विषारी वायूच्या उग्रतेने उल्हासनगर पुन्हा घुसमटलं ! शासकीय यंत्रणा मात्र सुस्तच !

विषारी वायूच्या उग्रतेने उल्हासनगर पुन्हा घुसमटलं ! शासकीय यंत्रणा मात्र सुस्तच !

विषारी वायूच्या उग्रतेने उल्हासनगर पुन्हा घुसमटलं ! शासकीय यंत्रणा मात्र सुस्तच !

वालधुनी नदीत केमिकल माफियांनी त्यांचे टॅन्कर्स रिक्त करावेत आणि त्यातून विषारी वायू निर्मिती होऊन नदीलगतच्या रहिवाशांना गंभीर बाधा व्हावी, ही घटना वारंवार घडूनही प्रदुषण नियंत्रण मंडळ, उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलिस विभागाच्या उदासीनतेचा परिणाम म्हणून या जीवघेण्या घटनेची काल संध्याकाळी पुनरावृत्ती झाली. रात्री उशीरापर्यंत लोक विषारी वायूबाधेने घुसमटत होते.

काही महिन्यांच्या अंतराने वालधुनी नदीतून ( खरं तर नाला ) विषारी वायू परिसरात पसरण्याची घटना वारंवार घडूनही शासकीय यंत्रणा सुस्त आहेत. एकाच वेळी हजारों लोकांना श्वसनरोध, मळमळ, भयंकर डोकेदुखी, डोळे जळजळणे असे आरोग्यासाठी घातक गंभीर त्रास होऊनही यंत्रणा तेवढ्यापुरतं धावपळीचं नाटक करतात. लोकही पाठपुरावा करणं सोडतात आणि कधीतरी केमिकल माफिया पुन्हा संधी साधतात, असं दुष्टचक्र सुरू आहे.

कालच्या घटनेची तीव्रता अंबरनाथमधील शिवमंदिर परिसर व उल्हासनगर पूर्वेकडील भरतनगर, समतानगर, कैलास काॅलनी, कुर्ला कॅम्प, दहा चाळ या भागात अधिक आहे. लोकांमध्ये घबराट पसरलीय.

सुभाष टेकडी भागातील सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांनी पहाटे दोन वाजता दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी स्वतः उपस्थित राहून पाण्याची फवारणी करून घेतली, तरी देखील वासची तीव्रता कमी झाली नाही.

अॅड. जय गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, वासाची उग्रता सहन करण्यापलिकडची आहे. ते म्हणाले, कैलास कॉलनी ला भयंकर वास आहे, डोळे जळत आहेत आणि डोके दुःखत आहे, त्यामुळे मी आता लांब हॉटेल वर जायचा निर्णय घेतला, घरात बसवत नाही !

रोहित साळवे यांनी मिडिया भारत ला सांगितलं की विषारी वायूची घटना पहिल्यांदा घडत नाहीये. घटना घडली की यंत्रणा धावते. पण नंतर खोलवर तपास होऊन मूळ गुन्हेगारांपर्यंत पोचत नाही. सर्वसामान्य लोक साटंलोटं असल्याचा आरोप करताहेत. तसं दिसलं तर एकालाही सोडणार नाही, कारण हा क्रूरपणे लोकांच्या जीवाशी खेळ चाललाय.

उल्हासनगर व अंबरनाथच्या सीमेवरील वडोल, एएमपी गेट, लासी पाडा, रेणुका सोसायटी, सम्राट अशोकनगर, लालचक्की परिसराला विषारी वायुचा त्रास नवीन नाही.

या भागात सर्व नियमकायदे धाब्यावर बसवून कंपन्या सुरू आहेत. त्यांचे प्रदुषण हा या भागातील लोकांच्या आयुष्याचाच भाग झालेला आहे. वायुचा वास म्हणजे कंपन्यांचं नित्यनेमाचं प्रदुषण समजून लोक तो विषारी वायु शोषून घेत जगत राहतात. डोकं दुखतं, डोळे चुरचुरतात, पण सांगणार कोणाला ?

२०१४ ची गोष्ट ! पत्रकारांना माहिती अशी मिळाली होती की एएमपी गेटजवळ नाल्यात रात्रीच्या वेळी टैंकर्स मधून केमिकल सोडले जाते. रात्री १ नंतर ते घडतं. आधी पोलिसांची गाडी येते. पोलिस उतरतात. इकडे तिकडे टेहळणी करतात. मागोमाग एक कार येते. माणसं उतरतात. पैशांची देवाणघेवाण होते. कार आणि पोलिस निघून जातात आणि मग टैंकर्स येतात. नाल्यात केमिकल ओतून देतात. आठवड्यातून दोनदा हे घडतं.

पत्रकारांनी त्या भागातील ओळखीच्या लोकांकडे चौकशी केल्यावर कळलं होतं की वायुचा वास येतो, डोळे चुरचुरतात, घसा खवखवतो, रात्री कधीतरी होतं. आम्ही झोपेत असतो. ३० नोव्हेंबर, २०१४ रोजी त्या समस्येने आपलं रौद्र रूप दाखवलं होतं.

या घटनेच्या काही दिवसांपूर्वीसुध्दा वायुबाधेचा त्रास लोकांनी सहन केला होता. त्यावेळी सम्राट अशोकनगर आणि वडोल गावातील युवकांनी टैंकरवाल्यांना चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. तरी ३० नोव्हेंबरची घटना घडली होती; कारण सरळ आहे. टैंकर माफीयांच्या गैंगमथ्ये पोलिससुध्दा सामील होते.

उल्हासनगर रेल्वे स्थानकावरून जो पादचारी पूल पश्चिम बाजूस जातो, त्यावरून सकाळच्या वेळेस नाकाला रूमाल लावल्याशिवाय चालणे मुश्कील असते.

सहा वर्षांपूर्वीच्या त्या घटनेत पहाटेच्या गाढ झोपेतून लोक गुदमरून जागे झाले होते. वडोल गाव, रेणुका सोसायटी, लासी पाडा या वालधुनी नदीनजिकच्या भागात वायुची तीव्रता अधिक होती. पण जवळजवळ २ किमी परिसरातील लोकांना त्रास झाल्याचं दिसलं. सरकारी मध्यवर्ती रूग्णालय आणि शिवनेरी हॉस्पिटलसारखी खाजगी रुग्णालये मिळून अंदाजे ४०० जणांनी उपचार घेतले. डोकेदुखी, उलट्या, मळमळ, पोटदुखी, चक्कर या लक्षणांनी लोक हैराण झाले होते. नेमकं कारण माहित नसल्याने लोक भयभीत होते. काही शाळा लवकर सोडण्यात आल्या.

फक्त पोलिस आणि सरकारी यंत्रणांचे नाक भ्रष्टाचाराने चोंदलेले असल्याने त्यांच्यापर्यंतच विषारी वायुचा वास पोचला नव्हता आणि आजही पोचत नाहीये.

पोलिस स्वत: गैरप्रकारात सहभागी असल्याने पोलिसांत तक्रार करून उपयोग नव्हता. टैंकर माफीयांनी या पध्दतीने कंपन्यांचे केमिकल विनाप्रक्रिया मोठ्या नाल्यात सोडल्याच्या घटना नवीन नाहीत. उल्हासनगरात शांतीनगर येथेही हे अधुनमधून घडतं. पोलिस आणि राजकीय नेते यांच्या वरदहस्ताशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व या गैरप्रकारात सामील समाजकंटक रासुकासारख्या कायद्याखाली स्थानबध्द व्हायला हवेत. राज्य सरकारने कारणे-बहाणे न सांगता संबंधितांविरोधात कायद्याचा बडगा दाखवायला हवा. अशा घटनांच्या पुनरावृत्तीची जबाबदारी राज्य सरकारवरच टाकायला हवी…असं मत कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी व्यक्त केलंय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!