आपल्या मातीची अनामिक ओढ निदान आपल्या ४०+ पिढीला तरी नक्कीच आहे. काळ्याशार मातीचे तयार केलेले वावर पाहिले. जणू ते इवल्याशा कांद्याच्या रोपांची लावणी होण्याची वाट पहात सज्ज झाले होते.
सध्या कांद्याचे भाव कधी नव्हे ते १५० च्या पुढे गेले. खूप छान वाटले. कमीत कमी ५० रु कायमचा भाव असायला हवा, तरच शेतकऱ्यांना समाधान मिळेल व त्यांच्या कष्टाचं चीज होईल.

एका बाजूला ऊस लावलाय. एका शेतात गहू. त्याच शेतात मागच्या वर्षी केळी डौलात उभ्या होत्या. ही हिरवी समृद्धी पाहिली कि मन काठोकाठ भरत समाधानाने, अगदी पावसाळ्यात काठोकाठ भरलेल्या विहिरीसारखं. सगळं कसं हिरवगार.
हे दृश्य पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. हा हिरवा समुद्र स्वतः च्या मालकीचा असण्यात जी शान आहे, ती दुसरी कशातच नाही. प्रत्येकाच्याच नशिबी ती नसते. खडतर कष्टाने मिळालेली ती सुखाची हिरवळ आहे; म्हणूनच तर म्हणतात "वावर हाय तर पावर हाय" !

हाच आपला हिरवा समुद्र जेव्हा भरभरुन कणसातील सोनेरी मोती उधळतो ना, तेव्हा कळतं शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात. या मोत्याच्या घासापुढे दुनियेची सारी संपत्ती फिकी पडते; म्हणून आपण शेतकरी असण्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो.
रोजच्या घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या जीवनातून थोडीशी उसंत घेऊन गावी जायचे व शेतातला हा प्राणवायू व श्रीमंती मनात भरुन , आनंद घेऊन यायचं. पुढे कित्येक दिवस तो पुरतो. लई भारी वाटतं...!!!

लीना तांबे
लेखिका शिक्षिका आहेत.
leena.adhalrao.tambe@gmail.com