आत्महत्या : सुनावणीशिवायच निकाल !!!

आत्महत्या : सुनावणीशिवायच निकाल !!!

आत्महत्या : सुनावणीशिवायच निकाल !!!

आता इतक्यातच घडलेली विकास केदारे यांची घटना, मन सुन्न करणारी आहे. मुख्य कारण काय तर, विकासवर आरोपी असण्याचा फक्त संशय ! विकासने स्वतःला तर संपवलच पण आपल्या कोवळ्या मुलीलाही सोबत नेलं, का?

का अशी वेळ यावी विकासवर? तो तर आत्महत्या करणं चुकीचं मानत होता, असं त्यांनी स्वतः चिठ्ठीत कबूल केलंय. तरीसुद्धा त्याने हे पाऊल का उचलावं. केवळ अशक्य वाटतं, पण ते सत्य आहे. इतका विचारांनी परिपक्व मनुष्य सुद्धा असं करू शकतो, यावर लवकर विश्वास बसत नाही.

इथे नेमकं चुकलं कुणाचं? केवळ संशयित आरोपी असलेला विकास की त्याला आरोपी ठरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी सारी समाजव्यवस्था. समजून सांगणारे, सल्ले देणारे पुष्कळ असतात. पण समजून घेणारे खूप कमी. विकास त्याचाच बळी ठरला का?

आरोपी ठरण्याआधीच त्याला जे समाजाकडून, न्याय व्यवस्थेकडून, मीडियाकडून आरोपी समजलं गेलं. अनेक प्रकारे त्याचा मानसिक छळवाद केला गेला. दिवस-रात्र ज्या शब्द टोचण्या त्याला टाचणीसारख्या टोचत राहिल्या, त्याने तो घायाळ झाला आणि त्यातच त्याने स्वतःचाच घात करुन घेतला.

न्याय मिळाला? छे, मुळीच नाही. उलट आणखीन दोन नाहक बळी गेले एक विकास आणि दुसरी त्याची लहान मुलगी.

जेव्हा आपल्याला‌ इतरांकडून होणारा त्रास सहन करण्यापलीकडे जातो तेंव्हाच अशा मन हेलावून टाकणा-या घटना घडतात. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा ओलांडली की, माणूस नको ते करण्याचे धाडस करतो. त्याचा उद्रेक होतो. एक तर तो समोरच्याचा बळी घेण्याचा प्रयत्न करतो किंवा ते शक्य नसेल तर स्वतःलाच संपविण्याचा विचार करतो.

का आपली न्यायव्यवस्था अशी आहे? इथे न्याय मिळण्याआधीच स्वतःला संपवून टाकण्याच्या विचाराप्रत लोक येतात? का आपण समोरच्याला समजून घेऊ शकत नाही? इतक्या हलक्या कानांचे आपण का होतो? जेव्हा एखाद्या निष्पाप जीवावर आरोप केले जातात, त्याची पुरेशी पार्श्वभूमी ज्ञात नसतानाही इतरांसोबत आपणही त्याला डिवचण्याचा प्रयत्न करतो.

अशावेळी संशयित व्यक्ती हतबल होते. उपाय होत नाही म्हणून स्वतःला अपाय करू पाहते. संपवते स्वत:लाच कायमचं.

नवल हे आहे की, आपण चुकीचे नाही हे सिद्ध करण्यासाठी मरावं लागतं. कारण रोजच त्याला समाज तीळ तीळ मरणयातना देत असतो. कोणी साथ देणारं नाही, कोणी सोबत नाही या विचाराने माणूस एकटा पडत जातो.

कुठे तरी हे चित्र बदललं पाहिजे. आरोप सिद्ध होण्याआधीच त्याच्यावर शब्दांचे धारदार शस्त्र चालवले जातात ते थांबायला हवेत. त्यांनी असं का केलं? त्याच्या मागचं नेमकं कारण काय? याचा थोडातरी विचार करून मगच त्याचा न्यायनिवाडा केला पाहिजे.

दुसऱ्यांच्या बाबतीत का नाही होऊ शकत वकील? का प्रत्येक वेळेस न्यायाधिश व्हावं? न्यायव्यवस्थेने न्याय देण्याआधीच न्यूजवाले म्हणा किंवा समाज म्हणा त्याला दोषी ठरवून मोकळे होतो. नको नको त्या त्याच्यावरच्या बातम्या इतक्या रंगवून सांगितल्या जातात की, सर्वांना तो खरोखरीचाच आरोपी वाटू लागतो.

इतकं अपमानास्पद जिणं नको वाटतं ना, म्हणूनच अनेक आत्महत्या होतात. मला इतका त्रास झाला, मग मी गेल्यावर माझ्या मुलीचं काय? समाज करेल तिला आपलसं? ह्याच विचाराने त्याने तिलाही सोबत घेतल़ं आणि आत्महत्या केली.

यात न्याय कोणाला मिळाला? विकास, विकासची बायको, विकासची मुलगी, की आरोपी ठरवणारी सर्व यंत्रणा? प्रश्न आहे... पण उत्तर कोणाकडेच नाही.

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!