असेन मी, नसेन मी…तरी असेल गीत हे !

असेन मी, नसेन मी…तरी असेल गीत हे !

असेन मी, नसेन मी…तरी असेल गीत हे !

गजानना श्री गणराया आधी वंदु तुज मोरया, गौरी संगे स्वये सदाशिव शिशु कौतुक पाहतो , गणराज रंगी नाचतो…गणेशोत्सवातल्या दहा दिवसांत घराघरांतून गेली कित्येक वर्ष ह्या गाण्यांनी प्रसन्नता निर्माण केलेय. ह्या गाण्यांचे शब्द आहेत शांता शेळके यांचे.

शांता शेळके यांच्या कविता मराठी कवितेने कायम ह्रदयात जपल्या आहेत. शांताबाईंच्या गाण्यांवर मराठी रसिक आजही प्रेम करतोय.

वडिलांच्या बदलत्या नोकरीमुळे शांताबाईंचं बालपण वेगवेगळ्या गावांत गेलं. तिथला निसर्ग त्यांनी टिपला. पारंपारिक गीते, अभंग, श्लोक, ओव्या हे सगळं बालवयात कानावर पडत होतं. कवितेचा संस्कार इथेच होत होता.

पुढे पुण्यात पदवीला शिकत असताना श्री.म.माटे, के.ना.वाटवे, रा.ग.जाधव यांसारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली शांताबाईंचं लेखन आकारत होतं.

कविता, कथा, कादंबरी, ललित निबंध, आत्मचरित्र, बालसाहित्य, चित्रपटगीत शांताबाईंनी लिहिलं. अशी बहुआयामी प्रतिभा क्वचितच !

शांताबाई शेळके लोकप्रिय आहेत ते त्यांच्या तरल गीतलेखनामुळे. त्यांची गाणी म्हणजे संगीतात लपेटलेली मोहक कविताच. राजा सारंगा माझ्या सारंगा, वादळ वारं सुटलं गं, असा बेभान हा वारा, शूर आम्ही सरदार, शारदसुंदर चंदेरी राती यासारख्या गाण्यांत मराठी भाषेचा गंध अनुभवता येतो. रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढिला हात नका लावू माझ्या साडीला…असं लिहिणाऱ्या शांताबाई शेळके पहिल्या लावणीकार ठरतात.

खट्याळपणा जपताना गाण्याला कुठेही उथळपण येणार नाही याचं भान शांताबाईंच्या गाण्यांतून दिसतं. निसर्गाची कितीतरी रूपं त्यांनी गीतांतून सजीव केली.

शांताबाईंच्या लेखनात जेवढं वैविध्य तेवढंच जगणं अतिशय साधं. डोक्यावर पदर, भाळावर कुंकू आणि नजरेत विद्यार्थी प्रेम. विद्यार्थ्यांच्या आवडत्या बाई ! आळंदी इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शांताबाई शेळके अध्यक्ष होत्या. हा मराठी कवितेचा बहुमान !

असेन मी नसेन मी
तरी असेल गीत हे
फुलाफुलात येथल्या
तरी हसेल गीत हे

आपल्या गीतांतून नेहमीच रसिकांवर माया करणाऱ्या शांताबाई शेळके. आज बाईंचा स्मृतिदिन. विनम्र अभिवादन !

News by Vrushali Vinayak


 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!