पीपल्सचे विश्वस्त तथा माजी उपाध्यक्ष विनायक प्रधान यांचं निधन

पीपल्सचे विश्वस्त  तथा माजी उपाध्यक्ष विनायक प्रधान यांचं निधन

पीपल्सचे विश्वस्त तथा माजी उपाध्यक्ष विनायक प्रधान यांचं निधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन विद्यार्थ्यांसाठी ८ जूलै,१९४५ साली उभ्या केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचे माजी उपाध्यक्ष आणि विश्वस्त विनायक म प्रधान यांचे अलीकडेच निधन झाले. प्रधान हे संस्थेचे अविभाज्य अंग होते. त्यांचे निधन हे दुर्दैवी आहे . पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जडणघडणीत त्यांचे महत्त्वाचे काम आहे. परंतु, संस्थेतील गटबाजी, राजकीय हस्तक्षेपानंतरही त्यांनी संस्थेस हितावह व संस्थेची पत सुधारणारे अनेक निर्णय अंमलात आणले. त्यांची उणीव भरून निघणारी नाहीच..पण त्यांनी केलेल्या संस्थेतील कामामुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अशी प्रतिक्रिया पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिली.

२७ जुलै २०२२ रोजी त्यांच्या ठाणे, टेंभीनाका येथील राहत्या घरी वयाच्या ८३ व्या वर्षी विनायक प्रधान यांची प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळी ३१ जुलै २०२२ रोजी ठाणे टेंभीनाका येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी डॉ सुधा प्रधान व ४ मुली असा परिवार आहे.

विनायक प्रधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी व पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासून महत्वाची भुमिका असणारे म. भ. चिटणीस यांचे जावई होते..प्रधान हे पेशाने स्थापत्य विशारद असून लंडनमध्ये स्थायिक होते. चिटणीस यांच्या आग्रहाखातर विनायक प्रधान हे लंडनमधून भारतात संस्थेच्या कामकाजात मदत करण्यासाठी आले होते. २४ सप्टेंबर १९३९ रोजी जन्मलेले प्रधान यांनी या शैक्षणिक संस्थेस २००७ ते २०२२ दरम्यान आपल्या कायद्याचा अभ्यास व प्रशासकीय प्रगल्भ ज्ञान यांचा उपयोग करुन दिला. त्यांची मुद्देसुद लिखाण मांडणी ही वाखाणण्याजोगी होती.

डॉ बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे ११ वर्षे संस्थापक अध्यक्ष होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर म भि चिटणीस यांनी या संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासून प्रयत्न केले. १९८३ साली चिटणीस यांच्या निधनानंतर त्यांची लेक डॉ. सुधा व जावई विनायक महादेव प्रधान यांची २००७ साली संस्थेच्या नियामक मंडळावर निवड झाली होती. गेली १५ वर्षे प्रधान यांनी संस्थेचे अतिशय चांगले शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पाहिले. यशवंत ( भैय्यासाहेब) आंबेडकर यांच्या निधनानंतर आंबेडकर कुटुंबीयांना संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन व मदत करण्यासाठी प्रधान यांचे मोलाचे योगदान आहे. याप्रसंगी, त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी अँड. संघराज रुपवते , प्राचार्य यु. एम म्हस्के, विद्यार्थी नेते चंद्रशेखर कांबळे, विजय भटकर, आणि संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!