सतराशे मालमत्तांना दारात वसुलीची हलगी वाजायची भीती ; सोलापूर महापालिकेने सुरू केली जप्तीची कारवाई !

सतराशे मालमत्तांना दारात वसुलीची हलगी वाजायची भीती ; सोलापूर महापालिकेने सुरू केली जप्तीची कारवाई !

सतराशे मालमत्तांना दारात वसुलीची हलगी वाजायची भीती ; सोलापूर महापालिकेने सुरू केली जप्तीची कारवाई !

सोलापूर महानगरपालिकेने शहरातील धनदांडग्यांविरोधात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू केली आहे. तळवळकर जिमसहित दिग्गज अशा सिद्धेश्वर कारखान्यावर झालेल्या जप्तीच्या कारवाईमुळे इतर कर बुडव्या थकबाकीदारांना धडकी भरली आहे. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात पाच लाखांहून अधिक थकबाकी असलेले जवळपास दीड हजार मालमत्ताधारक आहेत. दहा-दहा वर्षांपासूनची या करबुडव्यांची सुमारे ४०० कोटींची थकबाकी आहे. या सगळ्यांचं सध्या धाबं दणाणलं आहे.

महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्यासमोर सध्या महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याचं मोठं आव्हान आहे. गेले वर्षभर कोविड प्रतिबंधक उपाययोजनात गुंतून राहिलेल्या महानगरपालिकेचा आर्थिक कणा मोडला आहे. चालू आर्थिक वर्षातील शेवटचे चार महिने आता उरले असून, महापालिकेचा अर्थसंकल्प समायोजित करण्याचा हा कालावधी असतो. सध्या मालमत्ता कर हाच महानगरपालिकेकडे असलेला उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळेच महानगरपालिकेने कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे.

याबाबत माहिती देताना महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी मीडिया भारत न्यूजला सांगितलं की सद्याच्या कोविड संकट काळात सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीचा आम्हाला अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही लोकांसाठी अभय योजना लागू केली आहे. या योजनेनुसार मालमत्ता करावरील शास्तीची ८० टक्के रक्कम माफ होणार आहे ; परंतु अशा प्रकारची योजना घोषित केल्यानंतरही काही बडे मालमताधारक प्रतिसाद देत नाहीयेत. शिवाय ज्यांनी वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकवला आहे, अशाच करदात्यांना आम्ही लक्ष्य केलं आहे.

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशाने सोलापूर शहरातील मोठ्या थकबाकीदारांविरोधात दवंडी पिटवून जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान सिद्धेश्वर साखर कारखाना व मंगल कार्यालयाने थकबाकीच्या ४० लाख ९५ हजार ८०० रुपयांपैकी ३६ लाख २१ हजार इतकी रक्कम भरली. सोलापूर शहरातील माणिकचौक येथील आर.वन कलेक्शनकडून १३ लाख ३५ हजार ४७५ रुपये थकबाकी आणि सात रस्ता येथील तळवळकर जिम १८ लाख १२ हजार ६५३ रूपये इतकी रक्कम येणे असून त्याचं दुकान व जीम सील करण्यात आल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली व महानगरपालिकेचं कर वसुली पथक कर अधिकारी प्रदीप थडसरे यांच्या पुढाकाराने जेव्हा करवसुलीसाठी शहरात हलगी वाजवत फिरतं, तेव्हा तो सर्वसामान्य नागरिकांचाही चर्चेचा विषय असतो. हा हलगी वादनाचा कार्यक्रम उद्या आपल्या दारात होऊ नये, त्याची भीती नागरिकांना बसली आहे.

होटगी रोडवरील युको बँकेने मात्र मिळकतकराची १७ लाख ४५ हजार ५२३ रुपयांचा धनादेश अदा करून जप्तीची संभाव्य कारवाई टाळली. सोरेगाव येथील प्रकाश पाटील कुबेर चेंबर शॉप नंबर ९ ते २४ यांनी १० लाख ५४ हजार ७२२ रुपयांची थकीत रक्कम भरली .

अभय योजनेच्या माध्यमातून रक्कम भरल्यास जास्ती सूट मिळेल असं आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील थकबाकीदारांना करण्यात आलं होतं. थकबाकीदारांना महापालिकेच्या वतीने यापूर्वीच आवश्यक त्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांची सुनावणी देखील घेण्यात आली होती. सवलत देऊन देखील मालमत्ता कर न भरल्यामुळे थकबाकीदारांच्या विरुद्ध आज १५ कर निरीक्षकांच्या पथकाने जप्तीची कारवाई केली.

या कारवाई दरम्यान ६० लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली.

यावेळी सहाय्यक आयुक्त पुष्पगंध भगत, शहर कर संकलन प्रमुख प्रदीप थडसरे, हद्दवाढ विभाग प्रमुख रुउफ भगवान, चन्नाप्पा म्हेत्रे, व्यंकटेश गुर्रम, चंद्रकांत जरगोनार, मनोज मंजुळकर, किरण दळवी, दीपक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिकेने जप्त केलेल्या मालमत्तांत माजी आमदार रवी पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे अशा दिग्गजांच्या मालमत्ता तसंच संस्था असल्याचं समजतं.

“आम्ही कोणत्याही मालमत्तांवर थेट जप्तीची कारवाई करत नाहीये. आम्ही मालमत्ताधारकांशी संवाद साधतोय आणि त्यांना करभरणा करण्यासाठी विनंती करतो, संधी देतो. पण त्यानंतरही जर हेकटपणा दाखवला तरच जप्तीची कारवाई होते”, असं मालमत्ता कर अधिकारी प्रदीप थडसरे यांनी सांगितलं.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!