सयाजी शिंदेंच्या अभिव्यक्तिचं रोपटं कोणी चिरडलं?

सयाजी शिंदेंच्या अभिव्यक्तिचं रोपटं कोणी चिरडलं?

सयाजी शिंदेंच्या अभिव्यक्तिचं रोपटं कोणी चिरडलं?

सयाजी शिंदे कधीकाळी साताऱ्यातील काण्हेर धरणावर पहारेकरी होते. पुढे आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर मानेवाडी ते काण्हेर धरणाच्या रस्त्याच्या एका बाजूला शिंदेंनी स्थानिक ग्रामस्थाच्या मदतीने अडीच हजार झाडं लावली. सुरूवातीला, ते शासकीय रोपवाटिकेतून मोफत रोपटी मिळवत. पण पर्यावरणाचा विचार करून सुसंगत वृक्षारोपण व्हावं, म्हणून त्यांनी खाजगी खटाटोप सुरू केला. अर्थ, इतकाच की सयाजी शिंदेंना वृक्ष लागवडीचं ज्ञान आहे. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेवर बोट ठेवलं. त्यांचे व्हायचे ते परिणाम झाले आणि यापुढे आपण सरकारविरोधात बोलणार नाही, अशी जाहिर प्रतिज्ञा सयाजी शिंदेंना करावी लागली.

महाराष्ट्र सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेला सयाजी शिंदेंनी बनावट म्हटले. करोडो झाडं कुठे लावणार, कशी लावणार, झाडांच्या प्रजातींची, आवश्यकतेची माहिती जाणून न घेता, सरकार मोहिम राबवतंय, अशी सयाजी शिंदेंची टीका होती. सरकारला ती झोंबली असावी. पडद्यामागे नेमकं काय घडलं, ते कळून येऊन शकलेलं नाही, पण सयाजी शिंदेंची माफी मागताना ची देहबोली प्रचंड ताणतणावाखालची, दबावाखाली किंवा मनस्तापाखालची स्पष्ट दिसते. भारतीय जनता पार्टीची आपल्या विरोधातील आवाज जागच्या जागी चेपून टाकणारी कार्यशैली पाहता, काय झालं असेल, यांचा अंदाज बांधता येतो.

वास्तविक, एबीपी माझा ने सयाजी शिंदेंना बळीचा बकरा केला, असं संबंधित वक्तव्य पाहताना सहज लक्षात येतं. शिंदेंच्या वृक्षारोपण कार्यक्रमाची माहिती घेण्याच्या बहाण्याने पत्रकाराने शिंदेंना सरकारविरोधात बोलण्यास भाग पाडलं. जे पत्रकारांनी स्वत: शोध पत्रकारिता करून मांडायला हवं होतं, ते शिंदेंच्या तोंडी वदवून एबीपी माझा ने जी सनसनाटी केली, त्यांचा मनस्ताप शिंदेंसारख्या प्रामाणिक निसर्गप्रेमी माणसाला भोगावा लागला.

काय नेमकी टीका केली होती सयाजी शिंदेंनी सरकारवर?

बोलण्याच्या ओघात जरी शिंदे सरकारविरोधात बोलले असले तरी त्यांनी मांडलेली परिस्थिती सत्य आहे. कोणतीही शास्त्रीय पर्यावरणीय आवश्यकता न तपासता सरधोपटपणे राज्य सरकार वृक्षलागवड करत आहे. पण सत्य बोलणं सयाजींना महागात पडलं. सरकारमधील राजकीय शक्तींनी निम्नस्तरावरील कर्मचाऱ्यांना उकसवलं. लगेच संप वगैरेच्या धमक्या पुढे आल्या. नेहमीच्याच रूढ झालेल्या गुन्हेगारी पूर्वनियोजनानुसार, शिंदेंना जाब विचारणारे, मनस्ताप देणारे, धमकावणारे शेकडो काॅल गेले. ते व्यथित झाले. आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांना सांगण्यात आलं की माफी मागून विषयावर पडदा टाक. आपलं काम तर सुरूच राहणार आहे. पण सहजासहजी सरळ माफी मागणारा सयाजींचा स्वभाव नाही. ते म्हणाले, तुम्ही एकदा म्हणता, मी दहावेळा माफी मागतो. तुम्ही चांगलं काम करीत आहात. तुमच्या कामाला माझ्या सदिच्छा.

महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील वेलेकामटी गावातला शेतकरी कुटुंबातील सयाजी शिंदेंचा जन्म. बालपण तिथेच गेलं. घरची परिस्थिती बेताची होती. शिकायची इच्छा होती, म्हणून सयाजींनी शासनाच्या पाटबंधारे विभागात पहारेकरी म्हणून नोकरी केली. ती नोकरी करता करताच त्यांनी पदवी पर्यंतचं शिक्षण केलं आणि त्याच विभागात लिपिक पदावर गेले. पण सयाजींचं मन सरकारी नोकरीत रमलं नाही. पुढे कुर्ला सहकारी बँकेत नोकरी पत्करली.

शाळा, काॅलेजापासून असलेला अभिनयाचा ध्यास काही त्यांनी सोडला नाही. अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडेंच्या ” आविष्कार ” मध्ये त्यांची जडणघडण झाली. जब्बार पटेल, वामन केंद्रे, पु ल देशपांडे अशा अनेक दिग्गजांनी सयाजींच्या कामाचं कौतुक केलंय. मराठीत नाटक, सिनेमा करत असताना त्यांनी “शूल” मधून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आणि हिंदीत एका दमदार नव्या खलनायकाचा जन्म झाला. दक्षिणात्य सिनेरसिकातही सयाजी शिंदे ची लोकप्रियता असून, तिथे त्यांनी पुरस्कारही घेतले आहेत.

या सगळ्या प्रवासात सयाजींची खेड्याकडे ओढ आणि निसर्गावरचं प्रेम कायम राहिलं. ते साताऱ्यात गावाशी संपर्क ठेवून राहिले. सयाजींच्या गावात आंब्याच्या १६ प्रजाती आहेत. अनेक पिढ्या त्या झाडांवरच जगल्या, चालल्या, पण नवीन झाड लावायची तसदी मात्र कुणी घेतली नाही. सयाजींनी तो निर्धार केला. कोणती एनजीओ नाही की शासकीय अनुदान नाही. मित्रपरिवार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वेलेकामटी आणि परिसरातील दहा गावात २५ हजार झाडं लावली. ती सांभाळली, जगवली. सातारा व उर्वरित महाराष्ट्रात सयाजींनी आजवर चार लाख झाडं लावलीयंत. शासनाची ५ कोटी झाडांची योजना त्यांना थोतांड वाटते. खरं तर संबंधित मुलाखतीत शिंदे यांनी, गेल्या सत्तर वर्षातील वृक्ष लागवडीचा हिशोब मागितला पाहिजे, असंही म्हटलंय.

सयाजी शिंदे यांनी सरकारवर केलेल्या टीकेनंतर नाशिक महापालिकेने आपला पर्यावरण दिनाचा कार्यक्रम रद्द केला, ज्यात शिंदे यांचाही सहभाग होता. नाशिकात बेल महोत्सव करण्याचा नाशिक महापालिकेचा मानस होता. विशेष म्हणजे नाशिक महापालिकेच्या वृक्ष संवर्धन मोहिमेचे सयाजी शिंदे हे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहेत.

माणूस जेव्हा एखाद्या विषयात तळमळीने काम करतो, तेव्हा त्यात आलेली लबाडी त्याला सतावते, अस्वस्थ करते. बहुधा, त्यातूनच सयाजी शिंदेंनी सरकारवर टीका केली. पण सयाजीसारख्या लोकप्रिय कलावंतांची टीका सरकारला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परवडणारी नव्हती. त्यात सयाजीचं वक्तव्य म्हणजे, अभिव्यक्तीचं रोपटंच. ते वाढू न देण्याची खबरदारी सरकारने घेतली आणि रोपटं जागेवरच चिरडलं. आपण सरकारविरोधात बोलणार नाही, असं करत असतानाच सयाजींनी सरकारला पुढील कामासाठी खोचक सदिच्छाही दिल्या आहेत.

 

——राज असरोंडकर——

लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक आहेत.

लेखाखालील प्रतिक्रिया रकान्यात आपलं मत जरूर नोंदवा.

 

MediaBharatNews

Related Posts
comments
  • आयुष्याच्या खडतर प्रवासाला मात देणारया सयाजी शिंदेंना असल्या मुजोर सरकारला भिक द्यायला नको होत. बरेच दाक्षिणात्य अभिनेते अश्याना भीक घालत नाही त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा.

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!