सावित्री उत्सव घरोघरी साजरा व्हायला हवा !

सावित्री उत्सव घरोघरी साजरा व्हायला हवा !

सावित्री उत्सव घरोघरी साजरा व्हायला हवा !

ज्या काळात भारतीय समाज जातीभेदाची रुढी परंपराची बंधनं पाळत होता, स्त्री शिक्षणाला विरोध करत होता, समाजसुधारणेच्या वाटेवर चालणाऱ्यांना वाळीत टाकलं जाण्याचा धोका होता, अशा काळात सावित्रीबाई जोतिबांच्या खांद्याला खांदा लावून नुसत्या उभ्या राहिल्या नाहीत, तर त्यांनी स्वतंत्रपणे समाजाचं नेतृत्व केलं. जोतिबांच्या निधनानंतरही त्यांनी सामाजिक कार्याची धुरा सक्षमपणे वाहिली.

त्या माऊलीने शिव्याशाप सहन करीत, दगड-धोंडे चिखल झेलीत, आत्मसन्मानाच्या वाटेवर खंबीर होऊन चालत राहण्याचा मार्ग पत्करला, म्हणून आजची स्त्री सक्षमीकरणाची पाऊलवाट तयार झाली, हे समाजात ठळकपणे रुजणं गरजेचं आहे. स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या अग्रणी म्हणून आज भारत देश सावित्रीबाईंना ओळखतो.

आजच्या कोविडसंकटकाळात सर्व तऱ्हेची खबरदारी घेऊन लोक कार्यरत आहेत ; पण ज्या काळात सुरक्षिततेची साधनं नव्हती, त्या काळात सावित्रीबाई पाठीवर प्लेगचा रुग्ण घेऊन दवाखान्यात धावल्या होत्या. एक योद्धाच जणू !

पण त्यावेळचे शिक्षणाचे, आरोग्याचे, सुविधांचे, स्त्रीपुरूष विषमतेचे, जातीयतेचे, धर्मांधतेचे विषय आजही आ वासून उभे आहेत. किंबहुना, ते दिवसेंदिवस भेसूर होत चाललेत. विखारी विषाणू वेगाने पसरतोय आणि विचारांची मात्रा संथगतीने काम करतेय. जनमानसात सावित्री जितकी रुजेल, भिनेल, तितकी विखारांची बाधा कमी होईल. म्हणूनच सावित्री उत्सवाचं प्रयोजन !

जयंतीच्या औपचारिकतेची मरगळ झटकून विचारांचा उत्सव रुजवण्याचा प्रयत्न म्हणजे सावित्री उत्सव ! जातीपातीधर्माच्या पलिकडे जाऊन समाजात माणूसपण टिकवण्यासाठीची एकजूट म्हणजे सावित्री उत्सव !

आपल्या घरापासूनच सावित्री उत्सवाच्या आयोजनाची सुरुवात आपल्याला करावी लागेल.

घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून घर सजवा व रंगवा व विविध कल्पकतेने नटवावं. सामाजिक संदेश लिहावेत. रोषणाई करावी. दारात कंदील लावावा. पणती लावावी. रांगोळी काढावी. दाराला तोरण बांधावं. घरात गोडधोड करावं, शेजारीपाजारीही द्यावं आणि कोणी विचारलं तर गर्वाने सांगावं, आज काय आहे, तर सावित्री उत्सव आहे !

वक्तृत्व, सामाजिक संदेशांचं सुलेखन, एकांकिका, एकपात्री, निबंध, काव्य लेखन, गायन, ज्योतिबा सावित्री तसंच इतर समाजसुधारकांच्या प्रबोधनात्मक विचारांचं अभिवाचन, असे कला साहित्य वाहिलेले अभिव्यक्तीचे विविध उपक्रम, गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार, प्रभातफेरी, समूहगान, पोस्टर स्पर्धा, शाळाबाह्य मुलांचा शोध, त्यांना पुन्हा शिक्षणात आणण्यासाठी प्रयत्न, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटप, ऑनलाईन वेबिनारचं आयोजन, चर्चासत्र, रक्तदान शिबीर, संविधानाच्या उद्देश्यिकेचं सामुहिक वाचन, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचा आसूडसारख्या पुस्तकाचं अभिवाचन ! असे कित्येक उपक्रम करण्यासारखे आहेत.

अगदी सावित्री उत्सवाच्या निमित्ताने एकत्र फिरायला, जेवायला गेलात, पाहुणे घरी बोलावलेत, सावित्रीच्या लेखांचं, विचारांचं, कवितांचं वाचन केलंय, दोन शब्द व्यक्त केलेय, तरीही हरकत नाही.

3 जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ! आम्ही या दिवसाला म्हणतो, नव्या वर्षातला पहिला उत्सव, सावित्री उत्सव ! गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांचा जयंतीदिन सावित्री उत्सव या शीर्षकाखाली साजरा होतोय. राष्ट्र सेवा दलाने याची सुरुवात केली आणि कायद्याने वागा लोकचळवळी सहित अनेक संस्था संघटनांनी ती पुढे नेली. आज महाराष्ट्रात जिथे कुठे सावित्रीबाईंची जयंती साजरी होते, ती सावित्री उत्सव या नावानेच !

एक प्रकारे हा दिवस केवळ एखाद्या समाजसुधारकाच्या जयंतीपुरता मर्यादित राहिलेला नसून तो आता महाराष्ट्राचा सण झालाय, उत्सव झालाय. ही एक सामाजिक क्रांती आहे. ती वर्तमानातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतील सातत्यामुळे महाराष्ट्रात रुजली आहे. गरज आहे तिला मूर्त स्वरूप देण्याची. लोकमान्यता मिळाली आहे ! आता व्यापकता वाढायला हवी ! सावित्री उत्सव घरोघरी साजरा व्हायला हवा.

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

संपादक, मिडिया भारत न्यूज

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!