हे पाहा बाई, आपल कसं खणखणीत नाणं असावं. उगीचच काहीतरी वल्गना करू नयेत...समोरून आवाज आला तशा बाई भानावर आल्या. थोड्या शांत होऊन पुन्हा बोलू लागल्या. 'सर ! तुम्हाला नाही वाटत का माझं नाणं खणखणीत आहे असं? मी प्रयत्न केला. माझ्या बाजूने मी मनापासून कर्तव्य बजावत आहे. पण एक सांगू का?' बाईंचा आवाज थोडा हळवा झाला.
खणखणीत नाण्याचा खणखणीत आवाज येण्यासाठी जागासुद्धा तशीच असायला हवी. आपण आटोकाट प्रयत्न केला पण समोरच्याने जर आपल्याला योग्य प्रतिसादच दिला नाही. तर त्यात प्रयत्न करणार्याचा काय दोष ? तो कमी पडला, असा त्याला दोष देऊन बाकीच्या लोकांनी नुसता असुरी आनंद घ्यायचा का?

समजा एखाद्याकडे एखाद्या क्षेत्रातलं खूप ज्ञान आहे..पण त्या क्षेत्रात त्याला काम करण्याची संधीच नाही मिळाली तर त्याच नाणं खणखणीत नाही, असं म्हणण्यात काहीच पॉईंट नाही. तुमच्याकडे खूप ज्ञान असूनही उपयोग होत नाही...जोपर्यंत तुम्ही त्याचा वापर योग्य ठिकाणी करत नाहीत. योग्य संधी मिळाली तरच त्याचा वापर करता येतो.
एखादी लोखंडी वस्तू गादीवर पडली तर तिचा आवाज कितीसा होणार आहे ! पण तीच वस्तू जर दगडावर किंवा एखाद्या टणक जागेवर आदळली तर किती जोराचा आवाज होईल; त्यामुळे गादीवर पडलेली आणि दगडावर पडलेली वस्तू सारखीच जरी सारखीच असली तरीही होणारा आवाज मात्र सारखा नसतो.

आपले खरे गुण दाखवण्यासाठी तशी संधी मिळणं ही आवश्यक आहे. आणि त्यासाठी योग्य जागाही आवश्यक आहे. पारखी नजर बरोबर हेरून घेते एखाद्या व्यक्तीची नेमकी जागा. मग त्यानुसार केलेलं काम केव्हाही चांगलंच होत. कुणालाही नावं ठेवायला जागाच उरत नाही.
कितीतरी लतादीदी, कितीतरी सचिन तेंडुलकर आणि कितीतरी शाहरुख खान असतील सभोवताली; पण ज्यांना झळकायला मिळालं, ज्यांना संधी मिळाली, त्यांचं नावं झाली. बाकी असेच राहिले...

तुमच्याकडे अगाध ज्ञान असून उपयोग होत नाही. ते तुमच्याकडे आहे, हे जाणणारे लोकही समोर हवेत. तुम्ही उत्तम व्याख्याते आहात पण तुम्हाला ऐकून घेण्यासाठी उत्तम श्रोतावर्ग नसेल तर?
चविष्ट जेवण बनवता येतय पण ते खायलाच कुणी चांगला खवय्या नसेल तर? बघा ! आहे ना अडचण !!

आपला खणखणीतपणा सिद्ध करण्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा ; म्हणजे उगीचच कोणाचे दोन शब्द ऐकून घेण्याची वेळ येत नाही. जे आता मी केलं. सर मी नाही, तर ही जागाच माझ्यासाठी योग्य नाही.
सॉरी सर, जरा जास्तच बोलले. पण काय करणार हे तुम्हाला सांगितलं नसतं तर तुम्हाला ते कदाचित कधीच कळलं नसतं...
एवढे बोलून माया ऑफिसमधून ताठ मानेने निघून गेली आणि सर तिच्या पाठमोर्या आकृतीकडे स्तब्ध होऊन बघतच राहिले.
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com