संक्रांत : संक्रमण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं

संक्रांत : संक्रमण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं

संक्रांत : संक्रमण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं

अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ओढ कायमच मानवाला वाटत आलीय. भोवताली दाटलेल्या अंधारातून मानव प्राण्याने प्रकाशाची वाट सभोवतालला दाखवली आणि सुरू झाला अखिल जीवसृष्टीचा प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास. सूर्यास्तानंतर काळोखात गपगार होणारी पृथ्वी प्रकाशाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची. तिच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या मानवप्राण्याने अग्नीच्या शोधाबरोबर एक संस्कृती उदयाला आणली जी प्रकाशवाटा बनली.

कालांतराने ह्या प्रकाशवाटांवर चालता चालता हाच मानवप्राणी उन्मत्त झाला. सृष्टीला झुगारुन देऊ लागला. फक्त मानवी पर्यावरणाचा विचार करु लागला. भवताल विसरला. आणि सुरू झाला एक प्रवास विनाशाचा. पृथ्वीच्या विनाशाचा. आणि यात हात होता फक्त माणूस प्राण्याचा. या विनाशात बळी जातेय जीवसृष्टी.

दाट काळोख दाटलाय पण यातून वाट दाखवतेय ग्रेटा सारखी एक १६ वर्षाची मुलगी, जी प्रकाशकिरण घेऊन आलेय या विनाशाला रोखायला.

आज आपल्या देशातही जात धर्माच्या नावावर चाललेले ध्रुवीकरण माणसाला माणूस ह्या एकाच जातीनुसार जगायला देत नाही. सर्वत्र अंधकार गडद होतोय. ज्ञान लोपत चाललय काय अशी भिती वाटतेय. ज्ञानाबरोबरच भाषा, संस्कृती सगळंच लयाला चाललय. मानव्य लुप्त होतय आणि जाती धर्माच्या नावाखाली सत्तेचा अमानवी खेळ सुरू आहे. परस्पर विश्वास, प्रेम संपवण्यात सत्ताधा-यांना यश आलय आणि देश अराजकतेकडे लोटला गेलाय. सत्तेबरोबर आलेली झुंडशाही वाढलीय आणि अर्थकारण व समाजकारण राजकारणाने मातीत मिळवलय.

लोकशाही धोक्यात आलीय आणि देश हुकुमशाहीचं स्वागत करतोय की काय असं वाटायला लागलय.

आणि अशा परिस्थितीत तरुणाईच्या रुपानं एक प्रकाशाचा किरण दिसू लागलाय. संविधानावर चालणारा आपला देश हा सध्या राज्यकर्त्यांकडून घेतल्या जाणाऱ्या अनेक असंविधानिक निर्णयांत भरडला जाताना दिसतोय. या निर्णयांचा संविधानिक मार्गांनी विरोधही केला जाताना दिसतोय. खूप मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यावर उतरलेली दिसतेय. अशातच जामिया मिलिया व नुकतेच जेएनयु विद्यापिठांत पोलिसांकडून व पोलिस पुरस्कृत गुंडांकडून तरुणांचा आवाज दाबण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आलाय. पण त्यामुळे ही तरुणाई जास्तच सक्रीय झालीय. संविधानिक मार्गाने अहिंसकपणे ही तरुणाई रस्त्यावर उतरलीय. तिरंगा हातात घेऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचं चौकाचौकात वाचन करणारी तरुणाई आणि त्यांना साथ देणारा कष्टकरी बहुजन व अल्पसंख्यांक समाज, शाहिन बागेत ठिय्या मारुन बसलेल्या महिला, हे सर्वजण हा दाट काळोख भेदण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत.

मला खात्री आहे या अंधःकारात दडलेला आहे प्रकाश, जो होत जातोय हळू हळू मोकळा!! अंधाराचे जाळे विरळ होत जातय आणि समतेची प्रकाशवाट प्रशस्त होत चाललीय. लेखकांची झरतेय लेखणी आणि चित्रकार चितारताय चित्र, कवी लिहिताहेत कविता, कलाकार साकारताहेत कलाकृती, अंधःकाराच्या आणि हो, संक्रमणाच्यासुध्दा!

तिमिरातून तेजाकडे जातानाचे साक्षिदार असणार आहोत आपण सर्वचजण. म्हणूनच थोडा जोर आता लावावाच लागेल. संक्रांतीच्या निमित्ताने ही सृष्टी ऋतुबदलासाठी तयार झालीय. सकल मानव जात मानव्यात संक्रमीत होण्यासाठी ह्या ऋतूबदलात आपलेही योगदान असायलाचं हवं, हीच ऋतूबदलाच्या या उत्सवानिमित्त मनापासून सदिच्छा!!


सिरत सातपुते

लेखिका राष्ट्र सेवा दलाच्या पूर्णवेळ कार्यकर्ता आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!