दारुऐवजी सॅनिटाईझरची पर्यायी नशा ठरतेय घातक ; वणीत आठ जणांचा मृत्यू !

दारुऐवजी सॅनिटाईझरची पर्यायी नशा ठरतेय घातक ; वणीत आठ जणांचा मृत्यू !

दारुऐवजी सॅनिटाईझरची पर्यायी नशा ठरतेय घातक ; वणीत आठ जणांचा मृत्यू !

एकदा कुठलं व्यसन लागलं की त्या व्यसनापायी माणसं कुठल्या थराला जातील, याचा नेम नाही. यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये काही मजुरांनी दारुऐवजी चक्क सॅनिटाईझरचं सेवन केलं. अर्थात, त्याचे दुष्परिणाम जे व्हायचे ते झालेच आणि त्यांना जीवाला मुकावं लागलं. वणीत सॅनिटायझरमुळे सुरू असलेले मृत्यूचे तांडव काही केल्या थांबताना दिसत नाही. शनिवारी संध्याकाळी सॅनिटायझर प्यायल्याने 3 व्यक्तींचा, रविवारी पहाटे आणखी तिघांचा तर मंगळवारी 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. अवघ्या चार दिवसांमध्ये 8 जणांचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्याने वणी शहर हादरून गेले आहे. विशेष म्हणजे शहरात कोरोनापेक्षा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू अधिक होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान दारूवरची बंदी उठवावी,  अशी विचित्र मागणीही जोर धरत आहे.

दत्ता लांजेवार, नुतन, बालू, विजय बावणे, सुनील ढेंगळे, गणेश शेलार हे मजुरी करून उदरनिर्वाह करायचे. त्यांना दारु पिण्याची सवय होती. लॉकडाऊनच्या काळात दारूची विक्री बंद झाल्याने यांनी ५ लीटरची सॅनिटायझरची कॅन विकत घेतली व एकत्रित नशा केली. त्यानंतर एकाएकाची तब्येत बिघडू लागली. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी सुनील ढेंगळे, गणेश शेलार व दत्ता कवडू लांजेवार यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संध्याकाळी सुनील महादेव ढेंगळे व गणेश उत्तम शेलार या दोघांचा मृत्यू झाला ; त्यानंतर काही वेळातच दत्ता लांजेवार याचा मृत्यू झाला. नूतन देवराव पाटणकर याला अस्वस्थ वाटल्याने तो ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. मात्र तिथून तो उपचार न घेताच निघून आला. त्याचा पहाटे त्याचा घरीच मृत्यू झाला. भीतीने यातील दोघेजण दवाखान्यातच गेले नव्हते. त्यांचाही घरीच मृत्यू ओढवला.

मृत्यू झालेल्या व्यक्तींनी सोबतच नशा केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. २४ तासांत ७ व्यक्तींचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा आकडा वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त होते आहे. सहा मृतांव्यतिरिक्त यात आणखी ३-४ जण नशा करण्यात एकत्र होते,अशी माहिती आहे. सात मृतांपैकी एकाच्या कुटुंबियांनी सॅनिटाईझर सेवनाचा आरोप नाकारलाय.

संतोष उर्फ बालू मेहर व विजय बावणे हे मजुरी करायचे. बालू हा आधी पुण्यात मजुरीचे काम करायचा; मात्र दोन तीन वर्षांआधी तो वणीत परत आला होता.

या सर्वांचा एकत्र गृप होता. मात्र, केवळ दोघांच्या मृत्यूची सॅनिटायझर प्याल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे. यांच्यासोबत आणखी किती लोकांनी सॅनिटायझरचे सेवन केले होते किंवा नियमित सेवन करणारे कोणी आहेत का, हे शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

शनिवारी दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील व अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी वणी येथे दौरा केला. या दौ-यात त्यांनी मृत झालेल्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वन केलं. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार, पोनि वैभव जाधव, पोऊनी गोपाल जाधव, आरोग्य अधिकारी डॉ भालचंद्र आवारी होते.

पोलिस धक्क्यातून सावरत नाहीत तोच, मंगळवारी 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान माळीपु-यात राहणा-या अनिल चंपतराव गोलाईत (49) यांच्या सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यूची आणखी एक घटना घडलीय. दिवसभरात, त्यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिवाजी चौक इथे राहणा-या नागेश लक्ष्मण दर्वे (45) यांचा संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. अनिल आणि नागेश हे मित्र असल्याची माहिती आहे. त्यांना दारू पिण्याची सवय होती.

लॉकडाऊनमुळे दारू बंद असल्याने नागेश यांनी गेल्या तीन चार दिवसांपासून सॅनिटायझर प्यायला सुरूवात केली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना याबाबत समजावून देखील सांगितले होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नागेश यांचे सॅनिटायझरचे सेवन करणे सुरूच होते. सॅनिटाझर प्यायल्याने त्यांची तब्येत देखील खराब झाली होती.

महाराष्ट्रातील नशेपायी सॅनटाईझर पिऊन मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्यावर्षी फलटणमध्ये याच कारणाने दोघांचा मृत्यू झालाय. यावर्षी मार्च महिन्यात विजयवाडा येथे दोघांचा सॅनिटाईझर सेवनामुळे मृत्यू ओढवला. गेल्यावर्षी आंध्रप्रदेशात आणि परदेशात रशियातसुद्धा सॅनिटाईझर सेवनामुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.

सॅनिटाईझरमध्ये अल्कोहोल असतं या एका ऐकीव माहितीवर व्यसनी लोक दारुला पर्याय म्हणून त्याची नशा करतात. पण अल्कोहोलचे अनेक प्रकार असून त्यातला मिथेनाॅल विषारी ठरतो व मृत्यूला कारणीभूत ठरतो. मृत्यू टळला तरी अंधत्वाची भीती असते. त्यामुळे नशा तर दूरच मिथॅनाॅलमिश्रीत सॅनिटाईझरचा हातांच्या स्वच्छतेसाठीही वापर करू नये, असा अन्न व औषध प्राधिकरणाचा इशारा आहे.

 

 

 

निकेश जिलठेे

nikesh.jilthe@gmail.com / 9096133400

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!