पूरपरिस्थितीसाठीचं पूर्वनियोजन नव्हतं, सरकार गर्क काश्मीर जल्लोषात आणि महाजनादेश यात्रांत

पूरपरिस्थितीसाठीचं पूर्वनियोजन नव्हतं, सरकार गर्क काश्मीर जल्लोषात आणि महाजनादेश यात्रांत

पूरपरिस्थितीसाठीचं पूर्वनियोजन नव्हतं, सरकार गर्क काश्मीर जल्लोषात आणि महाजनादेश यात्रांत

कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांतील पाण्यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरण जवळपास पूर्णपणे भरत आले आहे. या धरणात १०८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुढील काही दिवसात जोरदार पाऊस पडला तर सांगली जिल्ह्याला धोका वाढू शकतो. कोयना ५० तर चांदोली धरण २१ टीएमसीवरच आहे. गेल्या महिन्याभरात कृष्णा, वारणा नद्यांच्या परिसरात चांगला पाऊस पडला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या नद्यांचे पाणी कर्नाटकात वाहून गेले. तसेच कर्नाटकातील घटप्रभा, मलप्रभा, दुधगंगा, वेदगंगा या नद्यांचे पाणीही मोठ्या प्रमाणात वाहून गेले. सांगली जिल्ह्यातून सुमारे ४० ते ४२ टीएमसी पाणी कर्नाटकात गेले. कोल्हापूर जिल्ह्यातूनही जवळपास ४५ ते ४८ टीएमसी पाणी अलमट्टीत गेले. यामुळे महिन्याभरापुर्वी रिकामे होत आलेल्या अलमट्टी धरणात पाणीसाठा वेगाने वाढला आहे. १३४ टीएमसी क्षमता असलेले हे धरण केवळ महिन्याभरात  भरत आले आहे. सध्या या धरणात १०८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अजूनही मोठी आवक या धरणात होत आहे.  यामुळे पुढील काही दिवसांत हे धरण भरण्याची शक्यता आहे. हे धरण भरल्यास सांगलीला पुराचा धोका वाढणार आहे. ही बातमी आहे, पुढारी दैनिकातली, २० जुलै, २०१९ रोजीची. सांगली-कोल्हापुरातली पूरपरिस्थिती चिघळली ५ आॅगस्टनंतर. तब्बल पंधरा दिवस राज्य शासनाकडे पूर्वनियोजनासाठी होते. पण शासन गाफील होतं जम्मू-काश्मीरची स्वायत्तता गेल्याचा आनंद साजरा करत. अर्थात, विषयाची जुजबी माहिती नसतानाही केवळ मुस्लिम द्वेषापायी लोकही सरकारसोबत नाचत होते.

लोकांचंही अजून आपल्या गरजांचं प्राधान्य ठरलेलं नाहीये, अन्यथा कर्नाटकातील लालबहादूर शास्त्री सागर, अर्थात अलमट्टी धरण भरल्याच्या बातम्यानंतर लोकही सुस्त राहिले नसते.‌ पण लोकांचा आपापल्या आवडत्या राजकीय पक्षांवर आणि सरकारांवर आंधळा विश्वास असतो. लोक त्यांच्यावरच विसंबून असतात. आपण प्रजासत्ताकात राहतो, सरकार आपल्याला चालवायचंय, आपल्याला हवंय ते सरकारकडून करून घ्यायचंय, ही हक्काची भावना लोकांत रूजलेलीच नाही, उलट लोक आपणच निवडून दिलेल्या सरकारपुढे झुकून राहतात. सरकार नावाची व्यवस्था त्यामुळेच बेफिकीर राहते. त्यातच भाजपा पक्ष केंद्र व राज्य पातळीवर नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयशी ठरल्यावर लोकांना सतत भावनिक विषयांत गुंतवून ठेवण्याचं धोरण या पक्षाने अवलंबलं आहे. देशावर आर्थिक संकट असताना, अनुच्छेद ३७० चा विषय छेडून भाजपा व नरेंद्र मोदी-शहा जोडीने लोकांना पुन्हा एकदा अनावश्यक गोष्टीत गुंतवून ठेवलं. इतकं की लोक भानावर येईपर्य़त त्यांना चारही बाजूंनी पुराने वेढलं होतं.

वास्तविक, सरकारात बसलेल्यांची बेफिकिरी लोक अनुभवतही आहेत. पण धर्माभिमानाची झापडं डोळ्यावर असल्याने आपल्या दुरवस्थेला नेमकं जबाबदार कोण आहे, ते लोक समजून घेत नाहीयेत. यापूर्वी लोक सरकारचं समर्थनही करायचे आणि झोडपायचेही. भाजपाने इतकं बधीर करून ठेवलंय लोकांना की काही झालं तरी सरकारची तळी उचलून धरायची, या सवयीच्या आहारी गेलेत लोक.

सांगली-कोल्हापुरातील पुराचा अलमट्टी धरणाशी संबंध आहे की नाही, यावर अजून सरकारपातळीवर आरोप प्रत्यारोपच सुरू असताना, या पुराचा आणि अलमट्टी धरणाचा म्हणजेच लालबहादूर शास्त्री सागराचा काय संबंध, असा मजकूर सरकार समर्थक लोक समाजमाध्यमात पसरवू लागले आहेत. पण हा विषय आजचा नाहीये, हे कोणी समजून घेत नाहीये.


३१ जुलै, २००६ साली सांगलीचे खासदार प्रतिक पाटील यांनी लोकसभेत सांगलीतील पूरसमस्या मांडली होती. पाटील म्हणाले होते, माझ्या मतदारसंघाचं ३५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आहे. पाणी सुरक्षा पातळीपेक्षा म्हणजे ४० फुटांपेक्षा १० फूट जास्त ५० फूटांपर्यंत गेलंय.‌ ५० हजार लोक पलूसमधून, १० हजार वळवामधून आणि ५ हजार लोक मिरजमधून स्थलांतरित झालेत. गेल्या तीस-चाळीस वर्षांत अशी पूरपरिस्थिती ओढवली नव्हती. पण कर्नाटकात अलमट्टी धरण झाल्यापासून आम्हाला त्रास होतोय. माझा मतदारसंघ कर्नाटक सीमा आणि कृष्णा नदीच्या जवळ आहे. ती नदी सातारा, सांगलीहून कोल्हापूर मार्गे वाहते. गेल्या वर्षीही धरणातून पाण्याचा विसर्ग न झाल्याने पूर होता. यावर्षीही त्यांना विनंती केली, पण त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी आदेश व्हावेत.


२० डिसेंबर २०१३ रोजीच्या महाराष्ट्र टाईम्स च्या अंकात प्र. र. चिपळूणकर आपल्या लेखात म्हणतात, २००५ साली महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. पुराचे त्या आधीच्या १०० ते १२५ वर्षांतील उच्चांक मोडीत निघाले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व सांगली शहरासह मिरज तालुक्यातील कृष्णाकाठची अनेक गावे जलमय अगर बेटाप्रमाणे झाली. अशा अपवादात्मक आपत्तीला कसे तोंड द्यावे, याची कोणतीही पूर्वतयारी नसल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात हाहाःकार उडाला. पुरामागील निश्चित कारणांचा मागोवा न घेता अलमट्टी धरणाच्या फुगीमुळे पुढे पाणी सरकण्यास अडथळा झाल्याचा कांगावा काहींनी केला. त्यावर पुढे बरेच दिवस चर्चा चालत राहिली. २००६, २००७, २००८ असा पुढे सलग तीन वर्षे तितक्याच उच्च पातळीचा पूर आला; परंतु महाराष्ट्रातून होणारा कृष्णेच्या पाण्याचा विसर्ग सतत अभ्यासून अलमट्टीतून पूरकाळात किती पाण्याचा विसर्ग केला पाहिजे, या संबंधी दोनही राज्यांच्या इंजिनीअर्समध्ये सतत समन्वय झाल्याने २००५ सारखी हानी पुढील सलग तीन पुरांवेळी झाली नाही.

असे असले तरी या लेखात चिपळूणकर यांनी सांगली-कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण व्हायला लालबहादूर शास्त्री अलमट्टी धरण कारणीभूत असू शकतं का, याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे.

ते म्हणतात, मी एक शेतकरी असून, २००५ ते २००८ या चारही वर्षी पुरात भरपूर नुकसान सोसले आहे. २००५ सालच्या पुराचे कारण अलमट्टी धरणाची फूग हे नसून, पावसाचे प्रमाण हे आहे, असे त्या वेळच्या पाऊसमानाचा बारकाईने अभ्यास केला असता दिसून येते. मी ४३ वर्षे शेती करतो. या प्रदीर्घ काळात अनेक अतिवृष्टी व महापुरांचा अभ्यास करता आला. बहुतेक साली महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत अतिवृष्टी तर काही जिल्ह्यांत सर्वसामान्य पाऊस तर कोठे अवर्षण असते. कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली; परंतु सातारा जिल्ह्यात सामान्य पाऊस असेल तर कृष्णेची पातळी मर्यादित राहते व पंचगंगेच्या महापुराची तीव्रता कमी होते. १९६८च्या विक्रमी महापुराची अवस्था अशी होती. त्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्या २००५च्याच पातळीवरून वाहत होत्या; परंतु कृष्णा रिकामी असल्याने पाऊस थांबताच दोन, तीन दिवसांत पूर पूर्ण ओसरला. पूर जून महिन्यात आल्यामुळे कोणत्याही धरणातून विसर्ग अजिबात नव्हता. मुळात सांगली मिरजेपासून २३५ किलोमीटरवर असणाऱ्या अलमट्टीची फूग सांगलीपर्यंत पोहोचू शकेल का, हे अभ्यासण्यासारखे आहे. कृष्णेचा महाराष्ट्रातून होणारा विसर्ग, अलमट्टी धरणातील पाणीसाठा व कमी जास्त करावयाचा विसर्ग याचा समन्वय २००५च्या आपत्तीने आता उत्तम प्रमाणात विकसित झाला आहे. धरणाची उंची वाढवून जर सांगलीला धोका पोहोचणार असेल तर त्याच्या कित्येकपट जास्त धोका या २३५ किलोमीटरच्या कृष्णा काठावरील शहरे, खेडी व नदीकाठच्या शेतीला होणार आहे. विजापूर व बागलकोट जिल्ह्यांतील दुष्काळी भागाला पाणी पुरवण्यापोटी या २३५ किलोमीटरच्या पट्ट्यातील कित्येक आमदार व खासदारांच्या मतदारसंघांना जलसमाधी देण्यास तेथील राजकीय नेते कसे कबूल होतील? त्यांना मताचे राजकारण कळत नाही, असे कसे म्हणता येईल? २००५च्या आपत्तीला आणखी एक भौगोलिक किनार आहे. ज्या ठिकाणी दोन मोठ्या नद्यांचा संगम असतो त्या परिसरात बराच सखल भाग असतो. महापुरात सर्वांत जास्त क्षेत्र बाधित होण्याचे प्रमाण हे संगमाभोवतालचे असते. सांगलीजवळ कृष्णा-वारणा तर शिरोळ तालुक्यात वारणा-पंचगंगा व दूधगंगा या मोठ्या नद्यांचे संगम आहेत. त्यामुळे महापुरात या भागाची हानी सर्वांत जास्त होते. अलमट्टीची उंची ५१८ मीटरवर थांबवून ही भौगोलिक परिस्थिती आपण काही बदलू शकत नाही. २००५ सालच्या पुराला अलमट्टी कारणीभूत आहे, असे म्हणावे तर त्याच काळात आलेल्या गोदावरीच्या महापुराने नांदेड जवळपास गिळंकृत केले. त्याला कोणत्या धरणाच्या फुगीचे कारण मात्र दिले गेले नाही. राजकीय नेत्याबरोबर काही सामाजिक अभ्यासू विचारवंतही अलमट्टी ‘री’ ओढतात, याचे आश्चर्य वाटते.

चिपळूणकर यांनी आपले म्हणणे ठासून मांडले तरीही, गेल्या अनेक वर्षात दर पावसात जुलै महिन्यात अलमट्टी आणि सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका ही बातमी झळकवून वर्तमानपत्रांनी मात्र त्या धरणाकडेच अंगुलीनिर्देश केलेला आपल्याला दिसतो.

१४ जुलै, २०१४ ची आजपासून पाच वर्षांपूर्वी ची माझा पेपर या वेबपोर्टलची बातमी म्हणते की कर्नाटक शासनाने अलमट्टीमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केल्यास यंदा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यास महापुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकातील काही दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने कर्नाटक शासन पूर्णक्षमतेनेदेखील पाणीसाठा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून पुराचा धोका उदभवू नये यासाठी अलमट्टी धरणातील दैनंदिन पाणीसाठा आणि विसर्गावर विशेष नजर ठेवणार आहेत. यंदा कर्नाटकातील अलमट्टी धरणाचे बांधकाम केंद्र शासनाच्या मंजुरीप्रमाणे पूर्ण झाले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यामुळे धरणाची उंची ५१९.६५ मीटरवरून ५२४ मीटर झाली आहे. त्यामुळे यंदा अलमट्टी धरणामधील पाणीसाठय़ात दरवर्षीपेक्षा वाढ होण्याची शक्यता आहे. या धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यास पुन्हा पुराचा धोका निर्माण होणार आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ४.३५ मीटरने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ५२४ मीटर अलमट्टी धरणाची उंची झाली असून, वाढविलेल्या उंचीनुसार पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याचे कर्नाटक शासनाचे धोरण आहे; पण पूर्ण क्षमतेनुसार पाणीसाठा करण्यासाठी अलमट्टी धरणक्षेत्रातील अनेक गावांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. यासाठी कर्नाटक सरकारला बराच कालावधी लागणार आहे. यावर्षी ५१८ मीटर उंचीपर्यंत पाणीसाठा करण्याची महाराष्ट्र सरकारकडून मागणी केली असताना ५१९.६० मीटर उंचीपर्यंत पाणीसाठा केला जाणार आहे. त्यामुळे अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे निर्माण होणारी पूरस्थिती टाळण्यासाठी दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागामध्ये समन्वय ठेवणे आवश्यक ठरणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना २००५ च्या पावसाळ्यात महापुराचा तडाखा देणार्‍या नऊ कारणांपैकी अलमट्टी धरण एक कारण असल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे. हेच कारण सयुक्तिक धरून पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शिरोळ, जयसिंगपूर, हातकणंगले तालुक्याचा भाग हा अलमट्टीचे पाणलोट क्षेत्र बनल्याचाच निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे एका अर्थाने या दोन जिल्ह्यांत पूर येणार की नाही हे अलमट्टी धरणच ठरवणार असल्याचे चित्र आहे. शासनाच्या आदेशानुसार आणि आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून पाटबंधारे विभाग १ जूनपासूनच अलमट्टी धरणातील दैनंदिन पाणीसाठा, धरणातून पाणी सोडून देण्याची प्रक्रिया यावर लक्ष केंद्रित करून आहे. गेल्या आठ वर्षांत आंतरराष्ट्रीय निकषानुसार पाणीसाठय़ाचे योग्य नियोजन केल्यानेच दोन्ही जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला नाही. जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुराच्या तडाख्यात दोन्ही जिल्ह्यांना मोठी हानी पोहोचली. पूर ओसरल्यावर सुरू झालेल्या अभ्यासात अलमट्टी धरणाची उंची आणि साठवले जाणारे पाणी यांचा एकत्रित परिणाम म्हणून पूर आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, सामाजिक संघटनांनी काढलेला निष्कर्ष सुरुवातीला मान्य केला गेला नाही. मात्र, नंतरच्या काळात अलमट्टी धरणामुळेच पूर आला होता हे मान्य करण्यात आले. राज्य शासन, कॅगचा अहवाल व पर्यावरणप्रेमींच्या अभ्यासातून अलमट्टी धरणच पुराला कारणीभूत ठरते, असे गृहीतक मांडण्यात आले. मात्र, ते कर्नाटक आणि केंद्र सरकारला मान्य नाही.

त्याचं महिन्यातील, ३० जुलै, २०१४ ची लोकसत्ताची बातमी म्हणते, सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण होणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरण ८७ टक्के भरले असून मंगळवारी सकाळी ८ वाजता या ठिकाणची पाणीपातळी ५१८.८० मीटर होती. धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने चांदोली धरणातील पाणीसाठा ८४  टक्के झाला असून बुधवारपासून वारणा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. अलमट्टीतून विसर्ग न वाढविल्यास येत्या काही दिवसांत सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.

अगदी गेल्यावर्षीची २३ जुलै, २०१८ ची प्रशांत कोडणीकर यांनी दिलेली लोकमतमधील बातमीसुध्दा अलमट्टी धरणाकडेच बोट दाखवते. कर्नाटकातील अलमट्टी धरण ८८ टक्के भरले असून, पाणीपातळी ५१८ मीटरवर स्थिर ठेवण्यात आली आहे. धरणात १०८ टीएमसी पाणीसाठी असून, सध्या १,७३,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. कोल्हापूरपासून १४०, तर सांगलीपासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विजापूर आणि बागलकोट तालुक्याच्या सीमेवर अलमट्टी धरण आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील अनेक गावे पाण्याखाली गेली होती. त्याचवेळी अलमट्टी धरणाच्या उंचीचा मुद्दा वादग्रस्त बनला होता. २००५ सालीच धरणाचे बांधकाम पूर्ण झाले व याच वर्षापासून म्हणजे २००५ सालचा महापूर नंतर नृसिंहवाडी येथील पाणीपातळीत होणारी वाढ व पाणीपातळी कमी होणे यात मोठा फरक पडला असून, पावसाने उघडीप दिल्याशिवाय धरणातून होणारा विसर्ग जरी कमी असला तरी वाढलेली पाणीपातळी लवकर कमी होत नाही, असे चित्र पहावयास मिळत आहे. याचे कारण अलमट्टी धरण की हिप्परगी धरण हा संशोधनाचा विषय आहे. जुलैच्या मध्यावरच राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अजून पावसाचे दोन महिने शिल्लक असून, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आणखी दमदार पाऊस झाल्यास महापुरासारखा धोका निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक शासनाने योग्य समन्वय साधण्याची गरज आहे, असे या बातमीत म्हटलेले आहे.

अलमट्टी धरणात पाणीपातळी ५१८ मीटरवर स्थिर ठेवून यापेक्षा येणारे जादा पाणी विसर्ग केले जात आहे. २२ जुलै रोजी सकाळी पाणीसाठा १०८ टीएमसी असून धरण ८८ टक्के भरले होते. धरणात १,७३,९२३ क्युसेक्स पाणी जमा होत होते. तर तेवढेच पाणी विसर्ग होत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील धरणातील आवक व विसर्ग याची दररोज माहिती घेतली जात असून, अलमट्टी धरणाच्या पाणीपातळीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.

मंजुनाथ, अलमट्टी धरण अधिकारी

(लोकसत्ता, ३० जुलै, २०१४)

१९६७ आणि १९७६ साली सांगली-कोल्हापूरने पूरपरिस्थिती अनुभवली होती. तेव्हा कुठे धरण होते? सांगली-कोल्हापूरची समुद्र सपाटीपासूनची उंची पाहता अलमट्टीतून बॅकवॉटर जाणं अशक्य आहे, असं म्हणून कर्नाटकने वेळोवेळी महाराष्ट्राचा दावा फेटाळलाय. पण धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास पूर ओसरतो, हेसुद्धा एक प्रत्येकवेळी नजरेस पडणारे वास्तव आहे. पण शासन गाफील राहिलं. जम्मू काश्मीर जल्लोषात मश्गुल राहिलं.‌ सांगली-कोल्हापूरमध्ये पुराने भयाण रूप धारण केलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरचंच भलाईचं कृत्रिम चित्र रंगवण्यात व्यस्त राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा सोडायला तयार नव्हते. देश विरोधात गेला तरी बहुमत गाठायचं निवडणूक तंत्र भाजपाने आत्मसात केलंय. हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून त्या सरकारच्या अकार्यक्षमतेकडे, मनमानीकडे, भ्रष्टाचाराकडे, बेजबाबदारपणाकडे दुर्लक्ष करायचं धोरण लोकांनी अवलंबलंय. आता जरी राममंदिराचं काम सुरू झालं तरी लोक घरदारं पाण्याखाली ठेवून अयोध्येकडे कूच करतील, इतके लोक बधीरावस्थेत असल्याचा भाजपाईंना विश्वास आहे.

सांगली-कोल्हापूरच नव्हे, यंदाच्या जूनमध्ये पावसाने नीटशी पकडही घेतली नव्हती, तोवर मुंबई, ठाणे, पुणे व इतर शहरांतून पाणी साठल्याच्या, जनजीवन विस्कळित झाल्याच्या बातम्यांना सुरुवात झाली होती. रेल्वे मृगनक्षत्रापासूनच गडबडली, ती तिला अजूनपर्य़त सावरायला वेळच दिलेला नाही.‌ मुंबई आणि जवळची उपनगरं अस्ताव्यस्त वाढलेली, कुठल्याही नियोजनाशिवाय. त्यात जलनिसारणाचं नियोजन कुठून असणार? तासभर पाऊस पडला तरी ही शहरं तुंबतात.‌ पाऊस थांबला की पाणी ओसरतं, पाऊस सुरू झाला की पुन्हा पाणी भरतं, हे सगळे शहरनियोजनाच्या अभावानेच परिणाम. बरं, मागच्या चुकांचे दुष्परिणाम पाहिल्यानंतर तरी चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, तर तेही नाही. आपण जगतोय, म्हणजे नेमकं काय करतोय, आपण ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडतो, ते का निवडतो, कशाचा कशाला थांगपत्ता नाही. लोकप्रतिनिधी हे आपल्या वतीने आपलं म्हणणं, प्रस्ताव, सूचना, मागणी, दु:ख, समस्या मांडण्यासाठी आपण निवडलेले असतात, मग ते आपण करोडपती किंवा गुन्हेगार का निवडतो, हे एक खूप मोठं कोडं आहे. संसदेत ५४३ पैकी २३३ खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, पैकी ११६ एकट्या भाजपाचे आहेत, ज्यांनी नेता म्हणून नरेंद्र मोदींची निवड केलीय. गुन्हेगारांचं नेतृत्व करण्याची जराही खंत वा खेद न बाळगणारा नेता देशाचं भलं करेल, असं लोकांना वाटतं, हेच अजब आहे. गुन्हेगारी ही आपली समस्या नाही आहे काय? आणि कोणतीही समस्या ही तुमच्या समस्येचं निवारण कसं काय असू शकते, हा प्रश्र्न लोकांना का पडत नसावा? कोणाचातरी धर्मद्वेष करून आपले प्रश्न सुटू शकणार नाहीत, हे लोकांना समजत नसेल काय? आज जो दुसऱ्याच्या विरोधातला धाकदपटशहा आपल्याला गुदगुल्या करतोय, तोच कधीतरी आपल्यावर डोळे वटारू शकतो, याची जाणीव लोकांना असेल काय?

 

———-राज असरोंडकर———-

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!