‘रिक्त- विरक्त’ या कादंबरीत लेखिकेने एका स्फोटक विषयाला ज्या सयंतपणे शब्दबद्ध केलं ते कौतुकास्पद आहे.
सावित्री नावाच्या एका स्रीची ही कथा तथाकथित प्रचलित सामाजिक, कौटुंबिक संकेतांना धुडकावणारी आहे. ही कादंबरी वाचताना मला मंटो, इस्मत चुगताई यांना वाचल्याचाच पुनर्प्रत्यय येत होता.

प्रज्ञा दया पवार यांच्या ‘अफवा खरी ...’ च्या पुढचं दमदार पाऊल म्हणजे छाया कोरगांवकर यांची ही प्रस्तुत कादंबरी होय. ‘रिक्त- विरक्त’ हे शिर्षक विषय वेगळा असला तरी एका स्रीची घुसमट चित्रीत करणाऱ्या ‘ विरंगी मी! विमुक्त मी!’ या अंजली जोशी लिखीत कादंबरीच्या शिर्षकाची आठवण करून देते.
स्रीच्या लैंगितेपेक्षाही तिच्या मानसिक घालमेलीची, संघर्षाची आणि त्यातून तावून सुलाखून घट्ट पाय रोवणाऱ्या स्रीची कहाणी म्हणून ही कादंबरी महत्वाची आहे. नीति-अनितीच्या भारतीय संकल्पनांच्या पुनर्व्याख्येची आवश्यकता या कादंबरीने पुन्हा एकदा अधोरेखित केलेली आहे.
विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यांच्या जोडीला ह्या दोन संस्था ज्यांच्या तात्विक पायांवर उभ्या आहेत त्या समाजसंस्था व धर्मसंस्थांच्या माध्यमातून एक शोषण व्यवस्था म्हणून आधुनिकोत्तर किंवा सत्योत्तर कालखंडातही त्या कायम व ॲक्टिव आहेत. निती-अनितीच्या भ्रामक आणि अवास्तव कल्पनांचा बाऊ न करता स्वछंदी किंवा स्वैराचारी नव्हे तर विमुक्त जीवन जगण्याच्या आकांक्षेने व्यापलेल्या स्रीमनाची ही कहानी सुन्न करणारी आहे.
सावित्रीच्या माध्यमातून नातेसंबंधातील संघर्ष, कार्यालयीन जातीयवाद, छळवाद, मैत्रीतील सौहार्दता, माणसां-माणसांतील माणुसकीच्या पाऊलखुणा या कादंबरीत लेखिकेने कुठल्याही अभिनिवेशाव्यतिरिक्त रेखाटलेल्या आहेत. स्वत:ची अशी एक वेगळी कथनशैली निर्माण करण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला दिसतो. ही त्यांची पहिलीच कादंबरी असल्यामुळे यापुढे त्यांची स्वत:ची अशी कथनशैली नक्कीच विकसित होईल याची खात्री वाटते.

कादंबरीचं शिर्षक ‘रिक्त-विरक्त’ असलं तरी ही एका विरक्त स्रीची विमुक्त कहाणी आहे. थेरीगाथेतील थेरींच्या अनुभव कथनाच्या जवळ जाणारी ही एका आजच्या गृहिणीची/निम्न मध्यमवर्गीय स्रीची संघर्षगाथा आहे.
एकमेकांचा आधार झालेली एक घटस्फोटीत स्री आणि एक विवाहित पुरुष यांची निखळ पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी मैत्री आणि तरीही समाजाच्या प्रचलित दृष्टीकोणातून विवाहबाह्य संबंध या मध्यवर्ती संकल्पनेवर बेतलेल्या या कादंबरीवर मराठी वाचक आणि विशेषत: लेखिका ज्या आंबेडकरवादी प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतेय तो वाचक वर्ग किती प्रगल्भपणे रिअॅक्ट होतोय हे पाहणे औत्सुक्यपूर्ण ठरावे.
देवेंद्र उबाळे यांचं तयार चित्र मुखपृष्ठ म्हणून वापरण्यापेक्षा कादंबरीचा आशय व्यक्त करणारे स्वतंत्र मुखपृष्ठ त्यांच्याकडूनच करून घेतले असते आणि कांदबरीतील आशय मुखपृष्ठावर आला असता तर कादंबरीच्या निर्मिती मूल्यात नक्कीच अधिकची भर पडली असती.
• रिक्त-विरक्त (कादंबरी)
• लेखिका- छाया कोरगावकर
• प्रकाशक- ग्रंथाली, मुंबई.
अरविंद सुरवाडे
आंबेडकरवादी लेखक / अनुवादक