मुलाला कोविड झाल्याच्या धसक्याने आईचा मृत्यू ! अफवांनी घेतला उल्हासनगरातील वृद्ध महिलेचा बळी !

मुलाला कोविड झाल्याच्या धसक्याने आईचा मृत्यू ! अफवांनी घेतला उल्हासनगरातील वृद्ध महिलेचा बळी !

मुलाला कोविड झाल्याच्या धसक्याने आईचा मृत्यू ! अफवांनी घेतला उल्हासनगरातील वृद्ध महिलेचा बळी !

उषा गौड. वय वर्षं पासष्ट. राहणार उल्हासनगर. २५ वर्षं बचत गटाच्या माध्यमातून समाजात वावरणारी ; मुलानातवंडांसोबत हासतखेळत आयुष्य जगत असलेली मध्यमवर्गीय गृहिणी ! मुलात कोविडसदृश्य लक्षणं दिसू लागली म्हणून अस्वस्थ होती. तपासणी अहवालात बाधा असल्याचं निष्पन्न झाल्यावर घाबरीघुबरी झाली. पण मुलाला कोविडबाधा झाली म्हणून नव्हती चिंतित ! तिला सतावत होत्या कोविड रुग्णालयांबाबतच्या वाॅटस्एपी अफवा ! त्या अफवांवर तिचा विश्वास होता आणि हे सगळं माझ्या मुलाच्या बाबतीत घडलं तर या धसक्याने तिने प्राण सोडला !

वाॅटस्एप हे माहितीचं साधन असण्यापेक्षा अफवांचं माध्यम अधिक झालंय. भलीभली कथित शिकलीसवरलेली माणसं आपल्या क्रमांकावर जे जसं येतं तसं जराही डोकं न वापरता पुढे ढकलत राहतात. त्याचे समाजस्वास्थावर काय विपरीत परिणाम होऊ शकतात, कोणाला कसलेही भान नसतं.

आपल्याकडे आलेली माहिती आपण ताबडतोब सगळ्यांच्या आधी पसरवली पाहिजे, अशा स्पर्धेत जणूकाही सगळे उतरलेले असतात. त्यातून सत्यापेक्षा असत्यच समाजात वेगाने पसरत असतं. त्यातलंच एक धादांत खोटं की तपासणी केल्यावर तुम्हाला बळेच कोविड झाल्याचा खोटा अहवाल दिला जातो आणि रुग्णालयात दाखल करून तुमची किडनी किंवा इतर अवयव काढून घेतले जातात ! रिकामटेकड्या लोकांनी घसबसल्या पसरवलेल्या या खोटारडेपणाने एका मुलापासून आई हिरावून घेतली. एका आनंदाने जगणाऱ्या व्यक्तिचा बळी घेतला.

होय. उषा गौड यांना भीती होती की आपल्या मुलाला जर रुग्णालयात दाखल केलं तर त्याची किडनी काढतील किंवा इतर अवयव विकतील. त्यात आपल्या एकुलत्या एक मुलाचा जीव जाईल, ही भीती त्यांना सतावत होती. कोविड आजारापेक्षाही ही निराधार अफवा त्यांच्या मनात घर करून होती. खरंतर आपल्या मुलांने तपासणी करून घेऊच नये, असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे त्याला तपासणी करण्यापासून त्या रोखत होत्या.

पण उषा गौड यांचा मुलगा अनुज याने स्वत:त काही लक्षणं दिसताच स्वत:च कोविड तपासणीचा निर्णय घेतला होता. दोन महिने तीन सहप्रवासी कर्मचाऱ्यांसोबत कंपनीच्या कारने नोकरीवर ये-जा करता करता एक दिवस कंपनीतच अनुज यांना अंगात कणकण वाटली. अचानक सर्दीही सुरू झाली. कंपनीतील वैद्यकीय तपासणीत ताप दिसला नाही. पण घरी आल्यावर नेहमीच्या खबरदारीनुसार आंघोळ केल्यावर मात्र तापाने अस्तित्व दाखवलं. दुसऱ्या दिवशी एका खाजगी लॅबमधून अनुज यांनी तपासणी करून घेतली. पत्नी, दोन लहानग्या मुली आणि वयोवृध्द आई यांची काळजी त्या मागे होती. तपासणी अहवाल अर्थातच काळजीत टाकणारा होता.

अनुज यांनी तडक उल्हासनगरातील आशीर्वाद रुग्णालयाच्या डॉ. श्रीकांत देशपांडेंकडे धाव घेतली. डाॅक्टरांनी तपासणीनंतर त्यांना दिलासा दिला. काहीच चिंता करण्याचं कारण नाही म्हणून सांगितलं. घरीच राहून उपचार करता येतील हेही सांगितलं. तसं प्रमाणपत्रही दिलं. पण तोवर अनुजला कोविडबाधा असल्याची वार्ता आईंना कळलेली होती. त्यांचं आईचं मन काळजीत पडलं होतं. संध्याकाळपासून त्या अस्वस्थ झाल्या होत्या. बहुधा वाॅटस्एपवर आलेले शेकडो उलटसुलट दावे त्यांच्या डोक्यात भणभणू लागले असावेत.

रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना दम लागला आणि मग एकच धावपळ झाली. त्या ज्या बचत गटात सक्रीय होत्या, त्याच्या अध्यक्षा जयश्री देशमुख आणि त्यांचा मुलगा निर्भयही धावला. जवळच्या शिवनेरी रुग्णालयात त्यांना नेलं ; पण तत्पूर्वीच त्यांनी प्राण सोडले होते, देशमुख यांनी मिडिया भारत न्यूज ला सांगितलं.

अनुज गौड गृहविलगीकरणात कोविड प्रतिबंधक उपचार घेतायंत. दूरध्वनीवर ते मिडिया भारत न्यूज शी बोलले. प्रस्तुत वृत्तात आलेला मजकूर त्यांनीच दिलेल्या माहितीवर आधारित आहे.

ते म्हणाले, कोविड आजारापेक्षाही आईला रुग्णालयातल्या गैरप्रकारांबद्दल जे वाॅटस्एपवर उलटसुलट येत होतं, त्याचीच चिंता जास्त होती. खरं तर अफवांनीच माझ्या आईचा बळी घेतला.

कोरोनाचं संकट जगावर येऊन वर्ष होत आलं, पण अजूनही अफवा थांबलेल्या नाहीत. अफवा एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, याचा अनुभव मी घेतला. माझी आई माझ्या डोळ्यांदेखत गेली. सरकारने अफवांचा फैलाव कठोरतेने रोखायला हवा. अशी अपेक्षा अनुज गौड यांनी मिडिया भारत न्यूज शी बोलताना व्यक्त केलीय.

 

 

राज असरोंडकर

कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक व मिडिया भारत न्यूज चे संपादक


मिडिया भारत न्यूज चं युट्यूब चॅनल पाहण्यासाठी इथे टिचकी मारा :

https://www.youtube.com/channel/UCPSaM5VGRfQ0OALxe2-yWgw

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!