जगात चहा प्रेमींची काही कमी नाही. इतक्या विविध पद्धतीनी चहासुद्धा बनवला जातो की आपल्याला त्याच्या सर्वच जाती माहीत असतील असंही मुळीच नाही. चहाइतकी माऊथ पब्लिसिटी अन्य कोणत्याही गोष्टीची झालेली नसेल..
चहाच्यासुद्धा खूप वेगवेगळ्या चवी आहेत. प्रत्येक व्यक्तिची स्वतंत्र अशी स्वतःचीच एक विशिष्ट प्रकारची चहाची चव आहे. कोणाला गोड, फिका, आलं घातलेला, चहा मसाला घातलेला, कोरा चहा, दूध कमी - जास्त घातलेला, आयुर्वेदिक चहा, लिंबू रस घातलेला चहा एक ना अनेक प्रकार.

काहींना चहा हवाच असतो. चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवाच,असंही म्हटलं जातं. काहींना सारखाच चहा लागतो तर काहींना दोनदा किंवा एकदा लागतो ; पण तो लागतोच.
पै पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी तर चहाला खूपच महत्व. कुणीही घरी आले तरी चहा विचारलाच जातो. इतका महत्वाचा चहा. नंतर पाहुण्यांचं महत्व आणि वेळ पाहून जेवणाचे विचारले जाते.

इतके कंजूष आहेत, की साधा चहा सुद्धा विचारत नाहीत. काय जायचं त्यांच्या घरी? असंसुद्धा काहींना बोललं जातं. त्यावरुन घराची पारख केली जाते. त्यांना किती माणुसकी आहे ते यावरुन ठरवलं जातं.
सानेगुरुजी चहा घेत नसत पण ते म्हणत की कोणी खूप प्रेमाने आग्रह केला तर मात्र टाळायचं नाही. थोडा का होईना चहा घ्यावा. देणार्याने आपल्या प्रति केलेला आदर, व्यक्त केलेले प्रेम उगीचच का डावलावे ?

अगदी साध्या साध्या गल्लीबोळातसुद्धा चहाच्या टपऱ्या दिसतात. विशेष म्हणजे त्या छान चालतातसुद्धा. बरीच कमाई करून देतात त्या. पंचतारांकित हॉटेलमध्येही चहा मिळतो आणि टपरीवर पण. चहा कुठे घ्यायचा ही ज्याची त्याची मर्जी.
काहीना दुसर्यांच्या हातचा चहा आवडतो तर काहीना स्वतःच्या हातचा. चहाला नावं ठेवून ठेवून काहीजण घेतात तर काही बिचारे मुकाट्याने घेतात. काही कपात घेतात, काही पेल्यात घेतात तर काहीना छोट्या ग्लासात लागतो. वयस्कर मंडळी तर पितळीमधून चहा घेणं पसंत करतात.
काही हुशार असतात. आम्ही घेतच नाही बाबा चहा. मला आवडतच नाही. मला डायबेटिस आहे. अशी काहीतरी कारणे सांगून चहा टाळतात. खरं तर त्यांना इतरांच्या हातचा चहा प्यायला आवडत नसतो. काहीजण तर चक्क सांगतात माझ्या हातचा चहा तू एकदा पिऊन तर बघ. असं म्हणूनही चहा घेण्याचा आग्रह केला जातो.
मस्त पावसाळी वातावरणात लाँग ड्राईव्हवर गेलो असता तिथे मस्त धुंद, रिमझिम पावसात रस्त्यावरील हातगाडीवरील घेतलेला वाफाळलेला चहा मनाला ओढ लावल्याशिवाय राहत नाही.

टपरीवरील नावाच्या पाट्या जर वाचल्या तर खरोखरीच कधीच चहा न घेणारा माणूस सुद्धा म्हणेल की एकदा तरी चव चाखायला काय हरकत आहे ! प्रेमाचा चहा, गुळाचा चहा, येवले चहा, पंढरपुरी चहा, काठियावाडी चहा, सोलापुरी चहा, आईचा चहा इत्यादी इत्यादी...ही नावं वाचूनच माणूस चहाच्या प्रेमात पडतो.
हॉटेलमध्ये गेल्यावर दोन कटींग, स्पेशल, मलाई मारके, पाणी कम दूध ज्यादा अशा निरनिराळ्या पद्धतीने ऑर्डर करून चहा मागवला जातो. नुसत्या गप्पा मारायच्या म्हटल्यावर आठवतो तो हॉटेलमधला चहा. एखाद्या बरोबर डेटिंग करतानाही आठवतो तो तिथलाच चहा.

दिवसाची सुंदर सुरुवात करून देतो तो चहा. यू ट्यूबवर तर चहाचा व्हिडीयो एडिटींग करून मनमोहक गाणी त्यावर टाकली जातात. "हम तो दिवाने हुये यार", "हम तुम्हे चाहते हे ऐसे," "आपकी नजरो मे कुछ मेहेके हुये से," "हम तो तेरे आशिक हे "असे व्हिडीयो पाहून तर सकाळची छान सुरुवात होते आणि मस्त मजेत दिवस जातो.
मग सांगा बरं कधी घेऊया दोन कटींग की स्पेशल?
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com