किल्ले सोनगिरी : कर्जत तालुक्यातील बोरघाटाच्या पायथ्याशी असलेला किल्ला !

किल्ले सोनगिरी : कर्जत तालुक्यातील बोरघाटाच्या पायथ्याशी असलेला किल्ला !

किल्ले सोनगिरी : कर्जत तालुक्यातील बोरघाटाच्या पायथ्याशी असलेला किल्ला !

महाराष्ट्रात सोनगिरी नावाचे अनेक किल्ले आहेत. आम्ही कर्जत तालुक्यातील सोनगिरी किल्ला पाहण्याचे ठरवले व त्यादृष्टीने नियोजन केले. गड किल्ल्यांचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते व पाहण्यास मिळते ती म्हणजे त्या स्थानाचे महत्त्व ! गड-किल्ले हे साधारण घाटाच्या पायथ्याशी, घाटाच्या माथ्यावर किंवा व्यापारी मार्गांवर बांधलेले आढळतात. कर्जत तालुक्यातील सोनगिरी किल्ला हा बोरघाटाच्या पायथ्याशी आहे. या किल्ल्याला आवळसचा किल्ला देखील संबोधले जाते, टेहळणीसाठी या किल्ल्याचा वापर केला जात असावा.

सोनगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पळसदरी रेल्वे स्थानकावरून समोरच आपणास सोनगिरी किल्ला पाहण्यास मिळतो. पळसदरी स्टेशनपासून रेल्वे मार्गातून चालत गेल्यास येथे एक दिशादर्शक फलक दिसतो. येथून देखील आपण या किल्ल्यावर जाऊ शकता ; परंतु रेल्वे मार्गातून चालणे धोकादायक ठरू शकते.

पळसदरी स्टेशनपासून आपणास किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात जाण्यासाठी खाजगी वाहने उपलब्ध आहेत तसेच कर्जत स्टेशनवरून देखील किल्ल्यावर जाण्यासाठी खाजगी वाहने उपलब्ध आहेत.

खाजगी वाहनाने मोहोली गावात यावे. गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळून जो रस्ता गावात जातो, त्या रस्ता मार्गे किल्ल्यावर जाण्यास सोईस्कर मार्ग आहे, असे स्थानिकांकडून कळाले,

किल्ल्यावर जाताना आम्ही स्थानिक गावातून वाटाड्या सोबत घेतला होता. वाटाड्या घेतल्यामुळे किल्ल्यावर चुकामूक होण्याची शक्यता कमी होते व कमी वेळेत संपूर्ण किल्ला व किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व व आजूबाजूच्या परिसराचे योग्य ती माहिती प्राप्त होते.

सकाळी नऊ वाजता किल्ल्यावर जाण्यास सुरुवात केली. किल्ल्याची प्राथमिक माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आधीच घेतल्यामुळे सोबत जाताना मुबलक प्रमाणात पाणी व खाण्यासाठी खाद्यपदार्थ सोबत ठेवले होते.

सोनगिरी किल्ल्यावर जाताना ठळक पायवाट दिसत होती परंतु सरपणासाठी येणाऱ्या गावकऱ्यामुळे अनेक पायवाटा निर्माण झाल्यामुळे नवीन येणाऱ्या पर्यटकांची व गड प्रेमीची येथे मार्ग चुकण्याची शक्यता असते. वाटेवर जाताना दगडावरती किल्ल्यावर जाण्याच्या खुणा केलेल्या दिसल्या.

किल्ल्यावर जाताना दोन छोटे डोंगर ओलांडावे लागतात. पायवाटेने जाताना डोंगरावरती स्थानिक ग्रामपंचायत व गावकऱ्यांकडून डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणात चर मारलेली दिसतात, त्यामुळे पावसाळ्यात येथे पाणी साठवून पाणी मुरण्यास मदत होते. हे काम खरंच कौतुकास्पद आहे; यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते.

वाटेत जाताना पायवाटेवर मोठ्या प्रमाणात मोठे दगड आढळतात. रचनेवरून येथे काही वास्तू होती किंवा काही अवशेष होते असे जाणवते, परंतु ते नेमके कशाचे याबाबत काही कळू शकले नाही, त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे,

साधारण दीड तासाचा प्रवास केल्यावर आपण कातळकड्यापाशी पोहोचतो. कातळकड्यापाशी आल्यावर दोन वाटा किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी दिसतात. उजव्या वाटेने जाणे थोडे धोकादायक असल्याचे वाटाड्याकडून कळाले. सोयीस्कर मार्ग म्हणून आम्हाला त्याने डाव्या बाजूने नेले.

सदर मार्ग साधारण एक फुटाची वाट असल्यामुळे जाताना सावधगिरी बाळगावी. गवतावर पाय ठेवताना पाय सरकणार नाही ना त्याची योग्य ती काळजी घ्यावी. वाटेत जाताना अनेक काटेरी वृक्ष असल्यामुळे शक्यतो पूर्ण शरीर झाकेल असाच पेहराव असावा. झाडाझुडपातून जाणारी वाट असल्यामुळे उन्हाचा त्रास जास्त जाणवला नाही.

सदर पाच मिनिटाची कातळकड्याच्या पायथ्याशी वाट चालून गेल्यावर पुढे उभी चढण होती. सदर चढण निसरडी असल्यामुळे योग्य ती काळजी घेऊन किल्ल्यावर जाणे गरजेचे आहे. सदर निसरडी वाट चढून वर गेल्यावर किल्ला व त्याच्या बाजूला असणार्‍या डोंगराच्या बेचक्‍यात आपण पोहोचतो. बेचक्यातून डावीकडे वर जाणारी वाट धरून आम्ही किल्ल्यावर पोहोचलो.

बेचक्याजवळ तटबंदीचे काही अवशेष पाहण्यास मिळाले. तटबंदी जवळील पायवाटेने वर गेल्यास आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. येथून पुढे डाव्या हाताने चालत गेल्यास समोर पाण्याचे टाके दिसते. या टाक्यात पाणी असून पाणी स्वच्छ होते. पाण्याचे टाके पाहून पुढे गेल्यास गडावरून बोरघाटाचे सुंदर दृश्य पाहण्यास मिळतील. तसेच गडावरून राजमाची किल्ला, ढाक किल्ला, भिवगड, प्रबळगड हे किल्ले लक्ष वेधून घेतात.

गडाच्या ध्वजस्तंभाजवळून पळसदरी स्टेशन व त्याला लागून असलेले धरण दिसते. या शांत ठिकाणी बसून सदर निसर्गाचे मोहक दृश्य पाहण्याचा जो आनंद मिळतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही.

किल्ल्यावर थोडा वेळ विश्रांती करून पुन्हा आलेल्या मार्गाने परत गेल्यास प्रथम लागलेल्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूनेच एक पायवाट किल्ल्याच्या दुसऱ्या पाण्याच्या टाक्याजवळ जाते. सदर पाण्याचे टाक्यां गडप्रेमींकडून संवर्धन सुरू आहे.

सोनगिरी किल्ल्याचा गडमाथा हा फारच चिंचोळा आहे. त्यावर पाण्याचे दोन टाके व वाड्याचे चौथरे आहेत व तटबंदी सोनगिरी किल्ला पाहण्यासाठी साधारण अर्धा तास पुरेसा आहे.

सोनगिरी किल्ल्यावर सातत्याने होणाऱ्या संवर्धन कार्यामुळे स्थानिक गावापासून ते किल्ल्यापर्यंत कोठेही प्लास्टिक व इतर कचरा आढळला नाही. गड किल्ले हे आपले ऐतिहासिक वारसा आहेत. ते जपणे व त्यांचे नैसर्गिक सौंदर्य टिकवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. गडकिल्ले पाहत असताना आपल्यामुळे तेथील ऐतिहासिक वास्तूंची हानी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच आपण सोबत नेलेल्या खाद्यपदार्थांचे प्लास्टिक आवरण व इतर कचरा आपल्या सोबतच खाली माघारी घेऊन जाणे हे देखील आपले कर्तव्य आहे.

 

 

 

 

दीपक परब

कायद्याने वागा लोकचळवळीचे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र समन्वयक

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!