घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद, देऊ सुर्याजी पिसाळांना साथ !!!

घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद, देऊ सुर्याजी पिसाळांना साथ !!!

घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद, देऊ सुर्याजी पिसाळांना साथ !!!

छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ…अशी घोषणा देत निवडणूक लढवणाऱ्या भाजपाने सत्तेवर आल्यावर छत्रपतींनाच ठेंगा दाखवला. छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची अस्मिता. पण भाजपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य असलेल्या पक्षाच्या एका महापालिका सदस्याला अपात्र होण्यापासून वाचवण्यासाठी थेट त्या अस्मितेशीच तडजोड केली व सत्तास्वार्थापुढे छत्रपती शिवरायबिवराय कुछ नहीं, हेच जणू महाराष्ट्राला दाखवून दिले. गेली दीड वर्ष राज्यातलं शिवसेना-भाजपा सरकार छिंदमच्या अपात्रतेसाठीच्या सुनावणीत टंगळमंगळ करीत आहे. संतापजनक हे की दरम्यानच्या काळात सरकारने छिंदमला दहा कोटींचा विकासनिधी ही दिला. अहमदनगरमधील पद्मशाली समाजाच्या मतांवर डोळा ठेवून महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाने तात्पुरता संताप व्यक्त करण्यापलिकडे छिंदम प्रकरणाचा मागोवा घेतला नाही.

छिंदम याने महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. छिंदम याच्या प्रभागातील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी कर्मचारी पाठविले नाही या कारणावरुन फोनवर विचारणा केली. “शिवजयंती झाल्यानंतर माणसे पाठवितो”, असे बिडवे यांनी सांगितले. बिडवे आणि छिंदम यांच्या संभाषणाची ऑडियो क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली त्याचे पडसाद राज्यभर उमटले. उर्मटपणे बोलताना सत्तेच्या मग्रुरीत तत्कालीन उपमहापौर असलेल्या भाजपा नगरसेवक श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवरायांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शिवराळ भाषा वापरली. इतकी ती ऐकून कोणाही मराठी माणसाची तळपायाची आग मस्तकात जावी. तशी ती गेलीसुध्दा, पण तात्पुरती !!!

भाजपने लोकलाजेस्तव पक्षातून काढल्यानंतर, श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव अहमदनगर महापालिकेत एकमतानं मंजूर करण्यात आला. इतकंच नव्हे, छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला. त्यावेळी सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त करत छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याच्या प्रस्तावाला हात उंचावून पाठिंबा दिला. भाजप गटनेते दत्ता कावरे यांनी मांडलेल्या ठरावाला विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी अनुमोदन दिलं. महासभेचं कामकाज सुरू होताच काही सदस्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यामुळे महासभेत आरोप-प्रत्यारोप झाले होते. संघाने कधीही शिवजयंती साजरी केली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. या आरोपानंतर भाजप सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला, त्यामुळं काही काळ गोंधळ झाला होता.

मात्र, तीन महिन्यांनंतर प्रकरण निवळताच छिंदमचा सूर बदलला. आपण उपमहापौरपदाचा राजीनामाच दिला नसल्याचा दावा करताना शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करून माझी बनावट सही असलेला राजीनामा राजकीय षडयंत्रातून मंजूर केल्याचा आरोप छिंदमने केला. या आरोपानंतर सेनेच्या माजी शहर प्रमुख व महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम यांनी पलटवार करताना, छिंदमचा संबंधित राजीनामा त्याचे राजकीय गुरू खासदार दिलीप गांधी यांनीच महापौर कार्यालयास पाठवला होता, असा दावा केला होता.

२६ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या महासभेत छिंदमचा उपमहापौरपदाचा राजीनामा मंजूर करून महासभेच्या ठरावानुसार मनपा प्रशासनाद्वारे नगरविकास खात्याला छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, त्याला आता दीड वर्ष उलटून गेलंय, पण अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निर्णय घ्यायला वेळ मिळालेला नाही. या प्रस्तावावर छिंदमचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नगरविकास विभागाने त्याला नोटीस पाठवली होती, पण त्या नोटिशीला उत्तर देताना, त्याने आपण राजीनामाच दिला नसल्याचा पवित्रा घेतला.

‘ माझ्याशी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नगरसेवकपद रद्द करणे बेकायदेशीर आहे, माझ्या कोणत्याही संमती वा स्वाक्षरीशिवाय माझ्याविरुद्ध बनावट कागदपत्रांआधारे षडयंत्र रचले गेले आहे, माझी स्वतःची सही असलेला कोणताही उपमहापौरपदाचा राजीनामा मी महापौरांकडे दिलेला नाही, उलट ज्या तारखेचा हा राजीनामा दाखवला जात आहे, त्या तारखेस मी पोलिस व न्यायालयीन कोठडीत असल्याने असा कोणताही राजीनामा मी सही करून देणे शक्य नव्हते, महापौरांनी माझ्या लेडरहेडचा गैरवापर करून माझी बनावट सही असलेला राजीनामा वापरून तसेच माझ्यावर केस चालू असल्याचा गैरफायदा घेऊन व राजकीय षडयंत्र करून उपमहापौरपदाचा राजीनामा तयार करून तो मंजूर करण्याचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला आहे’, असा दावा छिंदमने नगरविकास विभागाला पाठवलेल्या उत्तरात केल्याचं माध्यमात छापून आलं आहे.

छिंदमने नगरविकास विभागाकडे केलेल्या खुलाशात महापौर कदम यांच्यावर षडयंत्राचा आरोप केल्याने त्याला महापौरांचे पती व माजी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘छिंदमचे प्रकरण अंगलट आल्यावर त्याचे राजकीय गुरू दिलीप गांधी यांनीच त्याचा राजीनामा महापौर कार्यालयास पाठवला होता. छिंदमची हकालपट्टी करून व त्याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे खासदार गांधी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते व आता छिंदमच्या भूमिकेबद्दल ते मौन बाळगून आहेत, त्यामुळे उपमहापौरपदाच्या राजीनाम्यावरून खासदार गांधी व छिंदम हे संगनमताने जनतेची व शिवप्रेमींची दिशाभूल करीत आहेत’, असा दावाही संभाजी कदम यांनी या प्रत्युत्तरात केला आहे.

कायद्याने वागा लोकचळवळीने गेलेल्या दीड वर्षात सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केलाय. १९ फेब्रुवारीला संघटनेने नगरविकास विभाग व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. आपली तक्रार पुढील कार्यवाहीसाठी अहमदनगर महापालिकेकडे पाठवले आहे, असे वेळकाढू उत्तर शासनाकडून मिळाले, तर मुख्यमंत्री कार्यालयसुध्दा आपली तक्रार नगरविकास विभागाकडे पाठवलीय, असंच उत्तर देतंय. गेल्या वर्षी ४ मे २०१८ ला असं उत्तर दिल्यावर आता २२ सप्टेंबरला, पुढे काय झालं, असं पुन्हा विचारल्यावर पुन्हा तेच उत्तर आलंय.

दरम्यान, अपात्रता तर होणं दूरच, उलट छिंदमच्या दाव्यानुसार, भाजपचे खासदार दिलीप गांधींच्या सहकार्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन शहर विकासाच्या योजनांसाठी १० कोटींच्या निधीला सरकारने मंजूरी दिली. १० कोटींच्या निधीसाठी माझा पाठपुरावा सुरू असताना तो हाणून पाडण्याचे प्रयत्न झाले. पण आता निधी मंजूर झाल्याने त्यांच्या नाकावर टिच्चून शहरात विकासकामे होणार आहेत, आतापर्यंतचे उपमहापौर रबरी शिक्के ठरले, पण माझी कारकीर्द विकासकामांचा ठसा उमटवणारी ठरली, असा दावाही छिंदम याने त्यावेळी केला होता. तेव्हाच, मुख्यमंत्री फडणवीस छिंदमची अपात्रता करणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं.

सदर प्रकरणात अक्षम्य टंगळमंगळ झाल्यावर, तब्बल दीड वर्षांनंतर, राज्यमंत्र्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. गेल्या सुनावणीला छिंदमने मुदतवाढीची मागणी केली होती. त्यावर २२ ऑगस्टला पुन्हा सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी, महासभेने ठेवलेले आरोप छिंदमने फेटाळून लावले आहेत. हे प्रकरण न्यायालयात असून, त्यावर निर्णय झालेला नसल्याचं त्याने सांगितलं.

छिंदमच्या गेल्या कार्यकाळात महासभेने अपात्र ठरवण्याचा ठराव घेतला होता. मात्र, राज्यातील शिवसेनेने या अपात्रतेबाबत सरकारवर दबाव आणण्यात उदासीनता दाखवल्याचं दिसून आलं आहे. वेळीच अपात्रता न करून, सरकारने छिंदमला पुन्हा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम अहमदनगरमधील प्रभाग क्रमांक नऊमधून तब्बल १९७० मतांनी निवडून आला.

छिंदम ज्या प्रभाग ९ मधून निवडणूक लढले, तिथं ११ हजार २२९ मतं आहेत. त्यात पद्मशाली समाजाची २५०० मतं आहेत.” छिंदम यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. गुंडगिरी करणारं तरुणांचं टोळकं कायम त्यांच्यासोबत असायचं. पण जेव्हा छिंदम यांनी महाराजांबद्दल अपशब्द काढले, महाराष्ट्रभर मोर्चे आणि आंदोलनं झाली. तेव्हा लोकांनी छिंदम यांच्यासोबतच त्यांच्या साथीदारांच्या घरावरही दगडफेक केली.  छिंदम यांच्यासोबत त्यांच्या साथीदारांनाही नगर सोडावं लागलं. त्यामुळे हा समाज असुरक्षित झाला. छिंदम यांनी पद्मशाली समाजाच्या मनात इतरांबद्दल भीती निर्माण करून त्याचा फायदा घेतला. भाजपच्या प्रदीप परदेशींना २५६१ मतं मिळाली. शिवसेनेच्या सुरेश तिवारींना १६१३ मतं, मनसेच्या पोपट पाथरे यांना १४२५, तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या अनिता राठोड यांना फक्त ७१५ मतं मिळाली. तर श्रीपाद छिंदम यांना ४५३२ मतं मिळाली. म्हणजे छिंदम यांना पद्मशाली समाजासह इतर समाजातील मतदारांनीही मतदान केल्याचं स्पष्ट आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर जिंकून आलेल्या छिंदमला उपमहापौर करण्यात आलं होतं. मात्र शिवरायांविषयी वाह्यात बरळल्यानंतर त्याच्याविरोधात सर्वसामान्यांपासून सर्वच राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवल्यानंतर भाजपा छिंदमपासून सुरक्षित अंतर राखून असलं तरी छत्रपती शिवरायांना गलिच्छ शिवीगाळ केल्यानंतरही एखादी व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात निर्धास्तपणे उजळ माथ्याने वावरू शकते, यांचा वस्तुपाठच शिवसेना-भाजपा सरकारने घालून दिलाय. छत्रपतींचा आशीर्वाद म्हणत सत्ता मागायची आणि सत्ता मिळाली की छत्रपतींना शिवीगाळ करणाऱ्यांना सरकारचा आशीर्वाद द्यायचा, या शिवसेना-भाजपाई धोरणाकडे महाराष्ट्रातली जनता गांभिर्याने बघते की जसं छिंदमलाच निवडून दिलं तसंच सरकारलाही पाठबळ देते, ते येणाऱ्या विधानसभेत दिसून येणार आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!