तेच दाखले तीच उदाहरणे... माणसं फक्त वेगळी. त्यामुळे अशी प्रवचने म्हणजे फक्त आवृत्त्या वाटतात. त्या दिवशीच्या प्रवचनातील एका वाक्याने मात्र भन्नकण डोळे उघडले. ज्याला जाणीव आहे तो खरा सुज्ञ हेच ते वि. स खांडेकराचे सुबोध वाक्य.
बरोबरच आहे ज्याला खरोखरीच प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. तोच खरा स्वतः जबाबदारीने वागणारा आहे. ज्याला आईवडिलांच्या कष्टाची जाणीव आहे, तो कधीच वाह्यात जाणार नाही. ज्याला बहिणीच्या प्रेमाची, अब्रूची जाणीव आहे तो कधीच कोणत्याच स्त्रीला कमी लेखणार नाही. तिचा सन्मानच करील.

जो आपला हितचिंतक आहे त्याचे हित चिंतणे ही खरी जाणीव. अशा व्यक्ती सुज्ञ असतात. पुस्तके वाचली आणि खूप शिकलो तरी आपण सुज्ञ असूच असे नाही. काळ्या मातीची सेवा करताना, या मातीने आपले पोट भरले ही कृतज्ञतेची जाणीव ज्या शेतकऱ्याला असते तो खरा सुज्ञ. मग उन वारा पावसाची त्याला तमा नाही.
अन्याय आणि नंतर मिळाला तर न्याय हे प्रश्न आता फार धगधगते आहेत. कृतघ्न माणसं वाढत राहीली की जाणीव कमी होत जाते. हे अन्याय फक्त मुलींवरच होतात असं मुळीच नाही. मुलांवरही अन्याय होतात.

बहिणीला भावाची जाणीव असेल तर इतर पुरुषांबाबतही ती खोटारडे आरोप करणार नाही. त्यादिवशीच लोकमतला एक बातमी वाचली. व्हॉट्स अपच्या माध्यमातून एका मुलीनेच मुलाला ब्लॅकमेल केले. त्याला ते असह्य झाले आणि म्हणून त्याने आत्महत्या केली.
कोणत्याही परिस्थितीची जाणीव असणं म्हणजे त्या प्रसंगाशी जुळवून घेता येणं. नवर्याला बायकोची आणि बायकोला नवर्याच्या प्रेमाची जाणीव असेल तर निश्चितच संसार सुखाचा चालेल. एकमेकांसाठी काय केले आहे हे लक्षात असेल तर पराकोटीची भांडणे होणारच नाहीत.
आईवडिलांना मुलांची जाणीव असेल तर त्यांच्या बाबतीत ते चुकीचे आणि टोकाचे निर्णय देणार नाहीत. थोडे त्यांच्या कलेने घेतील. एकंदरीत काय तर जाणीव ही माणुसकी निभावायला मदत करत असते.

मित्रांच्या मैत्रीची जाणीव असेल तर मित्र मित्रांची फसवणूक करणार नाहीत. तिथे फुलते एक छान मैत्री..जी संकटात आधार देण्याचं काम करते. चांगल्या गोष्टी घडू लागतात. वासनेत सुज्ञता नसते. मैत्रीत जाणीव असते.
शिक्षकांनी मनापासून शिकवले आहे. ती जाणीव असेल तर विद्यार्थी वाया जाणारच नाहीत. तो समाजविघातक कृत्य करूच शकणार नाही. समाजोपयोगी कामे तो करण्यास उद्युक्त होईल..आणि तसे नाही झाले तर निदान तो कोणालाही त्रास न देता स्वतःचे जीवन छान जगू शकेल.
निसर्गाच्या किमयेची जर जाणीव असेल तर तो त्याच्यात ढवळाढवळ करणार नाही उलट त्याची तो जोपासना करेल..कोणाच्या उपकाराची जाणीव असेल तर तो कधीच त्या व्यक्तीला विसरणार नाही..जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा तो ते परतफेड केल्याशिवाय राहणार नाही..

एखाद्याने आपल्याला दिलेल्या वेळेची जाणीव असेल तर तो कधीच दुसर्यांचा वेळ उगीचच वाया घालवणार नाही. एखाद्याकडून घेतलेल्या वेळेत मिळालेल्या मदतीची, कर्जाची जाणीव असेल तर तो त्याची परतफेड करेल. आर्थिक व्यवहारात जाणीव ठेवणारे संख्येने कमी होऊ लागले आहेत.
जाणीव नसेल तर उलट्या काळजाची माणसे उलटसुलट चर्चा करताना जाणीव ठेवतील याची अजिबात खात्री नाही.
वि. स. खांडेकरांचे एक वाक्य प्रवचनाचा गाभा होऊ शकतो याची जाणीव मला त्यादिवशी झाली. एरवी... यांच्यासाठी कितीही करा यांना जाणीवच नाही हे वाक्य घराघरात अजून टिकून आहे. हे फार दुर्दैवी आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची जाणीव ठेवावी आणि सुज्ञ व्हावे !
नंदा गवांदे
लेखिका शिक्षक आहेत.
gawandenanda734@gmail.com