स्मितहास्य : सकारात्मकतेचं प्रतिक !

स्मितहास्य : सकारात्मकतेचं प्रतिक !

स्मितहास्य : सकारात्मकतेचं प्रतिक !

फुलाला ज्याप्रमाणे त्याचा रंग, गंध आणि आकार आकर्षक बनवतं तसंच माणसाचं चेहर्‍यावरील हास्य त्याच सौंदर्य खुलवतं. हास्य म्हणजे प्रसन्नतेचं, सकारात्मकतेचं प्रतिक आहे. घरात येणार्‍याचं स्वागत जर स्मितहास्याने केलं तर तो येणारा कृतकृत्य होतो.

तेच जर कपाळावर आठ्या ठेवून स्वागत केलं तर त्याला कधी एकदाचा इथून बाहेर पडतो, असं होऊन जातं. पाहुणे खुश होतात जेव्हा त्यांचं हसुन स्वागत केलं जातं; त्यामुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.. येणारा पाहुणा सुद्धा आपसूकच चांगले आशीर्वाद देऊन जातो..

असं म्हणतात वास्तू तथास्तू म्हणत असते… त्यांचे घराला मिळालेले मनापासूनचे आशीर्वाद घराला बोलकं करतात. विचार करा की हॉस्पिटलमध्ये डॉ. आणि नर्स रुग्णाशी किती प्रेमळपणे, हसुन बोलतात, दिलासादायक बोलतात. अर्धा आजार तर त्यांच्या स्मितहास्यानेच पळून जातो. लवकरच रुग्णाला बरे वाटू लागते. फार प्रेमळपणाची वागणुक दिली जाते.

हॉटेलमध्येसुद्धा आपलं स्वागत स्मितहास्याने केलं गेलं तर आधीच मन भरतं. मग पोट भरतं. जेवणापेक्षा सुद्धा त्यांची प्रेमळ वागणूक, हसुन केलेलं स्वागत आपुलकी सिद्ध करते. स्मितहास्य करणारी व्यक्ति दुसर्‍याला तर आनंद देतेच, पण ती स्वतःलाही प्रसन्न ठेवते.

अशा व्यक्ती शक्यतो जास्त आजारी पडत नाहीत. त्या कायम दुसर्‍याला ऊर्जा देत असतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व चारचौघात खुलून दिसतं . ह्यांच्या भोवती कायम चांगल्या माणसांचा गोतावळा असतो. चांगल्या लोकांच्या सानिध्यात एकमेकांचा फायदा होतो. अशा लोकांमुळे घरभर शरदाचं चांदण पसरतं. घर प्रसन्न होतं. घर सुंदर होतं.

आळशी घर रेललीली वाटतात. नुसतं हसा… बघा घर हसतं. आपल्या असण्याला कोंदण स्मितहास्याचं असलं की आपण अधिक खुलून दिसतो. हास्य नसलेलं सौंदर्य म्हणजे गंधावाचून फूल. आनंद हा माणसाचा स्थायीभाव असावा, म्हणजे सर्वच माणसे आनंदकंद झाल्याशिवाय राहणार नाहीत. हास्याची एक गोड लकेर माणसाचा स्वभाव बदलायला भाग पाडते.

तिथे रागाला थारा उरत नाही. राग कुठच्या कुठे पळून जातो. माणूस फक्त माणूस न राहता आनंदाचं भांडार होऊन जातो. फुलांच्या परडीत जसा पिवळाधम्मक सोनचाफा लपून राहत नाही, तशीच प्रसन्नतेने नटलेली ही माणसे चारचौघांत उठूनच दिसतात.

हास्याला जात, पात, धर्म, लिंग, वय मान्य नाही. ते कधीही कोणीही वापरू शकतं आणि दुसर्‍याला आनंदी ठेऊ शकतं. एक रुपयाही खर्च न करता जर आपलं आरोग्य, आपलं व्यक्तिमत्त्व उत्तम राहणार असेल तर का नाही मनापासुन स्मितहास्य करायचं.

आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे!
हे कधी होईल… मस्त हसत जगू तेव्हाच ना !

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
ggawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!