फातिमाबी-सावित्री उत्सवानिमित्त आयोजित काव्यस्पर्धेचा प्राथमिक निकाल !

फातिमाबी-सावित्री उत्सवानिमित्त आयोजित काव्यस्पर्धेचा प्राथमिक निकाल !

फातिमाबी-सावित्री उत्सवानिमित्त आयोजित काव्यस्पर्धेचा प्राथमिक निकाल !

फातिमाबी-सावित्री पुरस्कार २०२१ काव्यस्पर्धा: या काव्यस्पर्धेत महाराष्ट्रभरातून ११५ कवींनी सहभाग नोंदवला. परीक्षकांनी त्यांच्या कवितांतून २५ निवड केली. या कविता पुढीलप्रमाणे आहेत.  यातील सर्वोत्कृष्ट ३ कवितांची निवड १२ जानेवारी रोजी घोषित करण्यात येईल. संबंधित कवींना फातिमाबी-सावित्री उत्सव कार्यक्रमात गौरवण्यात येईल.

१) आभाळ...

 

आई धरणी, तर बाप आभाळ असतो..
भेगाळलेल्या जमीनीला हिरवं गार करतो..
दुभंगते धरणी माय जेव्हा,
धाय मोकलून रडते,
उसवलेलं आभाळ, क्षणात माय शिवते...

कसं जमतं गं माय तुला
कसं सारं सांधतेस,
कुठल्या डिक्शन-या, कुठलं गुगल
कुठली इयत्ता शिकलेस...??

हाताला पोळतं, जीवाला जाळतं
डोळ्यात कधी पाणी बी येतं,
तरीही कसली तक्रार आजवर
माझ्या आठवणीत कधीच नाय...

पोटाला चिमटा काढून, "भूक नाय" चं कारण सांगतेस
आतडं तिळतिळ तुटतं, जेव्हा तू आजारी असतेस..
कधी रागावलो आम्ही बी, तर वासरा सारखं जवळ करतेस..
माया, प्रेम दाटून येतं, सारं विसरुन जातेस...

डझनभर मित्र आमचे, वॉट्स अॅप, फेसबुक, इंन्स्टाग्राम
घर, किचन न् आम्ही सारे, तुझ्या जगण्याचा अविभाज्य भाग,
आमच्या यशाचा आनंद, तुझ्या डोळ्यात मावत नाय..
आनंदी असण्याला "कारण", तुला कधीच लागत नाय...

तू असतेस घरी, तेव्हा भरुन पावतं सारं
नसलीस कधी तरी, तर खायला घर उठतं,
ही नसते जादू, नसतं काही खोटं नाटं
एक जीव, दोन शरीरं
दोन देहांमधलं अंतर असतं....

प्रकाश बोर्डे, ठाणे

२) ' बा '

 

तू उभारलेला समतेचा गाढा
दोन पावलं ही पुढं सरकला नाही
माणूस फक्त जातीला उराशी कवटाळून
रक्तपात करून धर्म अधर्म यांत गुंतला आहे.
अन्यायाची शृंखला वाढली असली तरी
न्याय मागण्यासाठी तू दिलेल्या संविधानाकडेच
साऱ्यांना वळावे लागते हे मात्र खरंय.
पण लेखणीच्या किमयागारा !!
तू लिहिलेल्या त्याच मानवतेच्या उध्दाराच्या ग्रंथाला
जाळण्याचे - उद्धवस्थ करण्याचे
वेगवेगळे डावपेच रचले जात आहेत.
दगडा देव बनवून माणसाला दगड मारणे चालूच आहे
वेगवेगळ्या रंगाचे झेंडे घेऊन
अविचारी माणसांचा जथ्या
माणसाला उध्वस्त करण्यासाठी
वाड्या वस्त्यांवर कूच करतोय
पुतळ्यात तुला शोधणारे त्यापुढे हरले आहेत
पुस्तकातून तुला भेटणारे त्यांना भिडले आहेत
क्रांती-प्रतिक्रांती, वाद प्रतिवाद करू पाहणारे
तुझ्या पावलावर डोकं ठेऊन तुलाच कोसणारे
जगण्याच्या साऱ्या सुविधा घेऊन तुझा राग करणारे
मूलभूत हक्क सांगून मूलभूत कर्तव्य विसरलेले
त्यांना ही तुझी आणि तू दिलेल्या धम्माची गरज आहे
काही बेईमान होऊन व्यवस्थेपूढे झुकले असली तरीही तुझा विचार घेऊन माझ्या सारखीच असंख्य लेकरं
रक्ताचा थेंब ही न सांडता अव्यवस्थेशी लढा देत आहेत
आम्ही पेरत चाललो आहोत तुझी विचारधारा
आमच्या चिल्यापिल्यांत आणि
येणाऱ्या असंख्य पिढ्यांच्या अंतर्मनात.
तू हाती दिलेली लेखणी आणि ही वाचा,
सूर्य झाकण्याचे सामर्थ्य ठेवतो आता आम्ही त्यातून
तू बाप आहेस आमचा !!
तू सर्वांनवर केलेल्या जन्मोजन्मीच्या उपकारासाठी
तुला एकदा कडकडून मिठी मारायची आहे.
तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन धन्यवाद म्हणायचं आहे.
तुझ्या समतेसाठी जगायचं आहे !!
तुझ्या समतेसाठी मरायचं आहे !!

 रोहित जगताप, पुणे

३) बळी

 

भेदरलेली 'ती'
त्याने नजर रोखली
पाखरू अलगद सापडेल
त्याने तिला हेरली
आव आणला मदतीचा
अशी सलगी केली
माणुसकीचे खोटेच नाते
'ती' त्यातच गुरफटली
ठेऊन विश्वास स्वतःची कर्मकहाणी मांडली
मन केलं मोकळं आणि
तिथंच ती फसली
'करीन मदत सारी तुला'
दिला जसा भरवसा
त्याच्या संगतीला गेली
एकांतात भर दिवसा
दिवस असून तिची ती
'काळरात्र' ठरली
पुरुषी बळापुढे एक स्त्री
पुन्हा बळी ठरली
मोर्चे, नारे, शांतता, स्तब्धता
घोषणाबाजी, कायदेबाजी
सारीकडे घुमली
ती मात्र सरणावर
कायमची पहुडली.
घोषणाबाजी संपली,
नाराही विरला, काळही सरला
मिळाला होता सुका सुका
कैवार समतेचा
तोही आता निवळला
आणि....
आपल्यातलाच एक बळी
समाजानेच गिळला
आपल्यातलाच एक बळी
समाजाने गिळला

स्वाती संजय भोईर, पालघर

४) जन्माची शिदोरी

 

जन्म उभा उंबऱ्याशी
एका रात्रीचा पाहुणा
आई तुझ्या गं कुशीचा
कुठे शोधु मी बहाणा

कुणा सांगु उलघाल
नि:शब्द ही मौन रात
वर डोळा पाणी अन्
सांज अभ्रे काळी आत

सांज सडयाचे शिंपण
माझे भातुकले क्षण
किती किती वेचू पाहे
मन मातीचे हे कण

जाण झाली माझी मला
आता संपली खेळणी
बाईपणाच्या गं खुणा
आली घेऊन पाहुणी

कुजबुजे पाणवठा
झाला विटाळ विटाळ
तुही सोसलास ना गं
असा कानोस्याचा काळ

बघ झाली ना गं पुन्हा
हीच शिळी पत्रावळी
जन्मजन्माची शिदोरी
अळीमिळी गुपचिळी....

डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे, वसई

५) पोरगं अधिकारी झाल्यावर

 

आपल्या दुःखाचा चाप फुटल
असं स्वप्न बघणाऱ्या आईबापाला
दुःखातून वर काढायचं कसं याचं उत्तर
हल्ली मला मिळत नाही
कारण ढगफुटीमुळे
शेतात झालेलं नुकसान नजरेला पडतं तरी
पण पेपर फुटिमुळे काळजात झालेला भूकंप
कुणालाच दिसत नाही

नोकरी नाही म्हणून आपलं प्रेम दुसऱ्याच्या गळी बांधलं जातं ना,
त्या प्रेमभंगाचं दुःख काय असतं हे तुम्हाला माहिती नाही साहेब
कारण बेरोजगारी तुमच्या दाराला कधी शिवत नाही
इथं लाइब्ररित बसून आमच्या ढुंगणाला फोड येतात
पण तुमच्या तोंडातून जागा सुटल्याची बातमी थोडीसुद्धा येत नाही

आलीच आमची दया कधी
तर तुम्ही काढता पाच लाख पोरांमागं ७० जागा
तेव्हा प्रश्न पडतो,
पाऊस जसा शेतकऱ्यांशी खेळतो
तसे तुम्ही आमच्याशी तर खेळत नाही
आणि दर परीक्षेला आम्हा बेरोजगारांकडून
हजार पाचशे फी घ्यायला
तुम्हाला थोडीसुद्धा लाज कशी वाटत नाही

कोळंबे, देसले, राज्यघटना हेच आमचे पोट आणि जीवनग्रंथ आहेत
त्यामुळे आम्ही दुसरे कुठलेच धार्मिक ग्रंथ
आम्ही थोडे सुद्धा चाळत नाही
इथे पोटाचाच प्रश्न मोठा बनलाय
कारण इथला मेसवाला पैसे दिल्याशिवाय
एकवेळचं जेवण सुद्धा देत नाही

स्पर्धापरीक्षेच्या जीवावर क्लास, नाश्ता, झेरॉक्स
हे रोजगार उभे राहतात
पण आमची बेरोजगारी काही केल्या मिटत नाही
दर महिन्याला बाप पैसे पाठवतो ना
तेव्हा त्याने ते कसे मिळवले असतील
हा विचार करून खरं सांगतो रात्र रात्रभर झोप येत नाही

तुम्ही जसं बाटलीतलं पाणी विकत घेता ना
अगदी तसच आमच्यासाठी आमच्या बापानं
घामासोबत रक्त सुद्धा विकलं आहे
इथं स्पर्धा परिक्षा करणं सोपं नाही भाऊ
कारण इथल्या प्रत्येक शासनाला आरक्षणात सुद्धा
राजकारणच दिसलं आहे

स्पर्धापरीक्षेला जुगार, नशिबाचा खेळ काही म्हणा
तरी आम्ही खेळतो
कारण आम्हाला ठावूक आहे
तुमच्याकडून इथल्या शेतकरी, बेरोजगार कामगारांना
कुठलीच सुरक्षा नाही
मग हे वरचं सारं तुमच्यासकट बदलायचंय म्हणून
आम्ही लढत आलोय, लढत राहू, कारण
आम्हाला अडवेल अशी जगात कुठलीच परीक्षा नाही...

शेखर चोरघे, पुणे

६) सावित्री तुझ्यामुळेच ...

 

सावित्री , तुझ्यामुळेच मी आज शिकते आहे
अन् ताठ मानेने जगते आहे .
झुगारून दिल्यात कधीच मी पुरुषी वर्चस्वाच्या बेड्या
पण वासनेची शिकार मात्र अजूनही होत आहे !

चूल , मूल अन् नोकरी सांभाळून
त्याच्या खांद्याला खांदा देऊन लढते आहे
स्त्रीचं महत्त्व ,मूलीचं अस्तीत्त्वही कळते आहे
पण अन्याय , अत्याचाराचा बळी आजही जातच आहे !

त्याने हार मानली पण मी खचले नाही
अन् कोणतेच क्षेत्र बाईविना उरले नाही
तुझ्या सारखीच खुप झगडते आहे
आणि तुझीच प्रेरणा मला जगवते आहे

मुलगी शिकली की प्रगती होते
हे आता अनेकांना कळते आहे
तुझ्यामूळेच क्रांतीज्योती सावित्री
मुक्या कळ्यांना जीवदान मिळते आहे !

मनोहर दुलाजी मोहरे, पुणे

७) कुंकू

 

तिच्या कपाळीचे कुंकू, गेले अर्ध्यात पुसून
तालेवार होती बाई, तरी पडली मोडून

उठू पाहे वेळोवेळी, धीर देण्या लेकरांना
तरी पुन्हा कोसळते, आरशात बघतांना

पदराच्या आडोशानं, झाकू पाही आसवांना
घात करितो हुंदका, धका लावी जखमांना

तरी बळेच घेतले, तिने जुंपून कामाला
होता कर्जाचा डोंगर, वारसानं मिळालेला

भले उपसती कष्ट, तरी जुळेना हिशोब
भाकरीची गाठभेट, पडू देईना नशीब

गाठी गाठीचे लुगडे, भोके पडलेली चोळी
जरी फाटका पदर, तरी ओढतसे भाळी

आता नाही येत पाणी, झाली डोळ्यांची खासाडे
आणि पिळू पिळू तिने, वाळू घातले आतडे

असे होते गोंधलेले, दुःख कुंकवाच्या खाली
आणि उजागर झाले, जेव्हा पुसली टिकली.

मारुती सावंत, अहमदनगर

८) सावित्री

 

सावित्री तुझी ही अन सावित्री माझीही
फरक एवढाच की,
तू सत्यवानाच्या सावित्रीला पूजते
अन मी फुल्यांच्या सावित्रीला वाचते

सावित्री तुझी ही अन सावित्री माझीही
फरक एवढाच की,
तुझी सावित्री काल्पनिक
अन माझी सावित्री मूर्तिमंत सत्य

सावित्री तुझी ही अन सावित्री माझीही
फरक एवढाच की,
तुझ्या सावित्रीने पतीचे प्राण आणले यमाकडून?
माझ्या सावित्रीने समस्त स्त्रियांची मुक्तता केली गुलामगिरीतून

सावित्री तुझी ही अन सावित्री माझीही
फरक एवढाच की,
तुझी सावित्री मानते 'पती हाच परमेश्वर'
अन माझी सावित्री सांगते
तू शोध तुझी अस्मिता स्व:कर्तृत्वात पतीबरोबर

सावित्री तुझी ही अन सावित्री माझीही
फरक एवढाच की,
तुझी सावित्री तुला बांधून ठेवते वाटपौर्णिमेच्या धाग्यात
माझी सावित्री मला शिक्षित बनवून, सुसंस्कृत करून सोडते या जगात

मग आता तूच ठरव!
सावित्री कुणाची श्रेष्ठ?
सत्यवानाची की फुल्यांची!!

अनिता कांबळे, ठाणे

९) "तू आमच्यासाठी काय केलं..?"

 

म्हणे काळे मणी-डोरलं बांध गळ्यात
राबत राहा "सासर" नावाच्या मळ्यात!
हिरवा चुडा आहे सुवासिनीचं प्रतीक
काचेच्या त्या बेडयांनी केलय तुला अगतिक!
विचारांची शृंखला केव्हाच तुझी मावळली
धन्याच्या नावाची टिकली जेव्हा तू लावली!
पायात तोरडे चांदीचे आले
अन घराबाहेरचे रस्ते तुझे तिथेच संपले!
पायांत तुझ्या "जोडवी"
शेजारीण म्हणे छान दिसे
तुझ्या शिक्षणाचे धडे वाऱ्यावर गेले जसे!
मुलं-बाळ सांभाळत सरत आलं जीवन
काल्पकतेच आणि विचारांचं झालं तुझ्या मरण!
नवऱ्यासाठी तू स्वतःच्या इच्छांना घातलीस मुरळ
आणि स्वप्नांना मात्र पडली तुझ्या भुरळ!
सासू-सासरे, नंदा-जावा
सगळ्यांचंच हसत हसत केलं
तरीही अंती प्रश्न उभे ठाकले
तू आमच्यासाठी काय केलं
तू आमच्यासाठी काय केलं...?

सृष्टी गवई, उल्हासनगर

१०) || तूच तुझी ||

 

विझवू नकोस
अस्तित्वाचा दिवा;
ती नव्हेच दवा
मुक्ततेची.

पायांमध्ये तुझ्या
संस्कृतीच्या बेड्या;
नीतिग्रस्त मोळ्या
मनावर.

सभोवती उभे
वासनांध पशू;
मृगजळी अश्रू
गाळताना.

यथेच्छ भोगून
फेकून देतात;
संसारकुंडीत
वंशातूर.

कुठवर बाई
चुलीत जळत;
भिंतींत दडत
राहशील?

गांधारी, सावित्री
द्रौपदी नि सीता;
नकोस गं आता
पुन्हा होऊ.

तू तुझी सांगाती
तू तुझी पणती;
शक्ती आणि गती
तूच तुझी.

फाडून बुरखा
विद्रोही सुरूंग;
क्रांतीचे पराग
पेर आता...!

मिलिंद हिवराळे, अकोला

११) गोतावळा मिळाला!

 

सख्खे करू न शकले, इतका लळा मिळाला!
"गझले" तुझ्यामुळे हा, गोतावळा मिळाला!

बेड्या खुळ्या प्रथांच्या, मी तोडल्यात जेंव्हा,
घेण्यास श्वास तेंव्हा, मज मोकळा मिळाला!

विसरू नका मुलांनो, उपकार त्या पित्याचे,
ज्याच्यामुळे तुम्हाला, खडु अन फळा मिळाला!

घरच्या घरीच मजला, बापात देव दिसतो,
सांगा कुठे तुम्हाला, जर वेगळा मिळाला?

कापा हजार वेळा, उगवेन लाखदा ती,
या चळवळीस आता, पोषक मळा मिळाला!

रमेश अरुण बुरबुरे, यवतमाळ

१२) बाप चालतो घराची वाट

 

आडवा तिडवा पाऊस मारा, डोईवर घेऊन पेंडीचा भारा
काठी टेकत टेकत. बाप चालतो घराची वाट.

शेत आहे दोन मैल दूर, जायला लागतो तासभर
हिरवं हिरवं गवत कापून कापून, त्याचा भारा बांधून बांधून
धापा टाकत टाकत.
बाप चालतो घराची वाट.

डोंगर दरीतून वाहत येई ओढा, तो पार करायला अवघड थोडा
ते वाहत पाणी पाहून पाहून , काळीज जाई चराचरा कापून कापून
पाण्यात काठी टेकत टेकत
बाप चालतो घराची वाट

वाट दगड गोटयाची, पायाला काटेकुटे टोचायची
पायातून रक्त येऊन येऊन , वाट जाई न्हावून न्हावून
रान तुडवत तुडवत
बाप चालतो घराची वाट

वाटेत येई आडवा साप ,एका काठीत मारी त्याला बाप
गाणी गाती रानात पाखरं पाखरं ,वाणी ऐकत त्याची मधूर मधूर
गाण्याच्या नादात नादात
बाप चालतो घराची वाट

नभातून कोसळती पाऊस धारा , अंगाभोवती घोगावे थंड वारा
गोठ्यात हबरती वासर वासर, जणू ती बापाची लेकरं लेकरं
त्यांच्या ओढीनं ओढीनं ,
बाप चालतो घराची वाट

बाप येण्याची लागता चाहूल , गुरांची गोठ्यात वाजती पाऊल
मोती शेपूट उडवत उडवत , सांगे बापाशी नातं अतूट
मोत्याच्या पाठीवर हात फिरवत फिरवत
बाप चालतो घराची वाट

अर्जुन विष्णू जाधव, कोल्हापूर

१३) घे नारी तू भरारी!

 

थांबले तुला वाटले आकाश
ते क्षितिज होते वेडे.
झेप घेण्या मार्ग बहू!
नारी तू चाल पुढे...१

स्वत्त्व सिद्ध करण्यासाठी
किती काळ थांबतेस?
आत डोकाव ना जरा
का वेळ दवडतेस?...२

मोहपाश नात्यांचा
मृगजळ आहे कळतंय ना?
मुखवट्या मागला चेहरा
वेगळा समजतोय ना?...३

राखेतल्या फिनिक्स पक्ष्यासम
चिवट स्त्री जात असे.
सजग रहा नि प्रामाणिक
यशशिखर दूर नसे...४

उगाच होऊ नको सैरभैर
तूच आहेस कस्तुरी!
गरूडा सम हो पुनर्जीवित
घे नारी तू उंच भरारी..५

- प्रभा शांताराम वाघ, पुणे

१४) पाणी

सांजावलं सांजावलं - नभ मेघांनी भरलं,
ओथंबुनी खाली आलं - धारा होऊनी |

सृष्टीला या शृंगारलं - फुलारून रान आलं,
भात शेत तरारलं - चिंब भिजुनी |

खडकांत झिरपलं - निर्झराचं रूप ल्यालं,
रानी, वनी खळाळलं - गोड होऊनी |

उंच डोंगरी पडलं - दरीतून कोसळलं
भूमीवर झेपावलं - धबाबा होऊनी |

पावसाचं पाणी आलं - नदी-नाल्यांना भेटलं,
तहानेला तृप्त केलं - थेंबाथेंबांनी |

वाहूनिया थेट गेलं - सागराला बिलगलं,
जीवन हे अनमोल - जपू जीवनी |

वृषाली संजय इनामदार, पुणे

१५) पोरी

 

पोरी रानात खेळती
झाड वाऱ्याच्या संगती
त्यांच्या पावलांचे ठसे
ओल्या मातीत रंगती!

पोरी आभाळ झेलती
पोरी झाडाची पालवी
घेती झोकात गिरकी
पोरी पाण्याला हालवी!

पोरी पाण्यात मासोळी
पोरी आभाळ आरोळी
पोरी पापण्या झाकल्या
टाळी नजर बारोळी!

पोरी अथांग चाहूल
पोरी झिम्माड पाऊल
पोरी ताड-माड वाढ
पोरी पणती राऊळ

पोरी खोप्यात आईना
पोरी रानच्या गं मैना
पोरी बिल्लोरी पाकोळ्या
पोरी सोसती गं दैना!

पोरी कळत्या बाहुल्या
पोरी जळत्या सावल्या
त्यांनी रक्तात न्हावून
ज्योती तेजाच्या लावल्या!

पोरी रानीचा ढेकूळ
पोरी उद्धरती कुळ
पोरी सासरी नांदती
झाकी वेदनांचे मूळ!

पोरी खेळाव्या अंगणी
पोरी लढाव्या गं रणी,
पोरी कळून घेतांना
ओली हळद गं मनी!

बाप पोरींचा होतांना
आई जणू झाली पोर,
सखी सांभाळली मी रे
पायी बांधला ना दोर!

शशी त्रिभुवन, अहमदनगर

१६) दलदल..

 

घेतला आहे मनाचा कल तुझ्यासाठी ,
शेवटी झालोय मी हतबल तुझ्यासाठी !..

मी तुला ओळख तुझी पटवूनही देतो ,
एकदा माझ्याबरोबर चल तुझ्यासाठी !..

जन्मभर जपले तुझ्या नाजूक हातांना ,
जन्मभर मी काढले टरफल तुझ्यासाठी !..

फक्त प्रेमाने तुला मी मिळवले आहे ,
लावले नाही कधी मी बल तुझ्यासाठी !..

पळवली आहे पुन्हा गाडी तुझ्या मागे ,
तोडला आहे पुन्हा सिग्नल तुझ्यासाठी !..

व्याज मी फेडू तुझे शकलो न केव्हाही ,
मी जमवलेली तरी मुद्दल तुझ्यासाठी !..

अकबरा नाही तुझे डोके ठिकाणावर ,
एकदा यावा इथे बिरबल तुझ्यासाठी !..

तू रुतत गेलीस नंतर खोलवर माझ्या ,
मी बनत गेलो पुढे दलदल तुझ्यासाठी !..

जयेश पवार, मुंबई

१७. स्वातंत्र्य आणि लोकशाही

 

कोणता करावा आज सत्याग्रह पुन्हा नव्याने
दुधात मीठ टाकणारे आहेत भोवती झुंडीने

हिंसा नव्हती जन्मभर तरी शेतात गळफास
सांगा कोणता धर्म आज बापू चालतो सत्याने

कोणती चळवळ आहे आता खेडे सुधारण्याची
यात्राच भरते लुटायला माणसे जिरली यंत्राने

कसा ठेवावा विश्वास आपुलीच गळे कापती
भंगली जेथे तेथे शांतता कसे वागावे संयमाने

श्रमात गेली हयात समतेचा नारा आज नाही
कोण येथे निर्भय आहे वाचली जरी गीता नव्याने

चिरडली आंदोलने कशी अश्रू डोळ्यात दाटती
विकला गेला गाव सारा कित्येकांच्या एका मताने

दिसते आज नावालाच स्वातंत्र्य आणि लोकशाही
काय पाडिला वृध्दाश्रम सांगा कोणत्या सुताने

अडकून राहिली बापू तत्वे पुस्तकांच्या पानांत
येथे लुटला देश सारा खादी घालून पुढाऱ्याने

संतोष बोंगाळे, सोलापूर

१८)

साउली काय देते उन्हाला पुसा
माउली काय देते स्वतःला पुसा

उतरते हिरकणी का कडा उंच तो
दूध जळते उरी त्या कड्याला पुसा

कोणते दुःख ती हासुनी लपविते
पापणीतील त्या आसवाला पुसा

कोठुनी आणते धैर्य जगण्यास ती
हे तिच्या भाबड्याश्या मनाला पुसा

पाउले जड तुझी सांग होतात ना
नेत असता तिला त्या यमाला पुसा

पूजा मुनीश्वर, चिंचवड

१९) आयुष्य असे

 

आयुष्य असे
सुखदुःखाचा खेळ
सारेच प्रयत्न करती
बसवण्यास मेळ

पाहिले ज्याने
निरभ्र आकाश
त्याला मिळाला
चंद्र प्रकाश

अंधाराकडे दृष्टी
गेली कुणाची
गमावली किंमत
त्याने क्षणाची

चमकणाऱ्या डोळ्यांना
असते दिव्यदृष्टी
कुंपण पाहणाऱ्यांना
नाही लाभत सृष्टी

क्षितिजा राहुल देऊस्कर, कर्नाटक

२०) अस्तित्व

 

तुझ्या अस्तित्वाचा शोध,
माळेच्या जपात,
मौनात अन ध्यानात,
कधी तासन तास असणाऱ्या,
ग्रंथ पठणात,
तर कधी टाळ मृदुगाच्या कीर्तनात!
तू मात्र ओझरता दिसलास,
उगवत्या अन मावळत्या सुर्यात,
चांदणं शिपणाऱ्या चंद्रात,
अलवार थंड वाऱ्यात,
पहिल्या सरीच्या पावसात,
अन मातीच्या ओलसर स्पर्शात !
कधी कधी तू हसलास खळखळून,
निरागस मुलासारखा,
कधी सतत उभा ,
सावली बनून आईसारखा !
तुझ्या अस्तित्वाचा शोध,
एक फोल प्रयत्न मात्र,
अन तू सतत माझ्यासोबत,
माझ्या श्वासात अहोरात्र

- सिंधु विठ्ठल जाधव, लोणावळा

२१) बरे वाटते...!

 

संबंधांची नाळ कोवळी तुटल्यानंतर बरे वाटते,
आपल्यामुळे काम कुणाचे अडल्यानंतर बरे वाटते!

सहानुभूती दाखवल्याने काय फायदा होता; सांगा,
घरी कुणाच्या अनुचित काही घडल्यानंतर बरे वाटते!

स्वत: जिंकल्यावरती तितका कुणी होत नाही आनंदी,
जितके कोणी सखे-सोबती हरल्यानंतर बरे वाटते!

हाल कुणाचे विचारण्याची गरज कुणाला आहे इतकी?
एखाद्याच्या दु:खावरती हसल्यानंतर बरे वाटते!

हल्ली सांत्वन केल्यानंतर कमीपणा वाटतो मनाला,
जुन्या कुणाच्या जखमांना टोकरल्यानंतर बरे वाटते!

साध्या-सोप्या कवितेमध्ये हवी तेवढी गंमत नसते,
जातीवरती, पंथावरती, लिहिल्यानंतर बरे वाटते!

दु:ख आपल्या हृदयामधले सांगत जाऊ नये कुणाला,
स्टेटसवरती लिहून सारे, रडल्यानंतर बरे वाटते!

अविनाश कृष्णाराव काठवटे, औरंगाबाद

२२) सगळी दुःख पचवायची ,ठरलंय ना..!

 

"सगळी दुःख पचवायची ,ठरलंय ना"
का येतंय डोळयांत पाणी मग
दुष्काळ तिथेही हवाच ना !
फुल हातात आहे,
सुगंधच घेता येत नाही,होतंय असं
पण मनानेही झिरपून जायचं,ठरवलंय ना
सगळी दुःख पचवायची ठरलंय ना ...

उंच उंच डोळे जाताच
अनेक डोळ्यातून किरणं येतात ।
आडव्या,तिरप्या रेघा समोर वंदन करतात
खरंतर त्या विचारहीन लाटेतुन उडताना
दमछाक फार होते,
कारण प्रत्येक पर्ण पानाझडीची वाट नाही पाहात
एखादा फुलपाखराचे स्वप्नही डोळ्यात घेऊन असतो ।।
ऋतू इतकं नाही सहज बदलता येत
डोळ्यातल्या थेंबांना नाही थांबवता येत.. हो हो
सगळी दुःख पचवायची ,
आतल्या कोरडीवर बाग हक्काची फुलवायची..

क्षितिजावरून पैलतीर गाठताना हिरवळ खूप दिसते
डोळ्यातल्या खाचा फोडणाऱ्या
प्रत्येक काट्याला संधी सहज मिळते ।।
काट्याने काटा काढताही येतो
पण त्याची जाणीव का ?..गुलाबाला नसते
अंशा अंशात कस्तुरी आतून बोलत असते
तिला गप्प नाही करता येत
प्रत्येक हुंदका नाही दाखवता येत ।।
ठरलंय पण सगळी दुःख पचवायची...

मनातल्या पदराला गाठी अनेक बांधल्या
पुढचं पाऊल टाकताना वाटाच नव्या वळल्या
खूपतय, दु:खतंय,
काहीतरी अगदी मनापासून खुणावतय
दोन थेंबांवाचून माझं काही न उरलंय
झेपावत्या मनाला कोसळतीचा डंख
उगा नाही पुन्हा उगाळायच
डोळे मिटून थेंब गिळून
दुःख नाही उगाळायचं

मिटलेली पानं पुन्हा पलटायचीय
हापापलेला सुगंध घेऊन वाट नवी गाठायची
खदखदून हसण्यासाठी ,दोन शब्द लिहिण्यासाठी
समोर खडक दिसेल
त्याला भेदण, छेदण तुझ्या थेंबांना सहज जमेल
ते तू कर..
मोरपंखी हातांनी पिसारा बांधून नको ठेऊस
त्यालाही नाचू दे,कवाडं फोडून उडू देत
कारण ..कारण
जरी सगळी दुःख पचवायची
तरी स्वप्न नाही मारायची

रेणुका आरती मंगेश देशपांडे, पुणे

२३) माणसे (गझल)

 

फायद्याचे कायदे पाळतात माणसे
वायदे सांभाळणे टाळतात माणसे

सुख ज्यांना संचिताने भरून लाभते
का तरी जीवास मग जाळतात माणसे

वाचल्यावाचून का वाचणार पुस्तके !
वाचल्यावाचून वाचाळतात माणसे

पाहुणी होऊन येते घरात वेदना
मग अशा जगण्यास कंटाळतात माणसे

आत नाही ओल थोडी कधीच पाहिली
वरलिया रंगास का भाळतात माणसे ?

लाड होती श्वापदांचे घराघरातुनी
माणसावर रोज चवताळतात माणसे

मीच माझ्या वेदनेला दिली तिलांजली
कोरड्या डोळ्यांत अश्रु ढाळतात माणसे

संजय पठाडे, राळेगणसिद्धी

२४. संविधानाचा प्रकाश तू

 

आता ना ब्राह्मण तू, आता ना क्षत्रिय तू
आता ना वैश्य तू, आता ना शुद्र तू
आता ना रुद्र तू, आता ना अतिशूद्र तू
आता ना स्त्री तू, आता ना पुरुष तू
आता फक्त माणूस तू, अन संविधानाचा प्रकाश तू !

आता ना काळा तू, आता ना गोरा तू
आता ना राम तू आता ना कृष्ण तू
आता ना देव तू, आता ना दानव तू
माणुसकीने वागणारा, अरे माणूस तू
आता समतेचे आकाश तू, संविधांनाचा प्रकाश तू !

आता ना उच्च तू, जातीचा गुच्छ न तू
अंधश्रद्धेचे गाव न तू, दांभिकतेची नाव न तू
आता ना राजा तू, आता ना राणी तू
स्वातंत्र्य तुझे हक्काचे, आता ना गुलाम तू
बंधुतेची आस तू, संविधानाचा प्रकाश तू !

ना हिंसक हिटलर तू, ना अहंकारी सद्दाम तू
ना लादेन तू, ना सनातन उद्दाम तू
कायद्याचे पाय तू, सामाजिक न्याय तू
देशासाठी जगणारी, लोकांची माय तू
खरा भारतीय तूच तू, संविधानाचा प्रकाश तू

त्यागातून स्वातंत्र्य ज्यांनी आणले देशात या
त्या हुतात्म्यांचा वारस खरा आहेस तू !
धर्मांधता जाळणारा, एक नवा नायक तू
देशाचे ऐक्य गाणारा, उमदा गायक तू
देशोन्नतीची आस तू, संविधानाचा प्रकाश तू !

धर्म, जात, वंश, लिंग भेद इथले घालवणार तू
ना हिंदू, ना मुस्लीम, ना शीख, ना इसाई तू
भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व हे आमचे तत्वज्ञान तू
एकात्म देशाचे माझ्या .. अवधान गड्या तू
सत्यमेव जयतेचा ध्यास तू, हितकारी संविधानाचा प्रकाश तू !

विषमय जुन्या जीर्ण रुढींचा नकार तू,
घराणेशाही घालवणारा नवा होकार तू
धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा सैनिक निष्ठावंत तू
दमनकारी कुत्र्यांचा करणार नक्कीच अंत तू
पिचलेल्या जीवांचा घास तू ! संविधानाचा प्रकाश तू !

घे सर्वांचे हात हातात तू! अन गा नवे समतेचे गीत तू
नको विध्वंस चांगल्याचा कार्य हिताचे करणार गे तू
फुले विविध रंगांची, उद्यान आनंदमयी करणार तू
काळीज काळीज गुंफणारा प्रेमाचा दोर तू
निर्मळ निर्झर होण्याचा ध्यास तू, संविधानाचा प्रकाश तू

डॉ. सुभाष वाघमारे

२५) समुद्र..

 

रात्रीचा सुद्धा तू उजळ माथ्याने असतो..
अस्तास जाणारा सूर्य तुला हुंकार देतो.
गजबजलेली अवस्था वेदनांवर फुंकर मारत असते..
आणि त्याच वेळी निर्भयतेने तू आश्वासन देतो..
तुझ्याकडे पाहताना अथांग विचार येतात..
क्षितिज टेकली असताना तू मात्र त्याच विश्वासाने उभा असतो..
दिवसापेक्षा रात्रीचाच तू मला आवाहन देणारा वाटतो..
आकाशाची लाली तुला उजळून टाकते..
मन मग तुझ्यासारख खोलवर उतरत जाते..
काहीतरी गवसल्यासरख गालाताच हसते..
येणारी प्रत्येक लाट नव रूप असते..
चकाकणारा फेस हवाहवासा वाटतो..
मग मी जास्तच माझ्या प्रेमात पडते..

शालिनी आचार्य.

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!