‘आज्ञा’ मोडून ‘मौन’ बोलू लागलं !

‘आज्ञा’ मोडून ‘मौन’ बोलू लागलं !

‘आज्ञा’ मोडून ‘मौन’ बोलू लागलं !

१६ एप्रिलला खारघर येथील एका भव्य कार्यक्रमात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देऊन त्यांचा सत्कार करण्याचा मोठा राजकीय घाट महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने घातला होता. या कार्यक्रमाला अमित शहांसहित भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना बोलवण्यात आल्यामुळे त्या कार्यक्रमावर भारतीय जनता पार्टीचंच वर्चस्व होतं.

पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपाच्या वक्त्यांनी हात धुवून घेतले आणि राजकीय स्वरूपाची भाषणे केली. त्यावर त्यांना टाळ्याही मिळाल्या असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर म्हणाले की सूर्य आग होत असताना इतके लोक तळपत्या उन्हात बसून आहेत ही अध्यात्मिक शक्ती आहे. हे विधानही टाळ्या घेण्यासाठी जोरदार होतं परंतु काही वेळानंतरच त्या अध्यात्मिक शक्तीचं पितळ उघडं पडलं.

कडक उन्हाने लोक हैराण झाले होते. त्यांना सहन करण्यापलीकडे मनस्ताप होत होता. त्याचे दुष्परिणाम थोड्याच वेळात दिसून आले आणि चक्कर येऊन लोक पडू लागले; त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ माजला. चेंगराचेंगरीही झाली.

रुग्णालयात उपचार सुरू असताना तेरा लोक दगावलेत. शेकडो अजूनही उपचार घेतायंत आणि मृतांचा आकडा अजून वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. लाखोंच्या संख्येत फक्त मोजक्या लोकांनाच चक्कर आली असेल किंवा मोजकेच लोक दगावले असतील असं सांगता येत नाही.

संख्या मोठी असावी अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे ; परंतु धर्माधिकारींच्या दरबारात आज्ञा नावाचा एक प्रकार चालतो. आपण त्याला फतवा असंही म्हणू शकतो. आज्ञेमुळे लोक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत गप्प आहेत.

खरं म्हणजे जी घटना घडली ती सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे ! धर्माधिकारी यांचा दोष हा की त्यांनी दुपारच्या रणरणत्या उन्हात कार्यक्रम घ्यायला विरोध केला नाही. एक प्रकारे लोकांच्या जीविताशी क्रूर खेळ केला.

सरकारमधील लोक आपली जबाबदारी झटकत आहेत आणि धर्माधिकारी यांच्याकडूनच दुपारची वेळ सांगण्यात आली असा खुलासा करत आहेत. एकंदरीत खारघरच्या घटनेनंतर समाजमाध्यमात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचं दिसून येत आहे. अध्यात्मिक शक्तीच्या नावाखाली लोकांची जी फसवणूक सुरू होती त्याचं भांड फुटल्याने त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत.

धर्माधिकारी यांच्या बैठकांत लोकांना चांगलं वळण लावलं जातं असं सांगण्यात येतं, परंतु समाजमाध्यमातील त्यांचे समर्थक विरोध करणाऱ्यांना उघड धमक्या देत आहेत. हे दूषित वातावरण बघून आता धर्माधिकारी यांचे समर्थकही अस्वस्थ झाले आहेत. आप्पास्वारीची बदनामी त्यांना सहन होत नाहीये, त्यामुळेच 'आज्ञा' मोडून आता 'मौन' बोलू लागलं आहे. राज्य सरकारच्याविरोधातील रोष व्यक्त करू लागलं आहे.

आजवर अनेक सरकारांनी परिवारासोबत कार्यक्रम केले, सत्कार सोहळे आयोजित केले परंतु प्रत्येक वेळी कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन परिवाराकडे असायचं. त्या जोरावरच आजवरचे सर्व कार्यक्रम सुनियोजितपणे शिस्तबद्धतेने पार पाडले गेले, असं सांगत यावेळी मात्र सरकारने कार्यक्रमाचं खाजगी व्यवस्थापन केलं जे संपूर्ण अपयशी ठरलं आणि त्यातूनच अघटित झालं, असं आता धर्माधिकारी यांचे समर्थक हळूहळू बोलू लागले आहेत.

कार्यक्रमाच्या ठिकाणी शौचाची, मुतारीची व्यवस्था नव्हती. ती कार्यक्रम ठिकाणापासून दीड दोन किलोमीटरवर होती. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था जवळपास कुठे नव्हती. मुतारीची व्यवस्था जवळ नसल्याने पाणी प्यावं की न प्यावं या संभ्रमात लोक होते.

विशेष करून कार्यक्रमाला जे लोक एकटे आले होते, त्यांचे हाल झाले. जे कुटुंबासहित होते त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी चक्कर आल्यानंतर बाजूला नेऊन कुठे सावलीत बसवणे, शांत बसून राहणे, आडोसा करून सावली करणेअसे उपाय केले. घटनेचे जे विडिओ बाहेर आलेत त्यात पाहायला मिळतं की चक्कर येऊन पडलेल्यांकडे लोक ढुंकुनही पाहत नव्हते.

चक्कर आल्यानंतर जवळपास दीड दोन तास लोक बसून किंवा पडून होते. कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा बसेसची किंवा खाजगी वाहनांची कुठलीही व्यवस्था न झाल्याने लोकांचे अतोनात हाल झाले.

अमित शहा यांचं या कार्यक्रमाला येणं सुद्धा लोकांच्या जीवावर बेतलं. कडक सुरक्षेच्या नावाखाली कार्यक्रमाचे ठिकाणी मोबाईल जामर लावले गेले होते. त्यामुळे नातेवाईकांशी संपर्क होत नव्हता. बॅरिगेटिंगही मोठ्या प्रमाणावर केलं गेलं होतं. नियोजन केल्याचे सांगण्यात येत असलं तरी लोकांना त्रास सुरू झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणि बॅरिगेटिंगमुळे लोक उपचारांपर्यंत लवकर पोचू शकले नाहीत. बसेस किंवा खाजगी वाहनेही उपलब्ध नव्हती. कार्यभाग साधल्यावर सरकारने लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं.‌गोंधळ माजला तो यामुळे असं असा धर्माधिकारी यांचे समर्थक सांगत आहेत.

जर कार्यक्रमाचं नियोजन श्री सदस्यांकडे असतं, सरकारने त्याच्या टेंडरिंगचा हव्यास टाळला असता तर ही दुर्घटना झाली नसती असं त्यांचं म्हणणं आहे; परंतु अजूनही उघडपणे कॅमेरा समोर यायला हे लोक तयार नाहीयेत, कारण तशी 'आज्ञा' अजून आलेली नाही. तुम्ही आम्हाला सांभाळा, आम्ही तुम्हाला सांभाळतो, असा एकमेकांना गोंजारण्याचा प्रकार सुरू आहे.‌ मृतांबद्दल कोणाला कसलीही सहानुभूती नाही की खंतखेद नाही.

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!