घुंगरांसोबत वीजही पायात बांधून घेतली होती तिने …

घुंगरांसोबत वीजही पायात बांधून घेतली होती तिने …

घुंगरांसोबत वीजही पायात बांधून घेतली होती तिने …

किशनचंद साधू सिंह नागपाल आणि आणि नोनी साधू सिंह नागपाल यांची सुपुत्री निर्मल नागपाल…म्हणजेच आपली सरोज खान…जी आपल्या हृदयाच्या ठेक्यागणिक नृत्याचे पदलालित्य दाखवत होती…सर्व परिचीत सरोज खान…! ती सिनेरसिकांच्या दिलाची धडकन वाढविणारी व पायांना नृत्याच्या ठेक्यावर नाचवणारी सरोज खान आज अनंतात विलीन…

हसरा चेहरा…कुरळ्या केसांचा स्टेपकट…पायात घुंगरूसोबत विजेलाही बांधून घेणारी…गाण्यातल्या संगीताच्या ठेक्यांना जणू हृदयाचा ठेका समजणारी सरोज खान…एक अत्यंत प्रभावी व्यक्तीमत्व…कामाच्या वेळी अतिशय कठोर…स्वतःला झोकून देऊन काम करणारी आणि कलाकारांकडून तसंच काम करून घेणारी…पण इतर वेळी सगळ्यांना मदत करणारी प्रेमळ सरोज खान….

भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर रिफ्यूजी म्हणून भारतात आलेल्या त्यांच्या कुटुंबाला, अनंत अडचणींना त्रास सहन करत सामोरं जात आयुष्याची सुरुवात करावी लागली….

वयाच्या तिसऱ्या वर्षी नज़राना सिनेमात अभिनेत्री श्यामाच्या बालपणाची भूमिका रंगवताना सरोज खान बालकलाकार म्हणून पुढे आल्या…२० नोव्हेंबर १९४८ ला जन्मलेल्या सरोज खान आज वयाच्या ७१ व्या वर्षी दिगंतात विलीन झाल्या…

तेराव्या वर्षी त्यांनी आपल्यापेक्षा तीस वर्षांनी मोठ्या असलेल्या बी. सोहनलाल यांच्यासोबत लग्न केले…त्यावेळी बी.सोहनलाल यांच्या असिस्टंट म्हणून सरोज खान काम करत होत्या…त्यांना तीन मुले झाली. त्यातील एक मुलगा दगावला…पण पुढे मुलं मोठी झाल्यावर सोहनलाल यांनी मुलांना आपले नाव देण्याचे नाकारले…कारण बी सोहनलाल यांचे पूर्वीच लग्न झाले होते आणि त्यांना चार मुलेही होती…

१९६० ला नृत्य रचनाकार बी सोहनलाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोरीओग्राफीच्या कामाला सुरुवात केली…बी सोहनलाल यांच्या मार्गदर्शनाखाली मणिपुरी, कथक, भरत नाट्यम, कथकली इत्यादी नृत्य प्रकारातही सरोज खान पारंगत झाल्या…”

संगम ” चित्रपटासाठी बी सोहनलाल यांना युरोपला जावे लागले असताना, ” दिल ही तो है ” या चित्रपटातील “निगाहे मिलाने को जी चाहता है ” या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनीच केली..

बी सोहनलाल यांच्यापासून सरोज खाननी विभक्त होवून सरदार रोशन खान यांच्याशी विवाह केला…त्यांना दोन मुलं झालीत…मुलांना रोशन खान यांचे नाव मिळाले…नृत्यदिग्दर्शक राजू खान यांच्या सरोज खान या आई…त्यांची एक मुलगी सुगना खान दुबईत एक नृत्य संस्था चालवते..

१९७४ नंतर स्वतंत्र स्वरूपात “गीता मेरे नाम ” या चित्रपटापासून त्यांची स्वतंत्र कारकीर्द सुरू झाली…पुढे श्रीदेवी,माधुरी दीक्षित, रेखा सारख्या नृत्यांगनांना त्यांनी आपल्या नृत्याच्या तालावर नाचवले …सरोज खानची ” मिस्टर इंडिया ” तली ” हवाहवाई ” अजूनही लोकांना आपल्या तालावर नाचवते… चांदनीच्या गाण्यांसोबत त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या…

वैजंतीमाला, शर्मिला टागोर, वहिदा रहमान, रेखा, माधुरी दिक्षित, ऐश्वर्या रॉय यासारख्या अनेक दिग्गज अभिनेत्रींना सरोज खाननी आपल्या नृत्याच्या ठेक्यावर नाचायला शिकवलंय…२०० पेक्षा अधिक चित्रपटांत त्यांनी कोरियोग्राफी केली. “नगीना ” या चित्रपटातील…” मै तेरी दुश्मन ” या गाण्याचा नृत्य दिग्दर्शनाने, हे गाणं, सरोज खाननी आणि श्रीदेवीने अजरामर बनवले…त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली…

माधूरी दिक्षितला त्यांनी…१९८८ साली ” तेजाब ” मधील.. ” एक दो तीन…” १९९० ” थानेदार ” मधील ” तम्मा तम्मा लोगे…” १९९२ ला ” बेटा ‘ चित्रपटातील ” धक धक करने लगा…” १९९० ला ” सैलाब ” मधील ” हम को आजकल है इंतज़ार…”
या गाण्यांवर नाचवलं..आणि तिच्यासोबत रसीकांनाही नाचवलं…ही गाणी सरोज खान आणि माधूरी दिक्षीत यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरलीत.

माधुरी दीक्षितला ” धक धक गर्ल ” म्हणून सरोज खानच्या नृत्यदिग्दर्शनामुळेच ओळखले जाऊ लागले…

सुभाष घई यांच्या ” हिरो ” चित्रपटापासून सरोज खान यांना प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली…” एक दो तीन ” या गाण्याच्या बेस्ट कोरिओग्राफीचं अवॉर्ड त्यांना जेव्हा मिळालं, तेव्हा हा पुरस्कार, कोरिओग्राफरसाठी त्याच वर्षी सुरु करण्यात आला होता…

सरोज खाननी टि व्हि शोजच्या जज म्हणून ही काम केलं. २००५ मध्ये नच बलिए च्या दोन्ही सिझनला त्या जज होत्या. आवडलेल्या नृत्याविष्कारांना नृत्यमंचावरंच स्वतःतर्फे रोख बक्षीस देण्याची प्रथा सुरू केली…पुरस्कार कसाही असला तरी तो अनमोल असतो…कलाकारांचा आत्मविश्वास, मनोबल वाढवणारा असतो.. हीच संजीवनी सरोज खान नृत्यमंचावरच देत असत….

” बुगी वुगी ” या डान्स शोमध्ये त्या जावेद जाफरी, नावेद जाफरी आणि रवी बहल सोबत २००८ मध्ये दिसल्या…२००९ च्या या तिसऱ्या सीझनमध्ये वैभवी मर्चंट, जुही चावला सोबत दिसल्या…उस्तादों के उस्ताद मध्ये ही त्या होत्या…” नच ले वे वुइथ सरोज खान ” मध्येही त्या दिसल्या…

रावडी राठोड़, एबीसीडी एजंट विनोद, खट्टा मीठा, दिल्ली, नमस्ते लंडन, सावरिया, धन धना धन गोल, फ़ना, वीर-झ़ारा, स्वदेश, कुछ ना कहो, साथिया, देवदास, ताल, फ़िज़ा, हम दिल दे चुके सनम ,परदेस, मोहरा, इरुवर ( तमिळ ), अंजाम, बाज़ीगर, आईना, डर, बेटा, आवारगी, सैलाब, चांदनी, तेज़ाब, मिस्टर इंडिया, नगीना, हिरो… अशांसारख्या अनेक चित्रपटांच्या नृत्य दिग्दर्शिका म्हणून सरोज खाननी काम केलंय …

२००२ ला ” देवदास ” चित्रपटाच्या ” डोला रे डोला रे डोला …” आणि २००८ ला ” जब वी मेट ” चित्रपटाच्या ” ये इश्क हाए…” आणि २००५ ला ” श्रींगारम ” या तमीळ चित्रपटातील सगळ्याच गाण्यांच्या कोरियोग्राफी साठी त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला…

१९८९ मध्ये ” तेजाब ” १९९० मध्ये ” चालबाज ” १९९१ मध्ये ” सैलाब ” १९९३ मध्ये ” बेटा ” १९९४ मध्ये ” खलनायक ” २००० मध्ये ” हम दिल दे चुके सनम ” २००३ मध्ये ” देवदास ” २००८ मध्ये ” गुरु ” या सर्व चित्रपटांच्या कोरिओग्राफीसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाले…

” लगान ” आणि ” वन्स अपॉन अ टाईम इन इंडिया ” या चित्रपटासाठी अमेरिकी कोरियोग्राफी अवॉर्डही सरोज खानने पटकावले…१९९८ ला ” चोडालानी व्हुंडी ” या तेलगू चित्रपटासाठी ” नंदी ” अवॉर्ड मिळाले. २०११ साली १९ वा ” एन्यूअल कलाकार अचीवर अवॉर्ड फॉर आऊटस्टँडिंग काँन्ट्रीब्यूशन इन डान्स कोरिओग्राफी ” पण त्यांना मिळालं.

सामान्यपणे चित्रपटात समोर दिसणाऱ्यांनाच प्रसिद्धी मिळते पण सरोज खान या अशा कोरिओग्राफर होत्या की, त्यांना पडद्यामागच्या गाण्यांसाठी, नृत्य दिग्दर्शनासाठी, प्रसिद्धी मिळाली. पडद्यामागे राहूनही त्या आबालवृद्धांना चिरपरिचित झाल्या…नृत्यदिग्दर्शनातल्या क्षेत्रात ” मास्टरजी ” ही जणू काही पदवी त्यांनी आपल्या सातत्यपूर्ण कामाने मिळवली…

अशा या स्वतःच्या आयुष्याला आकार देत अनेकांचं आयुष्य घडवणाऱ्या सरोज खान आज आपल्यात नाहीत… वयाच्या ७१ व्या वर्षी आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले…तरीही रसिकांच्या हृदयात त्या विराजमान आहेत व यापुढेही राहतील ….

सरोज खान यांना विनम्र आदरांजली !!!

 

अजिता साने-सोनाले

लेखिका साहित्यिक आहेत. सिने, नाट्य, संगीत, कला विषयांवर लिखाण करतात. त्यांचं पडद्यामागचं गाणं हे माणूस प्रकाशनचं पुस्तक प्रकाशित आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!