जाहिरातील स्त्रियांनी कपाळावर टिकली लावली नाही, एवढ्यावरून रान उठवत संबंधित उत्पादनांवर बहिष्काराची भाषा करणाऱ्यांविरोधात समाजमाध्यमात चांगलाच आवाज उठवला गेला, तर अशा विरोधकांना हिंदुविरोधी, देशविरोधी ठरवेपर्यंत धर्मांध झुंडींची मजल गेली. त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय, डोंबिवलीतील टॅक्स कन्सल्टंट राजेश कदम यांनी.
एका फुटकळ हॅशटॅगला विरोध केला म्हणून तुम्ही लगेच हिंदूविरोधी आहात वगैरे प्रचार केला जातोय. जन्माने मिळालेला धर्म, तो आहे तसा पाळावा हा या धर्माचाच आग्रह नाही. धर्ममार्तंडांची दडपशाही आम्हाला मान्य नाही. आमचे सण परंपरा आम्ही जपूच. पण त्यावर तुमचा वरचष्मा नकोय आम्हाला.

बिंदीसारखे हॅशटॅग, त्याच त्याच पोस्ट सतत तुमच्या डोक्यात मारुन एक माईंडसेट तयार केलं जातं. कुंकू टिकल्या बिंदी आमच्या आया बहिणी रोज वापरतातच. ती पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा आहे. पण वेस्टर्न आऊट फिट्स, जीन्स टिशर्ट या पेहेरावावर ती नक्कीच शोभून दिसत नाही. ती लावायची की नाही लावायची हा त्या त्या भगिनीचा वैयक्तिक विषय आहे. एका ठराविक वस्त्र परिधानावर ती नाही वापरली तर लगेच धर्म भ्रष्ट होत नाही.
जेव्हा एखादी जाहिरात तयार होते, तेव्हा त्या मागे एका क्रिएटिव्ह टिमचा खूप मोठा अभ्यास असतो. आपलं प्रोडक्ट उठावदार पद्धतीने समोर कसं येईल हे सर्वात महत्वाचं असतं. त्यासाठी त्या पद्धतीने रंगसंगती, मॉडेलचा मेकअप या गोष्टी पाहिल्या जातात.

काही सेकंदाच्या जाहिरातीमागेही अपार मेहनत असते. एका ठराविक वेषभूषेत मॉडेल कशी दिसेल, याचाही विविध पद्धतीने अभ्यास होतो. टिकली लावा तरच तुमचं प्रोडक्ट घेऊ हे सांगणं सोप्प आहे. पण जाहिरात एजन्सी असल्या मागण्या फाट्यावर मारते. त्यांना त्यांच्या प्रोडक्ट शिवाय काहीच महत्वाचं नसतं आणि हाच खरं तर त्यांचा व्यवसायिक धर्म, जो ते व्यवस्थित पाळतात.
आता या हॅशटॅग्सचा मारा करुन तुमच्या डोक्यात तो प्रोग्राम अशा पद्धतीने फिक्स केला जातो की पूर्वांपार चालत आलेल्या जाहिरातीत बिंदी वाली मॉडेल बघितली की तुम्हाला वाटतं की हॅशटॅगमुळे हा बदल झाला. हे पुढे या थराला जाऊन पोचेल की या मुर्खांना घरी बायकोच्या कपाळावरच कुंकू बघूनही वाटेल की अरे हॅशटॅगमुळेच ही कुंकू लावायला लागली.
तुम्ही यांच्या मुर्खपणाला विरोध केलात की तुम्ही धर्मविरोधी. भाजपने राम मंदीर विषय स्वताच्या स्वर्थासाठी वापरला यावर टिका केली की चित्र असं उभं केलं जातं की तुम्हाला मंदीरच नकोय, तुम्ही रामाची चेष्टा करताय वगैरे. सैनिकांच एअरलिफ्ट का नाही केलं विचारलं की तुम्ही देशद्रोही. मॉब लिचिंगला विरोध केलात तर तुम्ही मुस्लिम प्रेमी आणि हिंदूद्रोही. हेच हेच परत परत ठासत राहून रिकाम्या मेंदूंच प्रोग्रामिंग केलं गेलय.
यांच्या मुर्खपणाला विरोध म्हणजे देशविरोध किंवा हिंदूविरोध नाही हे एकदा डोक्यात पक्कं करुन घ्या. हे म्हणजे धर्म नाहीत, हे म्हणजे देशभक्ती नाही. हे फक्त धर्म आणि देशभक्तीचे व्यापारी आहेत. हे दोन प्रॉडक्ट विकून नफा कमावणारे आणि इथे सोशलवर मुर्खांची फौज तयार करणारी प्यादी. आता तुम्ही ठरवायचय यांच्या अजेंडात भरडलं जायचं की आपली देशभक्ती आणि धर्म जागरुकपणे सांभाळायचे.
हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि तीच आपली ताकद आहे. इथे प्रत्येक धर्माला आदर मिळतो. हे वातावरण असंच ठेवणं यातच आपली प्रगती आहे आणि यातच सर्वांच भलं आहे. धर्म चार भिंतींच्या आतच हवा, बाहेर समाजात सद्भावना, बंधुत्वभाव, देशप्रेम, आपल्या कुटूंबासोबतच देशासाठी अपार कष्ट करण्याची तयारी, आपल्या सोबतच आपल्या भोवतालच्या समाजाची, गावाची, राज्याची, देशाची उन्नती कशी होईल, हे पाहणं हाच आपला धर्म. चार भिंतींबाहेर तो एकच धर्म असावा.
राजेश कदम
ॲडवोकेट आणि टॅक्स कन्सल्टंट