सिद्धार्थने मला समाजभान दिलं !

सिद्धार्थने मला समाजभान दिलं !

सिद्धार्थने मला समाजभान दिलं !

कुठलीही संस्था गतिशील असते, चळवळ असते पण माझं काॅलेजच मुळात चळवळीचं अपत्य आहे. ही चळवळ परिवर्तनाची, माणसाच्या संघर्षाची होती. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ म्हणजे समाज बदलाला कारण ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेबांनी साकारलेलं स्वप्न. काॅलेजात शिकत असताना याची आच नव्हती. आता हळूहळू बाबासाहेब समजून घेते, तेव्हा कळतं, आपला कणा प्रचंड उर्जेचा आहे.

बाबासाहेब कॅबिनेट मंत्री असताना मागासवर्गीयांच्या नोकरीची तरतूद त्यांनी केली होती. पण शिक्षण नसल्याने मागासवर्गीय उमेदवार मिळत नव्हता.
तळागाळातल्या समाजाला शिक्षण देताना प्रस्थापित व्यवस्थेत स्वतःची शैक्षणिक संस्था हवी, जी स्थिर आणि निरंतर कार्यप्रवास सुरू ठेवेल. हा उदात्त हेतू समोर ठेवून ८ जुलै १९४५ ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना बाबासाहेबांनी केली. पाठोपाठ लगेचच मुंबईचं सिध्दार्थ महाविद्यालय आणि औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाची वीट रचली.

‘माणूस’ प्रतिष्ठापनेच्या लढ्यात ही महाविद्यालये आजही चळवळ आहेत. इथलं शिक्षण विवेकाचं आहे.. गुलामीला झिडकारणारा अभ्यासक्रम आहे. मानवी मूल्यांच्या उभारणीत सर्वस्व पणाला लावून लढावं लागतं, याचा दाखला पीपल्सच्या विद्यार्थांनी पदोपदी निर्माण केलाय.

दलित साहित्याचा प्रवाह निर्माण होण्यास पीपल्सने दिलेल्या ‘स्व’भानाचा विचार मोठा आहे. ‘एका अविद्येने अनर्थ’ होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेला पीपल्स हा बहुजनांचा पासवर्ड होता.

कमवा आणि शिका हे पीपल्सचं तत्त्व आहे. तेव्हा सकाळच्या वेळेतलं एकही महाविद्यालय नव्हतं. मुंबईच्या ‘हार्ट ऑफ दि सिटी’त बाबासाहेबांनी नोकरी करून शिक्षण घेणाऱ्यांसाठी हक्काची वाट निर्माण करून दिली.

केशव मेश्राम, राजा ढाले, ज.वि.पवार अशा कितीतरी स्वतंत्र प्रज्ञेच्या साहित्यिक, सामाजिक चळवळी याच संस्थेच्या प्रांगणात घडल्या. म.भि.चिटणीस, भालचंद्र फडके, रा.ग.जाधव, म.ना.वानखेडे, मधु दंडवते, वा.ल. कुलकर्णी, मे.पु.रेगे यांसारख्या व्यक्तींचं पीपल्ससाठीचं योगदान महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांची दूरदृष्टी प्रत्येक कृतीत स्पष्ट होते.

पीपल्स एज्युकेशनमध्ये शिकताना बाबासाहेबांच्या प्रज्ञेत तुम्ही आपोआप विसर्जित होता. परिवर्तनाच्या लढ्याचे साक्षीदार होता. पीपल्स तुम्हाला बोलायला शिकवतं. नाही बोललात तरी बोलण्याचा अधिकार टोचत राहावा एवढी संवेदनशीलता तुमच्या मेंदूत आलेली असते. शिक्षणाने आंधळेपणा दूर होतो, उघड्या डोळ्यांनी सगळं स्पष्ट दिसतं.

पीपल्सने आजवर हजारो-लाखोंचा मार्ग प्रकाशमान केलाय. बाबासाहेबांनी आपली मोठी ग्रंथसंपदा पीपल्सला दिली आहे. बाबासाहेब तिथल्या प्रत्येक पुस्तकात आहेत.

पीपल्समध्ये शिकत असताना बाबासाहेब ओझरते दिसले, आता कुठे नीटसे कळू लागलेत. माझ्या काॅलेजने मला समाजभान दिलं. Yes, I am Siddharthian.

पीपल्सची पंचाहत्तरी असल्याचा आनंद एकीकडे असताना राजगृहाच्या हल्ल्याची विषण्णता आहे.

लढाई बाबासाहेबांनी लेखणीने लढली; त्याच प्रकाशवाटेवरचे आम्ही अनुयायी ! लढत राहू, लिहित राहू !!!

आँधी की परवाह हम नही करते
हर पथ पर नया सूरज उगा है !

वृषाली विनायक

अध्यापक. मराठी कवितेतलं एक अग्रणी नाव. मराठी कवितेवर संशोधन सुरू. झिम्माड काव्यसमुहाच्या संचालिका. महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्या अध्यक्ष. कायद्याने वागा लोकचळवळीच्या सुकाणू समिती सदस्य.

MediaBharatNews

Related Posts
comments
 • अस्मिता

  July 8, 2020 at 2:44 pm

  अगदी… बरोबर… मानवता शिकविणारी.. शिकवण दिली. अशा
  अनुयांयांची… प्रतिक आहेत ही…

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!