दसरा मेळावा होऊन हा दोन दिवस उलटून गेलेत. आरोप प्रत्यारोपांचा आणि राजकीय धुळवळीचा धुरळा हळूहळू खाली बसतो आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जाहिरात करताना 'विचारांचं सोनं लुटायला या' असं आवाहन केलं जातं. प्रत्यक्षात ती आपट्याची पानं असतात. 'हेच सोन आहे' असं वर्षानुवर्षांच्या आपल्या जडणघडणीतून आपण मानायला लागलेले असतो. त्यामुळे अस्सल सोन्याकडे आपलं लक्षही जात नाही. अस्सल सोनं समोर आलं तरी आपण दखलही येत नाही आणि अस्सल सोनं कुठे आहे का याचा शोध घेण्याच्या भानगडीतही पडत नाही.
अस्सल सोन्यातून दागिना घडत नाही, ही आपली आणखी एक दृढ झालेली भावना ; त्यामुळे मिलावटीचा आपण मनोभावे स्वीकार करत आलेलो आहोत. शिवसेनेचं आजवर तेच झालं. शेवटी कधी ना कधी आपणच घडवलेले मिलावटी दागिने ओवाळून टाकण्याची वेळ शिवसेनेवर येणारच होती. पण बेगडी दागिन्यांनीच तिजोरी बदलल्याने अस्सल सोन्याचा शोध घेण्याची आयती संधी शिवसेनेला चालून आली आहे. पण शिवसेनेची वाटचाल त्या दिशेने सुरू आहे का?

दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंचं भाषण हे फार तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतून फुटलेला शिंदे गट यांच्या विरोधातला राग आहे असं आपण फार तर म्हणू शकतो. सामाजिकदृष्ट्या विचार केला तर हाताला फारसं काही लागत नाही.
हिंदू धर्म आणि त्यातल्या कर्मकांडांवर प्रबोधनकार ठाकरेंनी फार पूर्वी लिहून ठेवलेलं आहे, पण उद्धव ठाकरे ते वाचण्याची फारशी तसदी घेताना दिसत नाहीत. वाचत असतील तर कळतंय पण वळत नाही, अशी त्यांची अवस्था झालेली दिसते.

ते गर्दीत भारतीय समाज बघत नाहीत. त्यांना दिसतो शिवसैनिकातला शिवसेनेचा मतदार ! भाषण करताना आपण आपल्या मतदारांसमोर किंबहुना मतपेटीसमोर भाषण करतोय याचं भान पुरोगामी किंवा कथित लोकशाहीवादी म्हणवणाऱ्या नेत्यांनाही असतं, त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांच्या उद्धव ठाकरेंकडून फारशी वेगळी अपेक्षा करण्याची गरज नाही.
मुळात आपण 'हिंदुत्व' या राजकीय संकल्पनेमुळेच आज हतबल अवस्थेत आलेलो आहोत हे उद्धव ठाकरेंनी नीट समजून घेतलेलं दिसत नाही. वर्तमानात रास्वसंघ आणि त्यांची राजकीय विंग असलेल्या भाजपाने पद्धतशीरपणे एकेका राज्यात हिंदुत्व ही लबाड राजकीय संकल्पना रुजून स्थानिक अस्मिता हळूहळू बोथट केल्या आणि त्याचबरोबर प्रांतीय प्रादेशिक पक्षही कमकुवत करत नेले. प्रादेशिक पक्षांना आपले अंकित केलं आणि त्यानंतर त्यांना गिळंकृत करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याच प्रक्रियेचा दुष्परिणाम म्हणून शिवसेनेची संघटना म्हणून आताची ससेहोलपट सुरू आहे.
शिवसेनेचा पाया हा हिंदुत्व नसून मराठी अस्मिता होता, हे बाळासाहेब ठाकरे विसरले आणि उद्धव ठाकरे अजूनही ते लक्षात घेत नाहीयेत. उद्धव ठाकरे राजकीय गरज म्हणून पुन्हा पुन्हा हिंदुत्वाचा उद्घोष करत आहेत त्यामुळे ते धड ना प्रबोधनकारांच्या पुरोगामीत्वाकडे सरकताहेत आणि ना धड त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वही जपता येत आहे.
राष्ट्रप्रेमी मुसलमानांविरोधात आमची तक्रार नाही असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. एका अर्थाने मुसलमान हे राष्ट्रविरोधीच असतात हे ठरवण्याच्या रास्वसंघी षडयंत्राचे बाळासाहेब ठाकरे हेही बळी होते. २०२२ मध्ये उद्धव ठाकरे तीच 'री' ओढताना दिसतात. ते मुसलमानांची देशप्रेमी आणि देशविरोधी अशी वर्गवारी करू पाहतायंत. इथेच त्यांचं तथाकथित वेगळं हिंदुत्व गंडलेलं दिसतं.

शेंडीजानव्याने दलित आणि मुसलमानांची कायम खलनायकी प्रतिमा रंगवण्याची मोहिम राबवली. त्या मोहिमेंतर्गत ते मुसलमानांना दहशतवादी आणि दलितांना नक्षलवादी ठरवू पाहतात. उद्धव ठाकरे आणि त्यांचे अनुयायी या मोहिमेचे बळी आहेत, हे त्यांच्या वक्तव्यातून वारंवार ध्वनीत होतं.
मला शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही असं नुसतं बोलून चालत नाही तर शेंडीजानव्याने रचलेल्या धर्मसापळ्यातून स्वतःची मुक्तताही करता आली पाहिजे. उद्धव ठाकरे हिंदुत्वावरच्या अतार्किक प्रेमामुळे अजूनही त्या सापळ्यात अडकलेले दिसतात. या अवस्थेत ते भारतीय जनता पार्टीचा प्रबळ राजकीय मुकाबला करू शकतील, अशी शक्यता पुढे येत नाही.
एकीकडे बिल्कीस बानो प्रकरणाचा जाहिर उल्लेख करत चक्रव्युहातून बाहेर पडणं सकारात्मक दिसत असलं तरी तथाकथित हिंदुत्व उद्धव ठाकरेंना पुन्हा पुन्हा चक्रव्यूहात आत खेचतं. हे असंच सुरू राहिलं तर हिंदुत्वाचं गाजर पुढे करून किंवा हिंदुत्व अधिकाधिक आक्रमक करून भाजपा भविष्यात शिवसेना रिकामी करू शकते ! दसरा मेळाव्याला शिवसैनिकांची झालेली उत्स्फुर्त गर्दी उद्धव ठाकरेंसाठी वर्तमानात आश्वासक भासत असली तरी भविष्यासाठी ती कितपत लाभदायी ठरेल याबद्दल साशंकताच आहे.
धर्म घरात ठेवला पाहिजे, अशी ही मांडणी उद्धव ठाकरे आपल्या भाषणात करतात ; परंतु प्रत्यक्ष कृतीत ते शक्य आहे का आणि उद्या भारतीय जनता पार्टीने एखाद्या मुद्द्यावर हिंदूना चेतवून घराबाहेर पडण्याचं प्रक्षोभक आवाहन केलं तर अशावेळी 'घराबाहेर पडू नका', असं आवाहन उद्धव ठाकरे करू शकतील का आणि लोक उद्धव ठाकरेंचं ऐकतील का हा मोठा प्रश्न आहे.

मुळात धर्म ही एकेकाळी जंगली अवस्थेतील मनुष्यप्राण्यात माणूसपण रुजवण्याची प्रक्रिया होती. पुढे ती स्त्रियांचं व तळागाळातील तमाम समाजघटकांचं दमण करणारी शोषणव्यवस्था झाली. वर्तमनातला धर्म माणसांना पुन्हा जंगली अवस्थेकडे घेऊन जाणारा ठरतो आहे. अशावेळी धर्माबद्दल पुन्हा पुन्हा बोलत राहणं, त्याला राजकीय अधिष्ठान प्राप्त करून देणं, आपलं एकूणच जगणं धर्माशी जोडत राहणं आणि लोकांच्या धर्मश्रद्धांवर स्वार होत धर्माचं आपल्या देशापेक्षाही महत्त्व वाढवणं हे संघभाजपासारख्यांची लबाडी. त्या लबाडीलाच त्यांनी हिंदुत्व म्हणून लोकांच्या गळी उतरवलंय.
तेच हिंदुत्व आज शिवसेनेच्या, मराठी अस्मितेच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या बोकांडी बसलंय. पुढच्या काळात लोकांचे जगण्याचे प्रश्न धर्मापेक्षाही मोठे करण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंना पेलावं लागणार आहे. समस्या ही समस्येचं निवारण कधीच होऊ शकत नाही, हे उद्धव ठाकरेंनी समजून घ्यावं.
उद्धव ठाकरे यांना तगायचं असेल आणि येणाऱ्या काळात आपली राजकीय ताकद पुन्हा मिळवायची असेल तर त्यांनी हिंदुत्वाच्या सापळ्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांच्या दैनंदिन जीवनमरणाच्या प्रश्नांवर पुढचं राजकारण केलं पाहिजे. देश, लोकशाही, संविधानिक हक्कांबाबत जनजागृतीच्या कामात स्वतःला झोकून दिलं पाहिजे.

मराठी अस्मितेची व्याप्ती वाढवत अधिकाधिक समाजघटक त्यात सामावून घेत, जसा सत्तास्थापनेचा 'किमान सामाईक कार्यक्रम' असतो, तसा सर्व समाजघटकांना एकत्रित आणण्यासाठी 'किमान सामाईक कार्यक्रमाचा आराखडा' बनवणं, त्यासाठी पूर्वीचे मतभेद/वैमनस्य विसरून जाऊन वेगवेगळ्या विचारप्रवाहांना सोबत घेऊन पक्ष म्हणून नव्हें तर महाराष्ट्र राज्याचं हित लक्षात घेऊन कृती कार्यक्रम आखणं, धार्मिक विषयांकडे पार दुर्लक्ष करीत शिक्षणाचे, आरोग्याचे, परिवहनाचे, नागरी सुविधांचे प्रश्न घेऊन रान उठवणं आणि त्यावर नव्याने राजकीय उभारणी करणं उद्धव ठाकरेंना शक्य झालं तर आणि तरच भाजपाच्या कपटकारस्थानी राजकारणाला मात देता येऊ शकेल !
मराठी अस्मितेतून शिवसेनेचा जन्म झाला, आता पुन्हा मराठी अस्मितेशिवाय शिवसेनेपुढे अन्य पर्याय नाही. स्पष्टच सांगायचं तर तगायचं, जगायचं असेल तर हिंदुत्व सोडावं लागेल ! सत्तास्वार्थी राजकारणात मराठी अस्मितेचा हिंदुत्वात विलय करण्याची घोडचूक केलीत, आता हिंदुत्व मराठी अस्मितेत विलय करण्याचा प्रयोग करून पाहा ! आदित्यची पीढी बरबाद होऊ द्यायची नसेल, तर धर्म वैयक्तिक बाब म्हणूनच राहूद्या; राजकारणातून धर्म हद्दपार करा !
राज असरोंडकर
संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ
mediabharatnews@gmail.com