारांना लक्ष्य केलं आणि विरोधक गप्प का, असा अनाकलनीय सवाल केला.

वास्तवात, काॅंग्रेस, राजद, कन्हैय्याकुमारांपासून सगळ्याच विरोधकांनी हा विषय लावून धरलाय व ‘ देवीचं विसर्जन करण्याचाही अधिकार लोकांना नाही काय, असा सवाल करत जदयु-भाजपाची कोंडी केलीय. बिहारमध्ये तशीही जदयु-भाजपाची हालत खराब होती. मूंगेर घटनेने ती आणखी दयनीय केली. समाजमाध्यमांत हिंदुत्ववादी टोळधाडीची अवस्था सहन होत नाही नि सांगताही येत नाही, अशी असली तरी जनमानसांत संताप आहे आणि त्याचे दुष्परिणाम राज्यभर जदयु-भाजपाला भोगावे लागतील, असं वातावरण आहे.

 

 

राज असरोंडकर

कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक व मिडिया भारत न्यूज चे संपादक

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!