केंद्र व राज्य शासनाच्या करोडोंच्या योजनांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधली पोस्टिंग सध्या भलतीच 'महाग' झालेली आहे. शासनाच्या विविध विभागातले 'ऐपत' असलेले अधिकारी आर्थिक व राजकीय पाठबळाच्या जोरावर नगरविकास विभागामार्फत स्थानिक स्वराज्य संस्था व इतर मोक्याच्या ठिकाणी वर्णी लावत आहेत.
याच मार्गाने पशूसंवर्धन विभागातले अधिकारी जनावरं वाऱ्यावर सोडून नगरपालिका/महापालिकांत माणसांचं आरोग्य पाहू लागले होते. गायींमधील लम्पी रोगाच्या प्रादुर्भावानंतर या अधिकाऱ्यांना पशूसंवर्धन विभागाने माघारी बोलावलंय ; त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था हाताळण्यासाठी माणसांचे डॉक्टर्स नियुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पशूसंवर्धन विभागातले डॉ. श्रीराम सिताराम पवार नवी मुंबई महानगरपालिकेत, डॉ. बाबासाहेब राजळे नवी मुंबई महानगरपालिकेत, डॉ. किशोर शांताराम गवस वसई-विरार महानगरपालिकेत, डॉ. सुभाष जाधव उल्हासनगर महानगरपालिकेत, डॉ. पंजाब शिवहरी नांदेड महानगरपालिकेत, डॉ. वैभव नंदाभाऊ पवार एमएमआरडीएत, डॉ. सत्येंद्रनाथ ब्रह्मदेव बार्टीत कार्यरत होते. या सर्व अधिकाऱ्यांना पशूसंवर्धन विभागात माघारी बोलावण्यात आलंय.
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या २८ जिल्हयामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला असून सदर प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्राण्यांमधील संक्रामक सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण २००९ मधील प्रदान केलेल्या अधिकारांनुसार महाराष्ट्र राज्य लम्पी चर्मरोगाबाबतीत "नियंत्रित क्षेत्र" म्हणून घोषित केलेले आहे.
सदर लम्पी चर्मरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याच्यादृष्टीने मोठ्याप्रमाणामध्ये लसीकरण मोहिम तथा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. या परिस्थितीत तांत्रिक मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असल्याची बाब विचारात घेऊन आयुक्त पशुसंवर्धन यांनी पशुसंवर्धन विभागातील प्रतिनियुक्तीने इतर विभागातील विविध कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीच्या सेवा लम्पी चर्मरोगाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये परत घेण्याबाबत शासनाकडे विनंती केलेली होती.