मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
वर्ल्ड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट मिशन आणि कल्याण तालुका जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशन यांचा सामाजिक पत्रकारिता आणि सामाजिक कार्य पुरस्कार दैनिक ‘सम्राट’ चे संपादक बबन कांबळे, दैनिक ‘नवराष्ट्र’चे सहाय्यक संपादक दिवाकर शेजवळ, ‘ मॅक्स महाराष्ट्र’चे ज्येष्ठ पत्रकार किरण सोनावणे यांना घोषित झाला आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी चालवलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाच्या शताब्दी वर्षांची सांगता येत्या रविवारी 31 जानेवारी रोजी होत आहे. त्या निमित्ताने पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. वर्ल्ड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट मिशनचे अध्यक्ष ऍड प्रदीप जगताप यांनी ही माहिती दिलीय.
हा पुरस्कार सोहळा येत्या रविवारी 31 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता मुंबई आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडणार आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभाला गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड, ,ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार विश्वनाथ भोईर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते मानकरींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
सोहळ्याआधी प्रख्यात गायक आनंद शिंदे यांचा ‘ वंदन प्रज्ञा सूर्याला’ हा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. तसेच या सोहळ्यात ‘ भारत लोकधारा टाइम्स’ या दैनिकाच्या वेबसाईटचे आणि विशेष अंकाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.
मूकनायक शताब्दी सांगता सोहळ्याचे उदघाटक बंगळुरूचे डॉ रामप्रसाद मोरे ( एम डी) हे असून कल्याणचे माजी आमदार जगन्नाथ शिंदे हे स्वागताध्यक्ष आहेत.