उल्हासनगरातील गोलमैदान येथील महानगरपालिकेच्या सभागृहाला सिंधी कोयल भगवंती नावानी यांचं नाव द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव भारत राजवानी यांनी केली आहे. राजवानी यांनी तत्संदर्भातील निवेदन मनपा आयुक्त अजीज शेख यांना प्रत्यक्ष भेट घेऊन दिलं असून आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती राजवानी यांनी दिली आहे.
सिंधी कला व संगीतात भगवंती नावानी यांचं मोठं योगदान आहे. सिंधी समाजात गायली जाणारी लाडा ही लग्नंगीतं बहुतांशी भगवंती नावानी यांचीच आहेत. सिंधी व पंजाबी समाजात श्रद्धेने ऐकला जाणारा सुखमणी पाठ भगवंती नावानी यांच्या आवाजातील आहे. सिंधी सिनेमासाठीही नावानी यांनी पार्श्वगायन केलंय तर सिंधुओं जे किनारे सारख्या चित्रपटांतून त्यांनी अभिनयसुद्धा केलाय. सिंधीकोयल म्हणून त्या ओळखल्या जातात.
शहरातील शहीद जनरल अरुणकुमार वैद्य टाऊन हाॅलमधील प्रेक्षागृहालाही 'संगीताचार्य मास्टर चंदर ऑडिटोरिअम' असं नाव देण्याची मागणी भारत राजवानी यांनी केली आहे. फाळणीचं दु:ख आणि वेदना मांडणारी कितीतरी गीतं मास्टर चंदर यांनी गायलीत. जी सिंधी समाजाला आजही अस्वस्थ करतात.
पाकिस्तानात जन्म झालेल्या भगवंती नावानी फाळणीमुळे भारतात आल्या तेव्हा अवघ्या ७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर उल्हासनगरातील गोलमैदान येथे भगवंती नावानी मंच उभारण्यात आला होता. तिथे अनेक कलासंगीताचे कार्यक्रम व्हायचे. हळुहळू त्या मंचाला अवकळा आली. त्या जागेत महानगरपालिकेने प्रभाग कार्यालय सुरू केलं. जलकुंभ उभारल्याने समोरील मोकळं मैदानही आकाराने कमी झालंय. हे एका कलावंताचं अवमूल्यन असल्याची प्रतिक्रिया भारत राजवानी यांनी दिली आहे.

गोलमैदानातच साधू वासवानी पुतळ्याजवळ महानगरपालिकेचे छोटेखानी सभागृह आहे. त्या सभागृहाला भगवंती नावानी यांचं नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, अशी भावना राजवानी यांनी व्यक्त केली आहे. केवळ नामकरणावर थांबणार नाही तर ती वास्तू सिंधीकोयल भगवंती नावानी म्युझिक एन्ड कल्चरल सेंटर म्हणून विकसित व्हावी, यासाठी संपूर्ण ताकद लावणार असल्याचंही राजवानी म्हटलं आहे.
सध्या महानगरपालिकेच्या या सभागृहात अनेक सांगितिक कार्यक्रम सातत्याने होत असतात. भगवंती नावानी यांचं नाव या सभागृहाला दिलं गेल्यास चारचांद लागतील, अशी प्रतिक्रिया मीडिया मेलडी कराओके क्लबचे संयोजक राज असरोंडकर यांनी दिली आहे.