नात्यात कुणी कुणाचं मालक नाही !

नात्यात कुणी कुणाचं मालक नाही !

नात्यात कुणी कुणाचं मालक नाही !

भारतीय संस्कृतीत पितृसत्ताक पद्धतीमध्ये आजही स्रीचे दमनच होताना दिसून येतं. नेहमीच मनात विचार येतात, बाबासाहेब जन्मले नसते तर…त्यांनी महिलांसाठी विशेष कायदे केले नसते तर…या पितृशाहीने स्रीला गुलाम बनवून ठेवले असते.जातीच्या गुलामीपेक्षा स्रीदास्य फार भयंकर आहे.

भारत हा खेड्यांचा देश आहे. तशी पहिली तर स्रीयांची अवस्था खेड्यात आणि शहरात फारशी वेगळी नाही. त्यात दोन्ही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने स्रीयांचं शोषण होत असतं. शारीरिक शोषण दिसणारं आहे, पण मानसिक शोषण दिसत नाही. नकळतपणे त्याचा परिणाम हा तिच्या मनावर, शरीरावर होत असतो. लग्नाच्या आधी, लग्न झाल्यानंतर, बाळंतपणानंतर, मुलांच्या वाढीच्या अवस्थेत, रजोनिवृत्तीच्या काळात तिच्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्स बदल होत असतात. अशा वेळी तिची होणारी चिडचिड,मनावर होणारा मानसिक आघात याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं.

खेड्यामध्ये महिला शेतावर काम करतात. उन्हातान्हात कष्ट करतात. घरातली जबाबदारीही नीट पार पाडत असतात, तरीही त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असते. मुळातच तू स्री आहे,तू चूल आणि मूल बघ असं म्हटलं जातं.

शहरी किंवा निमशहरी भागात आपल्याला असेच प्रकार दिसून येतात. जर का ती कमावती, अर्थाजन करणारी असेल तर तिचं आईबाबतचं कर्तव्य तिला शिकवलं जातं. मुलांकडे लक्ष देणं ही तिचीच जबाबदारी आहे , हे सांगितलं जातं. ती पण लीलया पार पाडत असते.

याउलट जर का ती गृहिणी असेल तर मात्र ती घरातच असते, तिला काय काम असते, या आविर्भावात सगळे वागत असतात. तीचं दुखणं खुपणं, मासिक पाळी, तिला असणारा एखादा विकार याकडे ढुंकूनही पाहिलं जात नाही.मानसिक आधार देण्याऐवजी खिल्ली उडविली जाते.

बाबासाहेबांचा पत्नीच्या संदर्भात एक विचार वाचला आहे, तो असा की, पतीपत्नीने एकमेकांसोबत मित्र मैत्रीणीप्रमाणे वागावे, राहावे. पतीने नवरा न होता मित्र बनावे. नवरा झाला तर तो मालकी हक्क असल्यासारखा वागू लागतो.दोघांचंही नातं मानसिकरित्या सदृढ झालं पाहिजे.

सोशल मीडिया काय आणि इतर गप्पा काय सगळीकडे पतीपत्नीचे चुटकुले वाचतात, त्याची मजा घेतात. विशेषत: महिलांवर जास्त विनोद केले जातात. तिला पुरुष घाबरतो, तिचं वजन वाढतं…काय आणि काय ???? मुळात कोणत्याही स्रीला वजन वाढवायची हौस नसते, तिला सुंदरच दिसायचे असतं. कोणता पुरुष आपल्या पत्नीला घाबरत असतो, यात किती तथ्य आहे ?

एकदा बाई वजा आई या नाटकाच्या कलाकारांची मुलाखत घेताना कवी वृषाली विनायक यांनी प्रश्न विचारला होता, सगळी कामं आवरून जरासा वेळ मिळाला की, आई ऑनलाईन येते तेव्हा घरातल्यांचे डोळे मोठे होतात. नातेवाईक, मित्र मंडळी विचारतात, हल्ली तुम्ही ऑनलाईन दिसतात. काय म्हणायचं????

तिने रेसिपी पाहुदे, एखादी फेसबुकलामित्र मैत्रीण जोडू दे,एखाद्या ग्रुप ला जॉईन करू दे. तिने तिच्या मर्यादेतच रहावे. मर्यादेच्या बाहेर (चार लोकांशी गप्पा गोष्टी,हास्य विनोद) केला की तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा ही इथली संस्कृती….

स्री आणि पुरुष हे दोघेही व्यक्ती म्हणून सारखेच आहेत. फक्त फरक शरीररचनेत आहेत. दोघांची होत जाणारी जडण घडण वेगवेगळी होत जाते.खरं तर दोघेही एकमेकांना पूरक असतात. कुणीही कुणाचे मालक नसतात. इतकी साधी गोष्ट आहे.

 

 

शालिनी आचार्य

शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या, कायद्याने वागा लोकचळवळीच्या अलिबाग समन्वयक


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!