१६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुणे येथील तत्कालीन कॉलेज प्राचार्य मेजर थॉमसकॅंडी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने जोतीबा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विश्रामबागेत सरदार व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत सत्कार केला होता. त्या घटनेच्या १६९ व्या संस्मरणीय दिनाचं निमित्त साधत सुजन फाउंडेशनने अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता रोहिणी रासकर यांचा सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील गुरुकुल विद्यामंदिरात महात्मा फुले विचार अभियान व सुजन फाऊंडेशनच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी सदरच्या अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
गुरुकुलमधील विद्यार्थीनींनी सावित्रीबाईच्या ओवीचे गायन केलं. सुजन मल्टिपल निधी लिमिटेडचे संचालक व कार्यक्रमाचे संयोजक अजित जाधव यांनी महात्मा फुले विचार अभियान यशोगाथा व अभियानातील कार्याचा आढावा घेत प्रास्ताविक केलं.

सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, फुले विचार अभियानाचं मेडल, जोतीबांचा फोटो आणि रागिणी विशेषांक देऊन या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता रोहिणी रासकर यांचा सन्मान करण्यात आला. ( या सन्मानानंतर रोहिणी रासकर यांनी नायगाव येथील सावित्रीबाईंच्या जन्मगावी जाऊन पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्या. )
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष संपतराव जाधव होते. अष्टविनायक ग्लासचे दीपक शिर्के, गुरुकुल विद्यालयाच्या मुख्याध्यपिका प्रिया ननावरे, माळी सेवा संघाचे अध्यक्ष दत्तात्रय माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.