एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांचं आत्महत्या सत्र ; सरकारला धरलंय जबाबदार !

एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांचं आत्महत्या सत्र ; सरकारला धरलंय जबाबदार !

एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांचं आत्महत्या सत्र ; सरकारला धरलंय जबाबदार !

आज राज्यात दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी डेपोत काम करणा-या एसटी चालकाचा मृतदेह त्याच्या भाड्याच्या घरात आढळला तर जळगावातील एसटी कर्मचा-याने आत्महत्यापूर्व चिठ्ठी लिहून सरकारला जबाबदार धरत आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.

रत्नागिरी आगारातील चालक-वाहक पांडुरंग गडदे यांचा मृतदेह त्याच्या राहत्या भाड्याच्या खोलीत आढळून आला. हा चालक कम वाहक बीड येथील असून नांदेड येथील कर्तव्य बजावून तो रत्नागिरीत आला होता. आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाही. गेले तीन महिने पगार न झाल्याने तो तणावाखाली होता, अशी माहिती समोर येते आहे ; तर दुसरीकडे जळगांव आगाराचे कूसुंबा येथील मनोज अनिल चौधरी या वाहकाने आत्महत्या केली आहे. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये, त्यांनी एसटी महामंडळाची कार्यपद्धती व मराठी माणसांचे ठाकरे सरकार हे या स्थितीसाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

मनोज चौधरी यांच्या मृत्यूपूर्व चिठ्ठीमुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आणि ठाकरे सरकार असा थेट उल्लेख असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत आले आहेत. तसंच एसटी महामंडळाच्या कारभारावर मोठं प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे. मिडिया भारत न्यूजने मनोज चोधरी यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे

राज्यात टाळेबंदी घोषित होण्यापूर्वी एसटी महामंडळात पगारात नियमितता होती ; पण कमी पगार ही तक्रार कर्मचाऱ्यांची आधीपासूनची आहे. टाळेबंदीनंतर सर्व व्यवहार ठप्प झाले. प्रवासी यंत्रणा ठप्प झाली. एसटीला धंदाच नसल्याने आधीच कुरकुरत असलेली एसटी अधिक बेजार झाली आणि पगारातील अनियमितता सुरु झाली. यामुळे कर्मचाऱ्यांची परवड सुरु झाली. आॅगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही.‌

दरम्यान कोविडकाळात मुंबईतील बेस्टवरचा ताण लक्षात घेऊन एसटी महामंडाळाच्या बसेस बेस्ट सेवेत रुजू करण्यात आल्या. यात बेस्ट कर्मचाऱ्यांचं वेतन नियमित सुरु होतं ; वरुन बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसही जाहीर झाला. पण त्यांच्या सोबत काम करणाऱ्या साडेचार हजार एसटी कर्मचाऱ्यांचा हक्काचा पगारही तीन महिन्यापासून थकवला गेला आहे, अशी माहिती इंटक संलग्न महाराष्ट्र एसटी वर्कर्स काॅंग्रेसचे राज्य सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिलीय.

तिगोटे यांनी मिडिया भारत न्यूजशी बोलताना सांगितलं की, रत्नागिरीच्या घटनेत चिठ्ठी सापडलेली नसली तरी या दोन्ही आत्महत्यांना राज्य सरकारच जबाबदार आहे. वेळोवेळी अनियमितता आणि वेतनासंबंधी पत्रव्यवहार करुनही आमची दखल घेतली नाही. कामगार आयुक्तांशी पत्रव्यवहार करुन आम्ही कर्मचाऱ्यांच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या ; तरीही कुठलीही ठोस उपाययोजना शासन आणि प्रशासन पातळीवर राबवली गेली नाही, त्यामुळेच या दोन आत्महत्या झाल्या आहेत. वेतन थकवल्यामुळे एसटी महामंडळाविरोधात फौजदारी कारवाई व्हायला हवी, असंही त्यांनी सांगितलं.

एक महत्वपूर्ण माहीती तिगोटे यांनी ‘ मिडिया भारत न्यूज’ला दिली. आज कामगार आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत महामंडळाने कर्मचाऱ्यांचं एका महिन्याचं वेतन आज रात्री किंवा उद्या पर्यंत जमा करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे एका महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

कोविडचा काळ सुरु आहे ; त्यात दिवाळीचा सण तोंडावर आहे, अशावेळी राज्य शासनाने तातडीने आमची दखल घ्यावी, नाहीतर ऐन दिवाळीत आंदोलन करावं लागेल, असा इशाराही तिगोटे यांनी दिला आहे.

सोबतच, राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांना तिगोटे यांनी कळकळीचं आवाहन केलंय की कोणत्याही कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये. आपल्या समस्यांचा लढा आपण समर्थपणे लढूयात.

एसटी कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिता पत्की यांच्याशी ‘मिडिया भारत न्यूज’ने संपर्क साधला असता त्यांनी या दोन्ही आत्महत्येची सखोल माहीती घेत असल्याचं सांगितलं तसंच पगार वेळेत मिळाला नाही, ही गोष्ट खरी आहे त्याबाबत आमचं राज्य सरकार आणि महामंडळाशी बोलणी सुरु असल्याचं सांगितलं आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी मिडिया भारत न्यूजने संपर्क केला असता त्यांच्याकडून मिडिया भारतचा कॉल स्विकारला गेला नसल्यामुळे अद्याप या घटनांवर त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

( एसटी कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं ऐकण्यासाठी तळाचा विडियो जरूर ऐका.)

 

 

 

अंकुश हंबर्डे पाटील

वृत्तसंपादक, मिडिया भारत न्यूज

ankushdh8@gmail.com / 8668969071


एसटी कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं ऐकण्यासाठी टिचकी मारा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!