दोन समाज पेटविणार्‍यांची जात कोणती ?

दोन समाज पेटविणार्‍यांची जात कोणती ?

दोन समाज पेटविणार्‍यांची जात कोणती ?

महावीर , चार्वाक , बसव आण्णा ,  महात्मा गांधी  यांच्या  शांतता व अहिंसेचा संदेश रुजलेला हा देश. विभिन्न धर्माच्या या देशात धर्मसहिष्णुता का गोठत चाललीय ?  महापुरुषांच्या चरित्र आणि पुतळे , मग ते कुणाचेही असो, त्यांच्या विटंबनांंच्या घटना का घडतात ? अलीकडेच समाज आणि समाजमाध्यमातुन त्यांचे प्रमाण का वाढू लागलंय ? समाजमन इतकं उथळ आणि हिंसक होत चाललंय ? माँब लिचिंगच्या या दांडग्या प्रवाहात समाजाला कायद्याची भीतीच उरली नाही का ?  की कायदे बनवणारे आणि त्यांची अंमलबजावणी करणारेच याकडे मुद्दाम कानाडोळा करतायेत? दोन समाजांमध्ये विषमतेचे युद्ध पेटवून ते स्वतःचं राजकारण टिकवतायेत का ?  अशा अनेक प्रश्नांनी आज गुदमरायला होतंय.

नुकतंच तामिळनाडूत एका अपघाताच्या कारणावरून दोन समुदाय आपसात भिडले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही समुदायातील ३७ जणांना अटक केलीय. कारण होतं वेदारण्यम येथे एका कारचालकाने एका दलिताला धडक दिली. त्याच्या पायाला गंंभीर दुखापत झाली.  अपघातानंतर कारचालकाने वेदारण्यम येथील पोलीस ठाणे गाठले. जखमी व्यक्तीला वेदारण्यम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दरम्यान कारचालकाने मागे झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी हे कृत्य केल्याची अफवा सर्वत्र पसरली. शिघ्रकोपी दलित समाज पुुन्हा एकदा पेटून उठला. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या समुदायातील संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी झाली. बाहेर जमलेल्या लोकांनी कारचालकाला बाहेर आणण्याची मागणी केली. यावेळी जमावाने पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक, जाळपोळ केली.

या घटनेची माहिती कार चालकाच्या समुदायातील लोकांना कळल्यानंतर कारचालकाचे समर्थकही पोलीस ठाण्याबाहेर जमले. हा प्रक्षुब्ध जमाव अचानक बस स्थानक रस्त्याकडे वळला. या घटनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची तोडफोड केली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. यातील बेभान व्हिडीओ , या उन्मादित जमावाचे दात ओठ खाऊन पुतळ्यावर तुटून पडणे आणि या कहराचे  चित्रीकरण करणाऱ्यांपैकी एकाचे ”  व्हेरी गुड व्हेरी गुड ” या कानावर पडणार्‍या शब्दांनी सुन्न करून टाकलंय.

खरंतर अशा पेटलेल्या परिस्थितीचा समाजकंटक पुरेपूर फायदा घेतात. बहुतेकदा तर पडदयामाागचे सुत्रधारच तेच लोक असतात. परंतु , दंगल घडविणारा कधीच पडद्यावर येत नसतो.  तरीही त्याचा हेतू १००%  यशस्वी झालेला असतो. हे उधळ , अस्थिर , आणि भाबड्या समाजाच्या कधीच लक्षात येत नाही. दोन समाजात तेढ निर्माण करुन आपली पोळी भाजणार्‍या समाजकंटकाची जात खरं तर या देशात अजुनही ठरलेली नाही.

११ जुलै ११९७ ची घाटकोपर रमाबाई नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची  विटंबना , उत्तर प्रदेशच्या बदायु मधील बाबासाहेबांच्या पुतळ्यांचे केलेले भगवीकरण , बंगालमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यावर फेकलेली शाई यानंतर अनेकदा समाज बेभान झालाय. खैरलांजी- कोपर्डी प्रकरण यानंतर अशांततेचे आगडोंब उसळलेत. कधी जयभीम म्हटलं म्हणून , तर कधी भीम गीताची रिंगटोन ठेवली म्हणून , तर कधी नवरदेव देवळात गेला म्हणून अगदी माणसं ठेचून मारणार्‍यांपर्यत मजल जाणाऱ्या या राक्षसी वृत्तीची जात तरी कोणती समजावी ?

पुतळा विटंबना असो की , सोशल मिडिया वरुन झालेली महापुरुषांची बदनामी. आजपर्यंत अशा अनेक उपद्रव माजविणाऱ्यांना कधीच शिक्षा झाली नाही. उलट अशा धगधगत्या वातावरणात स्वतः च्या मर्जीतला दलित समाजाचाच अधिकारी परिस्थिती नियंत्रणासाठी नेमला जातो आणि कधी भावुकपणे हा विरोध निवळला जातो, तर कधी रमाबाई हत्याकांड घडवून चिरडलाही जातोय. अर्थातच, अशा वेळी कायदारक्षकांचीही मुकसंमती असतेच.

ज्या डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता,  एकट्याने याच देशात मानवमुक्तीचा परिवर्तन लढा जिंकलाय. कधी कधी त्या बाबासाहेबांचे अनुयायीही हिंसक व  ज्वलनशील असू शकतात का.  हाही  प्रश्न निर्माण होतोय .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांंना त्यांचा अनुयायी हा शिक्षित , चिंतनशील , व त्यांच्या समान समाजोन्नती प्रिय अपेक्षित होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांतीविचार संकुचित मुळीच नाही . तो जगतमान्य झालाय. त्यांचे पुतळे तोडून तो संपणारही नाही. ” पुतळे तोडो ” या एककलमी साचलेपणाच्या कार्यक्रमाने बाबासाहेब कधीच संपणार नाहीत. उलट ते अधिक विशाल व चिरकालाकरीता व्यापक होतायेत. सर्व हितवादी भारताच्या कायद्याला  पाकिस्तान व तालिबानी कायद्याच्या बरोबरीला बसवू पाहणाऱ्या समुदायाची जात कोणतीच असु शकत नाही. अशा विध्वंसक प्रवृत्तीला जात नाही,  धर्म नाही. गैरकृत्यातून केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड होत नसून , लोकशाहीची तोडफोड होतेय. यामुळे देशाची जागतिक पातळीवर देशप्रतिष्ठा डागाळतेय. राष्ट्र निर्माणचा वेग मंदावतोय.

 

——-प्रफुल केदारे-—–

लेखक पत्रकार आहेत व कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक आहेत.

kedarepraful@gmail.com

लेखाखालील प्रतिक्रिया रकान्यात आपलं मत जरूर नोंदवा.

 

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!