जातीयवादाने त्रिवेंद्रचं जगणंच हिरावून घेतलं…

जातीयवादाने त्रिवेंद्रचं जगणंच हिरावून घेतलं…

जातीयवादाने त्रिवेंद्रचं जगणंच हिरावून घेतलं…

त्रिवेंद्र उत्तरप्रदेशात ग्रामविकास अधिकारी म्हणून नोकरीवर होता. २०१८ च्या बॅचचा. इनमिन आठ महिने झाले होते नोकरी लागून. आयुष्याला एक चांगलं वळण लागलं म्हणून तो मनोमन खूश होता. लग्नही ठरलं होतं. नोव्हेंबरात त्याचे दोनाचे चार होणार होते. पण तत्पूर्वीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आपलं जीवन आकस्मिक संपवलंय. गावातील किसान सभेत झालेला जाहिर अपमान त्याच्या जिव्हारी लागला. चूक इतकीच. इथल्या अमानवी विषय समाजव्यवस्थेत खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीत त्याचा जन्म झाला होता.

मध्यंतरी, एका कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाषण केलं होतं. बाबासाहेबांचा त्यांच्या आयुष्यात प्रचंड अपमान झाला, पण त्यांनी कोणाबद्दलही सूड भावना न ठेवता भारतीय संविधानात सर्वांना समान न्याय दिला, असं मोदी भाषणात म्हणाले.‌ उत्तरप्रदेशसह भारतात दलित अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत, त्या पाहता मोदींना नेमकं काय म्हणायचंय, असा प्रश्न पडतो. यापुढे दलितांवर अत्याचार होता कामा नये असं त्यांना देशाला सूचवायचंय की अपमान सहन करायला शिका म्हणायचंय, ते स्पष्ट होत नाही.

कामचोर , नालायक, नकारा , निकम्मे अशा शिव्या, तुम घुस देकर आये हो या आरक्षण से ? तुम्हे तो जुतोसे मारकर नौकरी से बाहर कर देना चाहिये .काम भी नही करोगे और सरकारी नौकरी भी चाहिये. बात तो सुननी पडेगी. न जाणो, त्रिवेंद्रला किसान सभेत काय काय ऐकावं लागलं होतं. बोलणाऱ्या नेत्यांकडे जरा नजर भिडवून पाहिले तर, आँखे निकलवाकर सडक पर फेंक दुंगा , अशी उघड धमकीही ऐकावी लागली. तेही सार्वजनिकरित्या जाहिर सभेत. त्याची जातीवरून, आरक्षणाच्या लाभावरून खिल्ली उडविली जात असताना लोक हसत होते. त्यांच्यासाठी ते मनोरंजन होतं.

गंभीर बाब ही की गोरा तहसीलदार विपीन द्विवेदी मंचावर उपस्थित होते. तेसुध्दा हसणाऱ्यांत सामील होते. भारतीय किसान युनियनच्या किसान पंचायतमध्ये निवेदन स्वीकारण्यासाठी म्हणून तहसीलदार आलेले होते. पंचायत रसूलपूरमध्ये आयोजित केलेली असल्याने संबंधित ग्रामसचिव म्हणून त्रिवेंद्र कुमारही सोबत होता. तहसीलदार मंचावर असतानाही किसान युनियनच्या अध्यक्ष राकेश सिंह याने जाणूनबुजून त्रिवेंद्रला मंचावर बोलावून लोकांसमोर त्याची झाडाझडती घेतली आणि त्या आड त्यांची सार्वजनिक बेईज्जती केली.

इतकं करून, त्यांचं मन भरलं नाही. त्रिवेंद्रला अवमानजनक शेरेबाजी करणं, रात्री अपरात्री केव्हाही फोन करून मानसिक छळ करणं हे प्रकार नंतरही सुरू होते. त्रिवेंद्र प्रचंड अस्वस्थ होता. अखेर त्या अवघ्या २३ वर्षीय नवयुवकाचा बांध सुटला आणि त्याने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. त्रिवेंद्रच्या आत्महत्येनंतर त्या सभेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते किसान नेते त्रिवेंद्रचा प्रचंड अपमान करताना स्पष्ट दिसत आहेत.

आत्महत्यापूर्व चिठ्ठीत आपली कशी सतावणूक होत होती, ते नमूद करून त्रिवेंद्रने लिहिलं की जाती आणि आरक्षणावरून मला सतत अवमानित केलं जातं आहे. माझा छळ केला जात आहे. मी विफल झालो आहे. जीवनाशी हारलो आहे.

त्रिवेंद्रच्या आत्महत्येनंतर शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. पोलिसांनी किसान नेत्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला, त्यांना अटकही केली, पण जातीयवादाचे एका उमद्या युवकाचं आयुष्य सुरू होण्यापूर्वीच संपवलं त्याचं काय? त्रिवेंद्र त्याच्या कुटुंबाचा आधार होता. त्याच्या पाठबळाने त्याच्या भावाचं शिक्षण सुरू होतं. २८ नोव्हेंबरला त्रिवेंद्रचं लग्न ठरलं होतं. सगळं उद्ध्वस्त झालं.

काय मिळवलं त्याची खिल्ली उडवताना? गायगुरांवरून माथी भडकणाऱ्या लोकांना माणसांबद्दल कणव कशी नसते? किसान पंचायत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी होती. तिथे उपस्थित नेत्यांना आपले प्रश्न मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार ज्या भारतीय संविधानाने दिलाय, त्याच संविधानाने त्रिवेंद्रला आरक्षणाचा हक्क दिलाय. त्याचं कारण मागासलेपण तर आहेच, पण जातीय आकसामुळे गुणवत्ता असूनही नाकारले जाण्याच्या शक्यतेची भीतीही आहे. ती भीती स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही तशीच कायम आहे. ती घालवण्याचं काम हाती घेण्याऐवजी आरक्षण रद्द करण्यासाठी किंवा दलित अत्याचारविरोधी कायदा संपवण्यासाठी जातीयवाद करणारेच लोक मोर्चे काढतात, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत.

देशातल्या संसदेतील लोकसभा अध्यक्ष सारख्या महत्त्वपूर्ण संविधानिक पदावर बसलेली व्यक्तिही गुणवत्तेची जातीय मांडणी करते, तेव्हा ती देशातील गल्लीबोळात जातीयवाद जोपासणाऱ्यांना चिथावणीच असते. आपल्याच देशबांधवांचे हजारो बळी या जातीयवादाने घेतले आहेत. जातीयवाद जोपासणारे धर्मांध कधीतरी माणसात येणार आहेत का?


प्रफुल केदारे

लेखक पत्रकार आहेत व कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक आहेत.

आपल्या प्रतिक्रिया खालील प्रतिसाद रकान्यात जरूर द्या.

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!