पावसाचं थैमान आणि अनुभवलेलं समाजभान!!!

पावसाचं थैमान आणि अनुभवलेलं समाजभान!!!

पावसाचं थैमान आणि अनुभवलेलं समाजभान!!!

काही ना काही कामानिमित्त घराबाहेर पडलेली अनेक मंडळी २६ जुलैच्या पावसाच्या तडाख्यात सापडली. २००५ साली रोहित जगतापनं पावसाचं थैमान वडिलधाऱ्यांच्या खांद्यावर बसून न्याहाळलं होतं. चौदा वर्षांनंतर तो स्वत: अस्मानी संकटाला सामोरं जात होता. पुण्याहून संध्याकाळी पाच वाजता निघालेला रोहित आपल्या मित्रांसोबत कधी ट्रेनने, कधी बसने, कधी रिक्षाने, कधी चालत, कधी पोहत, अडखळत, धडपडत तब्बल २७ तासांनंतर बदलापूरला आपल्या घरी पोचला. या प्रवासात रोहितने अनुभवलेलं समाजभान त्याच्याच शब्दांत…

शुक्रवारी २६ जुलै २०१९ रोजी पुण्याहून मुंबईकडे ट्रेनने प्रवास सुरू झाला. त्यात लोणावळा पोहोचण्यासाठीच आम्हाला २ तास ४० मिनिटे इतका कालावधी गेला. मी आणि माझा मित्र गणेश गीते लोणावळा उतरून धोधो बरसणाऱ्या पावसात धावत जाऊन बस पकडली व खोपोलीला उतरलो. मुंबईकडे जाणारी १०.१५ ची लोकल कर्जतला रद्द करण्यात आली. मग सुरू झाला प्रवास, फक्त घड्याळाकडे पाहण्याचा.

भयाण काळोख, त्यात चोहोबाजूंनी झोडपणारा पाऊस, रेल्वेचं ठरलेलं वाक्य कानावर पडलं “प्रवाशांना होणाऱ्या गैरसोईबद्दल आम्ही दिलगिरी आहोत.”

ट्रेन कधी सुरू होतील, यांचा काहीच अंदाज नव्हता. रात्री ११.३० वाजता बायरोड जाण्याचा विचार केला, पण बाहेर पडताच चोहोबाजूंनी पाणीच पाणी होते, त्यात काही माणसे वृद्ध अडकले होते. जीवाची पर्वा न करता, पाण्यात उतरून आम्ही त्यांना पाण्याबाहेर काढले.

आम्हाला मदत मिळावी ह्या हेतूने मी फेसबुकला एक पोस्ट केली. अनेकांनी मदतीचे कॉल केले. सर्वांचीच नावे इकडे घेऊ शकत नाही, पण माझ्याबद्दलची काळजी, आपलेपणा, प्रेम त्यांच्या आवाजातून स्पष्ट होत होते.

पुढे कर्जतला पहाटे ३.३० च्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यात पुणे बाजूला असणाऱ्या ब्रिज जवळचा इलेक्ट्रॉनिक डीपी जळाला. आवाज इतका भयानक होता की आग पाहुन सर्वांची धावपळ उडाली, संपूर्ण स्टेशनची लाईट गेली होती. प्रचंड भूक लागली होती. पिण्याचे पाणीदेखील नव्हते. अशाच अवस्थेत सकाळ कधी झाली समजलंच नाही.

डोळ्यांवर भयानक झोप होती, परंतु घरी जाण्याची ओढ ती झोप मोडून काढत होती. सकाळी सकाळी एक ऑटोवाले महेश दादा भेटले. दिलदार माणूस. एकबाजूला कर्जत ते बदलापूर ऑटोने जाण्यासाठी इतर ऑटोवाले २००० ते २५०० रूपये घेत होते. तिकडे दादाने फक्त ४५० घेतले. आमच्या डोळ्यांत सुखाचे अश्रू आले आणि ऑटो निघाली.

मोबाईलने साथ सोडली होती. चार्जिंग नव्हती. कसं बस घरच्यांना कळवलं, येतोय काळजी नसावी. सुखरूप आहे.

पण खरं संकट पुढे होतं. कर्जत जवळच्या डीमार्ट परिसरात पाणी साचलं होतं. त्यातूनही ऑटोवाल्या दादाने हिंमतीनं गाडी बाहेर काढली. अंदाजे गुडघ्याइतकं पाणी असावं. वांगणीला पोहोचताच अंगावर शहारे आले, कारण आमच्या उजव्या बाजूला दिसत होती, महालक्ष्मी एक्सप्रेस आणि त्यात अडकलेले प्रवास. आमच्या समोर होते पाण्याखाली पूर्ण बुडालेले ३ ते ४ ट्रक. इकडे आड तिकडे विहीर, अशी अवस्था झाली होती.

ऑटोवाल्या दादाला पैसे द्यायचे होते. आजूबाजूला एटीएम नव्हते म्हणून गुगल पे करणार होतो. दादाकडे तेही नव्हते. आजूबाजूला मदत मागितली की ऑनलाईन ट्रान्सफर करतो, मला रोख द्या. फैजलभाई नावाचा माणूस भेटला. मला 200 रु हवे होते, त्यांनी 500 रु दिले आणि म्हणाले “इंसानियत सबसे बडी है भाई पैसे तो आजहै कल नही होंगे जब आपके पास आ जाये तब दे देना”

मी ‘शुक्रिया !!’ एवढं म्ह्णून आभार मानले आणि ऑटोवाल्या महेश दादाला पैसे दिले. आता मात्र भूक प्रचंड लागली होती. सकाळचे १० वाजले होते.

कासगावमध्ये असलेला प्रचंड मोठा मुस्लिम समाज आणि गावकरी ह्यांनी जेवण पाणी आणि चहा बिस्कीटची सोय केली होती. अगदी गर्भश्रीमंत (अगदी ऑडीवगैरेमध्ये अडकलेले) ते गोरगरीब लोक मशिदीबाहेर उभे राहून दिलेल्या अन्नाचा आस्वाद घेत होते. मला हमसब एक है वाली फीलिंग आली, कारण तसेच चित्र डोळ्यांसमोर होते. गावकरी स्वतःच खर्च करून जेवणं-पाणी हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधल्या लोकांना भेटावं, म्हणून पोहत जाऊन अन्नपाणी पुरवत होते. कुठलीही प्रशासन व्यवस्था तिकडे नव्हती, हे मी डोळ्यांनी पाहिले आहे.

आम्हाला पुढे जाणे शक्य नव्हते म्ह्णून आम्ही जवळचं ४ किमी अंतरावर असलेल्या पूनम लॉजमध्ये रूम घेतला आणि चार तास तिकडे घालवले. फक्त थोडीशी झोप आणि अन्न मिळावे ह्या हेतूने. तसं तर रूमचा रेंट हा ७०० रु. होता पण अण्णाने ५००रु. घेतले, कारण माणूसकी महत्वाची.

संध्याकाळचे ५ वाजले तरी पाणी कमी होईना. एका बाजूला एनडीआरएफ चे जवान एक्सप्रेस मधल्या लोकांना मदत करत होते, परंतु आम्हाला मदत मिळत नव्हती. काळोख वाढत होता. हिंमत करावीचं लागणार होती. समोर गळ्यापर्यंत पाणी होतं आणि मग आम्ही ठरवलं, कासगांव ते चामटोली पोहत जायचं. सुमारे १ किमी आम्ही गळ्याभर पाण्यात पोहत आलो. पुढे पाहतोय तर काय की खरवईपर्यंत तेवढंच पाणी होते.

थकवा वाढला होता, म्हणून दोन बाटली पाणी प्यालो आणि गावकऱ्यांना दुसरा रस्ता आहे का, असं विचारलं. त्यांनी सांगितले, दोन डोंगर उतरून जावे लागेल. रोहित काळे नावाचा मित्र भेटला. त्याने अर्धा रस्ता आम्हाला पार करून दिला. पुढचे दोन डोंगर धावत, पळत, पडत, झडत आम्ही पार केले आणि समोर दिसलं, ते आमचं बदलापूर.

सुखाचा श्वास सोडला आणि चेतन आम्हाला गाडीवर घ्यायला आला. घरी रात्री ८.३० वाजता पोहोचलो. २६ जुलै २००५ ला लहान असतांना एक अनुभव दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून घेतला होता, पण २६जुलै २०१९ ला हा अनुभव प्राण खांद्यावर घेऊन अनुभवला. अशा संकटात मदत करणाऱ्या आणि मदतीची हाक देणाऱ्या सर्व साथींना सलाम !! दोस्ती जिंदाबाद !!

 

– रोहित जगताप

(लेखक सामाजिक कार्यकर्ते व पेशाने शिक्षक आहेत.)

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!