लोक आत्महत्या का करतात?

लोक आत्महत्या का करतात?

लोक आत्महत्या का करतात?

१० सप्टेंबर हा आत्महत्या प्रतिबंध दिवस !! जगात दर ४० सेकंदाला एक व्यक्ति आत्महत्या करते. युवा पिढीत १५ ते २९ वर्ष वयोगटात  मृत्यूचं रस्ते अपघातानंतरचं दुसरं कारण आत्महत्या आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या २५ पट प्रमाण महिलांच्या आत्महत्येचं आहे. का करतात लोक आत्महत्या? मृत्यूपासून दूर पळणारा माणूस मृत्यूला कवटाळायला का तयार होतो? काय असतात आत्महत्येमागची कारणं? आत्महत्या करणाऱ्यांना मनाने कमजोर म्हणावं की कठोर? हे जाणून घेतलंय समाजमाध्यमात वावरणाऱ्या विविध वयोगटातील नेटकर्यांकडून.

उल्हासनगरातराहणारे नितीन महाजन ग्राफिक डिझायनर आहेत. ते म्हणतात, आता १५ ते २५ वर्षांमधील वयोगटांत आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यातल्या त्यात महिलाना मिळणाऱ्या दुय्यम स्थान, हुंडा बळी, मुलगीच कशी झाली, मुलगाच झाला पाहिजे, हा अट्टहासही चिंतेची बाब आहे. तरुण वयोगटात अभ्यासाचा ताण, व्यसनाच्या आहारी जाणे, प्रेमभंग, कामात-परीक्षेत अपयश ही प्रमुख कारणे आहेत.  proper counselling  न झाल्यामुळे आणि कुणी मार्गदर्शक न मिळाल्यामुळे व्यक्ती टोकाची भूमिका घेतो. आत्महत्या हा शेवटचा उपाय नाही हे खूप व्यक्तींना समजत नाही.. काही ना काही मार्ग काढू शकतो, पण ती विचार करण्याची क्षमता व्यक्ती गमावून बसतो. काही वेळेला आपल्या मनासारखे होत नाही किवा समोरच्या व्यक्तीला खूप घाबरून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. आत्महत्या करण्याचा निर्णय हा दर वेळी चुकीचाच असतो असं माझ मत आहे.

अरुण खंडागळे यांच्या मते, सध्याच्या काळातील युवक फार जलद गतीने निर्णय घेतो. मूर्ती कलाकार रुपेश इंदुलकर म्हणतात, सद्या एकत्र कुटुंब पद्धत नाही राहीली…त्यामुळे थोरामोठ्यांचा सहवास नाही…संस्कार नाही….कुटुंबात एकमेकात सुसंवाद नाही…..घरातल्या घरात आता खोल्या झाल्या…संवादाच्या अभावामूळे आत्महत्येचं प्रमाण वाढलयं..संवाद होणं गरजेचं आहे.

बचत गट चळवळीतील अग्रणी सामाजिक कार्यकर्ता जयश्री देशमुख म्हणतात, समाजात आपली बदनामी होईल याची मोठी भीती महिलांच्या मनामध्ये असते. याची कारणे वेगवेगळी असु शकतात अनैतिक संबंध उघड होणे, चोरी पकडली जाणे, कठीण प्रसंग वेळेवर पैशाची व्यवस्था न होणे, बहुतेक वेळा नातेवाईकांकडुन होणारा जाच शारीरिक छळ यातून होणाऱ्या वेदना इत्यादी गोष्टी आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत असतात.

कवी योगिनी राऊळ यांचं मत आहे की, आत्महत्येची तीन प्रकारची कारणं असतात – सामाजिक, मानसिक/भावनिक आणि वैयक्तिक. ही तीनही कारणं जेव्हा एकमेकांत विचित्रपणे गुंततात आणि नक्की कोणत्या कारणाला काय उपाय करायचा याचा गुंता सोडवता न आल्यास माणूस आत्महत्या करतो.

महिलांच्या आत्महत्यांची कारणं बरीचशी सर्वमान्य असली तरी आत्महत्या न करता जिद्दीने आयुष्याला टक्कर देणाऱ्या बायकांची जगण्याची कारणंही तपासायला हवीत. (ती सर्वांचीच तपासायला हवीत.)

समाज काय म्हणेल, आतापर्यंतची जपलेली, वाढलेली प्रतिमा धुळीला मिळेल, बाहेरच्या जगातली पत (आर्थिक, सामाजिक दोन्ही) क्षणार्धात नाहीशी होईल, खरोखरीच जगणं अशक्य होईल, ही सामाजिक कारणं.

आपल्याइतकी संकटं कोणावरच आलेली नाहीत, इतकी छी:थू कोणाचीच झालेली नाही, कोणीच आपल्याला समजून घेऊ शकत नाही,  ही भावनिक कारणं.

आणि माझ्याकडून मी सगळे प्रयत्न केले पण आता अडचणीतून मार्ग निघत नाही, आधाराला कोणीच शिल्लक नाही, हे purely वैयक्तिक कारण. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बऱ्याचदा या स्वरूपाच्या आहेत, जरी त्याच्या मागे खूप मोठा आर्थिक, राजकीय, सामाजिक canvas असला तरी.

माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा म्हटला तर मानसोपचार, समुपदेशन यांच्या साहाय्याने तुम्ही काही एका मर्यादेपर्यंतच आत्महत्या रोखू शकता. त्यापलीकडे जर ज्या क्षणी तो मेंदूचा क्षणभरच fuse उडतो, त्याक्षणी कोणी सावरणारं नसेल तर आत्महत्या घडतेच. कितीही मोठा मानसोपचार तद्न्य वा जवळची माणसं सदासर्वकाळ चोवीस तास तुमच्या आजूबाजूला राहू शकत नाहीत. आत्महत्या करण्याआधी त्या माणसाने त्या घटनेची बऱ्यापैकी मेंदूत आखणी केलेली असते. अनेकवार त्याचा सराव केलेला असतो. तसं जेव्हा नसतं तेव्हा त्याला आपण आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न म्हणतो. त्यामुळे असे दिन वगैरे साजरे करून आत्महत्या या प्रकाराला कितपत आळा बसेल, हा मोठाच प्रश्न आहे.

शहरातल्या मध्यमवयीन पुरूषांच्या वा विद्यार्थ्यांच्या ज्या आत्महत्या दिसतात, त्याचं ‘नकार/अपयश पचवता न येण’ हे प्रमुख कारण आहे. विशेषत: घरात लाडावलेल्या मुलांना बाहेरचे नकार पचवता येत नाहीत, मग ते अभ्यासातले असोत, नोकरीधंद्यातले असोत वा बायको-मुलांकडून आलेले.

या बाबतीत मला आणखी एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो की आत्महत्या होऊ नयेत यासाठी प्रयत्न ठीक आहेत, पण झालीच तर घरच्यांनी त्याला कसं तोंड द्यायचं, यावरही काम व्हावं. जसं बलात्कारपीडितेसाठी समुपदेशन असतं, तसं तिच्या घरच्यांसाठीही असावं, तसंच आहे हे. कारण शेतकरी आणि विद्यार्थी सोडले तर बाकी सगळ्या आत्महत्यांमध्ये त्या व्यक्तीचं वा त्याच्या जोडीदाराचं चारित्र्य हा प्रचंड चर्चेचा विषय असतो, कधी उघड तर कधी दबक्या आवाजात, पण चारित्र्याची चर्चा होतेच. अशा वेळेस मागे राहिलेल्यांची कसोटी असते. तर त्यासाठीही समुपदेशन हवं, असं मला वाटतं.

ठाण्यातील विद्याधर पोखरकर यांचं म्हणणं आहे की, मनाविरुद्ध सारं घडत असलं की माणूस निराश होतो. निराशा वाढत गेली आणि त्यातून मार्ग काढणं अशक्य वाटू लागलं की शेवटी माणूस आत्महत्या करतो. मनाने कमजोर असणारी व्यक्तीच हा मार्ग अधिक अनुसरते असे आपण ढोबळमानाने म्हणू शकतो!

समाजाकडून सतत विचारल जाणारे प्रश्न…आणि कुटुंबाकडून असलेल्या अपेक्षा….आत्महत्येला कारणीभूत ठरतात, असं मालेगावचे भूषण पवार यांना वाटतं. मालेगावचेच राहुल शिंदेंचं मत आहे की, आत्महत्यामागील असंख्य कारण आहेत किंवा असू शकतात. जेवढ्या व्यक्ती तेवढे कारण पण मला सर्वाधिक कारण वाटत ते म्हणजे मानसिक ताण, मग तो कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो.

नांदेडचे अमोल गुजर म्हणतात, मरणे सोप्पे आहे, जगणे कठीण आहे हेज्याला वाटते, तोच आत्महत्या करतो !!!

कवी सुदेश मालवणकर आत्महत्येचा विषय वेगळ्या पध्दतीने मांडतात. ते म्हणतात, मी पत्रकारीता करीत असताना एकदा एकाच दिवशी तीन आत्महत्या झाल्या होत्या. एक पोलीस शिपाई, एक गृहिणी तर एक महाविद्यालयीन विद्यार्थी.त्यावर फक्त बातमी म्हणून न पाहता मी त्या घटनेच्या मूळाकडे जायचे ठरवले. मृतांच्या कुटूंबीयां कडून घेतलेला आढावा,परिसरातील व संबधीत लोकांकडील माहीती घेतल्यानंतर काही मानोविकार तज्ज्ञांशी सखोल चर्चा केल्यावर असा निष्कर्षआला होता:

१)ज्यांच्याशी संवाद करावा असे सुह्रद नसणे(खरा मित्र)

२) सगळे उपाय संपलेत आता काहीच होऊ शकत नाही ही भावना

३) सामाजिक भीती (लोकं काय म्हणतील?)

४)प्रचंड न्युनगंड

५)आता जगून काहीच फायदा नाही असा निष्कर्ष

इत्यादी…पण सर्वात महत्वाचे कारण म्हणजे संवादाची उणीव.

मुंबईतील साठ्ये महाविद्यालयाची कला शाखेची विद्यार्थिनी मीनाक्षी शिंदे आपलं मत सविस्तरपणे मांडते. ती म्हणते, जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलते, माझ्या मते त्यासाठी तिच्या ‘जवळचे‘ लोक जास्त जबाबदार असतात. एखाद्या व्यक्तीला असे विचार करण्यापासून रोखणं आपल्या आवाक्यात नसेलही पण ते विचार वळविण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. आणि अशा काहीशा विचारात असणाऱ्या व्यक्तीसोबत वागताना केलेली एखादी लहानातली लहान गोष्ट (विशेषतः त्या व्यक्तीच्या ‘जवळच्यांची’) तिला तिचे विचार कृतीत उतरवण्यास प्रवृत्त करू शकते. त्यामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी यांचं दुर्लक्ष किंवा चुकीची वागणूक आत्महत्येस कारणीभूत ठरते, असं मला वाटतं. सतत आपली कोणालाही गरजच नाहीये, आपलं अस्तित्व असून नसल्यासारखंच आहे असं वाटल्यामुळे देखील असं पाऊल उचललं जाऊ शकतं. आयुष्यात पावलोपावली उद्भवणाऱ्या समस्यांच आत्महत्या केल्याने सहज निराकरण होईल, असं त्या व्यक्तीला वाटत असतं.

तरुणांच्या बाबतीत हे प्रमाण वाढण्याचं कारण थोडं फार खरचं सोशल मीडिया असावं, असं मला वाटतंय. तिथे सतत आपण स्वतःची इतरांशी तुलना करत राहतो आणि त्यातून ही नकारात्मक भावना निर्माण होते. एकलकोंडेपणा निर्माण होतो. काही पोस्ट्स, मिम्सचं नीट निरीक्षण केलं की त्यातून आपण कसं स्वयंपूर्ण आहोत, आपल्याला कोणाचीही गरज नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर दुसरीकडे काही तरुण रिलेशनशिपमध्ये स्वतःला खूपच जास्त गुंतवून घेतात आणि एखाद्या व्यक्तीला आपलं सर्वस्व समजू लागतात आणि जेव्हा अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात राहत नाही, काही कारणांमुळे सोडून जाते तेव्हा आपल्या जगण्याला काही अर्थ नाही असं वाटू लागतं. आणि आत्महत्येचा विचार मनात डोकावू लागतो. तसेच, कुटुंबियांच्या अवाजव अपेक्षाही तरुणांमधील वाढत्या आत्महत्येस कारणीभूत असू शकतात.

स्त्रियांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त असण्याचं वेगळं कारण सांगायची गरज नाही. त्याचं मूळ आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतचं आहे. मुलगी म्हणून जन्म घेतला हीच चूक झाली, अशी जाणीव सतत करून दिली जाते. ना तिला तिचं मन मोकळं करायला वाव असतो आणि ना तिच्या दररोजच्या मरण्याला काही किंमत आणि असं रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असं वाटणं साहजिकच आहे. मुळात, स्त्रीचं आयुष्य हे इतरांसाठीच आहे, हे चांगलं तिच्या मनावर बिंबवलेलं असतं. त्यामुळे स्वतःवर प्रेम करणं, हेच तिला माहित नसतं. स्त्रियांवरील अत्याचार आणि त्याहीपेक्षा त्यात तिलाच दोषी धरून हीन वागणूक देण्याची समाजाची रीत, हेही एक महत्वाचं कारण आहे

कवी वृषाली विनायक विचारतात,

आत्महत्येत संपतं ते काय !

तसं बोलायचं फार असतं, बरंच सांगायचं असतं पण सांगायचं कुणाला? मनात भयंकर गलबल.

काळजावर प्रचंड वजनाचं दडपण. आपल्यासोबत नेमकं होतंय काय हेच कळत नाही. सोबत सगळे असतात तरी एकटं वाटू लागतं.

सोबत कुणीच नाही म्हणून वाट्याला आलेल्या एकटेपणाचं शल्य बोचत राहतं. कुटुंब, नातलग, मित्रपरिवार आसपास वावरत असतात. पण सगळेच हळूहळू अनोळखी वाटू लागतात. आपलं कुणीच नाही किंबहुना कधी नव्हतंच ही वेदना पिच्छा पुरवत असते. सर्वबाजूंनी आपण एकटे आहोत. खोल खोल डोहात ढकलले जातोय ; जिथून बाहेरचा मार्गच दिसत नाही. भोवती फक्त अंधार. डोळ्यांच्या खाचाखाचांत जाणवतो तो फक्त भयानक गूढ  काळोख. ऊरफुटेस्तोवर आक्रोश पण आतल्या आत. स्वतःलाही ऐकू येत नाही.  एकाएकी सगळं अस्तित्वच म्युट होतं. काय घडतं ते कळत नाही. कळत असलं तरी सांगता येत नाही. दूरचे चेष्टेत घेतील. जवळचे दुखावले जातील. यामुळे कित्येकदा ओठांवर काही येतच नाही. आलंच तरी आकारत नाही. आपण डिप्रेशनमध्ये आहोत हेही मन मान्य करत नाही.

‘हर फीक्र को धुएँ में’ उडवायचं पण मग नेमकं करायचं काय; हेच उमगत नाही. दिवसेंदिवस फक्त साचत जातं. सगळं साचत जातं. कॅथर्सिस कुठेच नाही. तरी वावर हसण्याचा..आजवरच्या हसमुख, कणखर प्रतिमेला जपण्याचा. आत सबंध पोखरलेलं. खूपदा आतली तडफड सांगायचा प्रयत्न होतो. पण संबंधितांकडून पदरी येतं दुर्लक्षितपण. कारणं ज्याची त्याची!!! ही घुसमट कुणालाच समजत नाही. समजत असली तरी संवाद घडत नाही. अखेर शरीर आणि बुद्धी एकाच प्रतलावर येतात. दोघांच्या ओठांत वारंवार घोळत राहतो ‘नकार’… जगण्याच्या फरफटीला… बुद्धी विवेकाची सगळी दारं एका क्षणात बंद करून घेते न् शरीर लोटून देतं स्वतःला काळ्याकुट्ट अज्ञात प्रदेशात… सगळं आधीच शांत झालेलं असतं, मग आत्महत्येत संपतं ते काय??? ‘ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड’ असं सिनेमात बघणं वेगळं अन् वास्तवात अनुभवणं. जरा डोळे उघडे ठेवून भोवताली पाहिलं तर मरण फारच स्वस्त दिसतं. अलिकडे आत्महत्येच्या घटना सतत वाचनात येतायत. ज्या वेगात बातम्या वाचल्या जातात त्याहून अधिक वेगात त्या नजरेआड होतात. चालत्या बोलत्या माणसांसारख्याच!

MediaBharatNews

Related Posts
comments
  • दुर्लक्षित असा विषय घेतल्याबद्दल खरं तर राज असरोडकर यांचे आभारच मानले पाहिजे. योगिनी राऊळ, वृषाली विनायक, सुदेश मालवणकर यांच्या प्रतिक्रिया खूप भावल्या. सुंदर, परखड लिहिलंय त्यांनी. अमोल पवार यांनी दोन ओळीत मोजक्या शब्दात आपले म्हणणे छान मांडले.

  • leave a comment

    Create Account    Log In Your Account    Don`t copy text!