पप्पू कालानीच्या राजकीय डावपेचांना पुन्हा एकदा रामदास आठवलेंचा आधार !!!

पप्पू कालानीच्या राजकीय डावपेचांना पुन्हा एकदा रामदास आठवलेंचा आधार !!!

पप्पू कालानीच्या राजकीय डावपेचांना पुन्हा एकदा रामदास आठवलेंचा आधार !!!

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कोण असणार हा मोठा कळीचा मुद्दा झालाय. कुमार आयलानी आणि ज्योती कालानी या दोघांचाही तिकिटावर जोरदार दावा आहे. जर शिवसेना-भाजपाची युती झाली तर कुमार आयलानींचे तिकीट निश्चित मानलं जातं, पण युती नाही झाली तर मात्र ज्योती कालानींचं पारडं जड आहे.

पप्पू कालानी हे महाराष्ट्रातील राजकारणातलं एक बदनाम तरी बहुचर्चित नाव. गेली ३३ वर्षं कालानीचा उल्हासनगरातील राजकारणावर स्वतंत्र प्रभाव आहे. १९९० ला पप्पू कालानी पहिल्यांदा काँग्रेसचा आमदार झाला, तिथून त्याच्या डोक्यावर शरद पवारांचा हात आहे. पप्पू कालानी आणि हितेंद्र ठाकूरशी असलेल्या संबंधांवरून भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांवर बेछूट आरोप करत १९९५ ला अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला होता. त्याला गो. रा. खैरनारांचीही साथ लाभली होती. परिणामी, महाराष्ट्रातील काँग्रेसची सत्ता जाऊन शिवसेना-भाजपा युती सत्तारूढ झाली होती. अर्थात म्हणून शरद पवारांनी कालानीचं पाठबळ काही काढून घेतलं नाही.

१९९५ आणि १९९९ या दोन्ही निवडणुका पप्पू कालानीने तुरूंगातून लढवल्या व निवडून आला. २००४ च्या निवडणूकीवेळी पप्पू कालानी पॅरोलवर बाहेर होता, पण त्याला थेट राष्ट्रवादीचं तिकीट देण्यास पक्षातील अनेकांचा विरोध होता. अशा वेळी पवारांनी रामदास आठवलेंना हाताशी धरत पप्पू कालानीला अधिकृत राजकीय निवारा मिळवून दिला. उल्हासनगर मतदारसंघ पवारांनी आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीला सोडला आणि तिथून कालानीचं तिकीट निश्चित करून स्वत: हात वर केले.

उल्हासनगर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. ज्योती कालानी महापौर होत्या. त्याच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होत्या. पक्षाचे ४४ नगरसेवक होते. सोबत रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून आंबेडकरी मतांचा बोनस होता. पप्पू कालानी निवडून आला.

२००९ ची निवडणूक मात्र कालानीला कठीण गेली. उल्हासनगरची आमदारकी सुरूवातीपासून भाजपाकडे होती. १९९५ ला कालानीने ती साखळी खंडीत केली. तिथून सतत भाजपा पराभूत झाली. पण २००९ ला तत्कालीन जिल्हाध्यक्षा पुर्णिमा कबरे यांनी पप्पू कालानीला पराभूत करण्याचा चंग बांधला होता. त्यांना गोपीनाथ मुंडेंची साथ होती. पक्षांतर्गत वैमनस्यातून राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचीही आतून ताकद होती. पहिल्यांदा पप्पू कालानीला पराभव पाहावा लागला. पाठोपाठ उल्हासनगर महानगरपालिकाही हातातून गेली.

पण २०१४ ला भाजपाकडे मोदी लाट असतानाही ज्योती कालानींनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पुन्हा खेचून आणली. काळाची पावलं ओळखून पप्पू कालानीचा मुलगा ओमी याने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपाशी संधान बांधलं. आपलं राजकीय कौशल्य पणाला लावून शहराचं महापौरपदही घरात आणलं. उल्हासनगरचं आमदारपद राष्ट्रवादीच्या ज्योती कालानींकडे आणि महापौरपद त्यांची सून भाजपाच्या पंचम कालानींकडे आहे. आता पुन्हा एकदा आमदारकी टिकवून ठेवण्यासाठी कालानी परिवाराची धडपड सुरू आहे.

पण महापौरपद कालानींकडे असल्याने त्याच कुटुंबात आमदारकी द्यायला भाजपातील निष्ठावंतांचा विरोध आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानींना अर्ध्यावर राजीनामा द्यायला भाग पाडून कालानी परिवाराने महापौरपद मिळवलेलं असल्याने आमदारकीवरचा त्यांचा दावा तसाही ढिला आहे. पण दबावाचं गणित अचूक साधणाऱ्या कालानी परिवाराने तिकीटावरून भाजपात तणाव निर्माण केला आहे.

शिवसेना-भाजपाची युती झाली तर आमदारकीचा रस्ता सहजसुलभ आहे. युतीला कालानींची गरज लागणार नाही, पण युती झाली नाही तर मात्र भाजपाला कालानींची मनधरणी करावी लागेल. अशावेळी उल्हासनगरची जागा रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीला सोडून तिथून ज्योती कालानी किंवा ओमी कालानीला कमळ चिन्हावर निवडून आणण्याची खेळी भाजपा करू शकते.

भाजपाने नाहीच तिकीट दिलं तरी राष्ट्रवादीचं तिकीट कालानी परिवार आजही खिशात घेऊन फिरतोय. अगदी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरही कालानी परिवाराचा डोळा आहे. राजकीय पक्षांना निवडून येण्याची शक्यता व क्षमता असलेला उमेदवार हवा असतो. तो मिळाला की राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर सुरा फिरवायला मागेपुढे बघत नाही. कालानी परिवाराने राजकारणाची ही कमजोर नस गेली ३३ वर्षे यशस्वीपणे धरून ठेवली आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!