कोपर्डीतील समाधान शिंदेंची आत्महत्या की हत्या ?

कोपर्डीतील समाधान शिंदेंची आत्महत्या की हत्या ?

कोपर्डीतील समाधान शिंदेंची आत्महत्या की हत्या ?

महाराष्ट्रातलं कोपर्डी गाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 10 नोव्हेंबर रोजी गावातीलच समाधान शिंदे यांच्या कथित आत्महत्येची घटना घडलीय. समाधान शिंदे यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे ही आत्महत्या नसून हत्या आहे.

समाधान शिंदे हा ट्रॅक्टर चालक आहे. त्याने आपल्या ट्रॅक्टर चोरला असा आळ गावातीलच ट्रॅक्टर मालक गणेश मोरे यांनी घेतला होता. सदरबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात चोरीचा गुन्हाही दाखल आहे. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतरही समाधान शिंदे याने ट्रॅक्टर चोरी केल्याचं आढळून आलं नाही.

त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी गावातील नाना सुद्रिक यांनी आपण गणेश मोरे यांना भेटायला जाऊ, असं सांगितल्यावर समाधान शिंदे घरातून निघाला होता. मात्र पुन्हा सुद्रिक यांचाच फोन आला व त्यांनी कारखान्याजवळ लोक जमले आहेत ; तू इकडे येऊ नकोस, असं कळवलं. त्यावर समाधान शिंदेने आपल्या भावाला फोन केल्यानंतर, त्याने ‘तू पोलीस स्टेशनला जा’ असं सुचवलं.

समाधान शिंदेच्या कुटुंबीयांचं आणि त्याचं हे शेवटचं बोलणं ! त्यानंतर समाधान शिंदे फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला. समाधान शिंदेच्या कुटुंबियांचा असाही आरोप आहे की ट्रॅक्टर चोरीची चौकशी करताना पोलिसांनी त्याला मारहाण केली होती. कुटुंबियांचा आता गणेश मोरेवर हत्येचा आरोप आहे. समाधानची हत्या करून त्याने आत्महत्या केल्याचे भासवलं जात आहे, असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

सदर प्रकरणात कर्जत पोलिसांनी आधी गुन्हा नोंदवायला टाळाटाळ केली होती ; मात्र सामाजिक दबाव आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनुसूचित जाती जमाती वरील अत्याचारास प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

आरोपींना अटक व्हावी आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी या मागणीसाठी समाधानचे अर्धांगवायू झालेले अपंग वयोवृद्ध वडिल, वयोवृद्ध आई, पत्नी व लहान मुलांसह अख्खं कुटुंब ऐन दिवाळीत उपोषणाला बसलं आहे.

कर्जत पोलिसांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावलाय. प्रथमदर्शनी समाधानने आत्महत्या केल्याचं दिसतंय. पण कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे व चौकशीनंतर पुढील पावलं टाकण्यात येतील, असं पोलिस सांगतात.

महाराष्ट्र सरकारने व पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात जी तत्परता दाखवली, ती समाधान शिंदेच्या बाबतीतही दिसेल का? इतर अनेक विषयांवर सरकारची कोंडी करणारे विरोधक समाधान शिंदेच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहतील का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसांत महाराष्ट्राला मिळतीलच. पण गेले तीन दिवस समाधानचं कुटुंब उपोषणावर आहे, त्यांचं सांत्वन करून नि:पक्षपाती चौकशीची ग्वाही तरी सरकार देणार आहे का ? की पुन्हा एकदा दलित हत्याकांडाच्या घटनेत पीडितांच्या वाट्याला उपेक्षाच येणार, हा सवाल आहे.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!