वटसावित्रीची कथा येथे सांगण्याची काही गरज आहे असे मला तरी वाटत नाही. इतकी ती भारतीय मनोमनी रुजली आहे.
सावित्रीचा पती जिवंत असतो, विधिलिखिताप्रमाणे (?) त्याचा जीवनकाल संपणार असतो, त्यावेळी सावित्री अनेक व्रत व पूजाअर्चा करते, पण अखेर विधीलिखितच ते ! यम महाराज तिच्या पतीचे प्राण घेऊन जातात. अर्थातच आता ती विधवा असते.
त्यानंतर ती यमाचा पाठलाग करते, अनेक प्रश्नोत्तरानंतर ती यमदेवांकडून काही वर मिळवते आणि आपल्या पतीला नवजीवन मिळवून देते. इथपर्यंत कथा आपल्या सगळ्यांनाच माहित असते.

ही कथा स्कंद पुराणात असल्याचे उल्लेख आहेत. पुराणकथा असल्याने ती रुपकं, प्रतिकं यांच्या माध्यमातून सांगितलेली बोधकथा अशा अर्थाने खरे तर समजून घ्यायला किंवा समजावून द्यायला हवी होती, अशी कथाकारांची अपेक्षा असावी असे मला तरी वाटते.
पण मूळ मुद्दा असा की सौभाग्यवतींचे म्हणून समजले जाणारे आणि पूजले जाणारे हे व्रत व त्याची कथा सांगते की सावित्री सौभाग्यवती असताना तिने केलेल्या व्रतांनी तिच्या पतीचे प्राण वाचवले नसून ती विधवा झाल्यानंतर तिने दिलेल्या खंबीर संकल्प, लढा, पाठपुरावा व पाठलागच म्हणा ना, यातून तिने आपल्या मृत पतीचे प्राण परत मिळवले.
याअर्थी खरेतर हा सण विधवांच्या शक्तीचे प्रतिक म्हणून विधवांच्या सन्मानार्थ साजरा करायला हवा... तोही सौभाग्यवतींनी !
असे न होता विधवांना दूर ठेवून सौभाग्यवतींच्या मिरवण्यासाठी अन पतीनिष्ठा व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो हे थोडेसे अनाकलनीय वाटते.
आज हेरवाडसारख्या एका गावाने विधवा विद्रुपीकरणाला मूठमाती देण्याचा निर्णय व ठराव करून एक आदर्श समाजासमोर ठेवलाय. महाराष्ट्र शासनानेही त्याचे कौतुक करत अन्य ग्रामपंचायतींनीही तसे अनुकरण करावे असा आदेश दिलाय. ही प्रशंसनीय बाब आहे.

अशावेळी विधवांना समाजात मानाने जगता यावे म्हणून सौभाग्यवतींनी पुढाकार घेऊन वटसावित्रीचा दिवस त्यांच्या सन्मानार्थ साजरा करावा हा विचार जरी क्रांतीकारी पाऊल वाटत असला तरी अशक्य निश्चितच नाही.
फक्त दरवेळी "महाराष्ट्र पुरोगामी विचारवंतांची व संताची भूमी आहे !" हे वाक्य फेकून तसे आचरण न करणारे आम्ही धड धर्माच्या अपेक्षालाही लायक ठरत नाही आणि या पुरोगामीत्वालाही.
एकीकडे बहुतांशी धर्म हे ग्रंथातील पुरातन आदेशांना चिकटून असताना हिंदूधर्म मात्र नेहमीच कालानुसार स्वत:त अनुरूप बदल करत "परिवर्तन ही संसार का नियम है" हे मानणारा आहे. हे अनेक उदाहरणांतून आपण पाहात आलोय.
एवढेच काय तर वेदसुद्धा म्हणतात की
आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरीतास उद्भिदः। देवा नोयथा सदमिद् वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवेदिवे॥
सुदेश मालवणकर
साहित्यिक / अभ्यासक /व्यावसायिक
दापोली ( रत्नागिरी )
sudeshmalvankar1@gmail.com
S s
अप्रतिम,
कर्ते सुधारक💐