आपणच शोधायचं आपल्या आनंदाचं ‘कारण’ !

आपणच शोधायचं आपल्या आनंदाचं ‘कारण’ !

आपणच शोधायचं आपल्या आनंदाचं ‘कारण’ !

" राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ,ती सर्व प्राप्त झाली , या झोपडीत माझ्या ." ही संत तुकडोजी महाराजांची अप्रतिम रचना आज वाचली. एक विचार मनात क्षणभर आला की जीवनात सर्व मिळाले तरी एका ठिकाणी आयुष्य थांबल्यासारखेच वाटतं कारण हा आनंद क्षणिक असतो. पाहिजे असलेली वस्तू मिळाली की तो संपणार असतो. पुन्हा नव्याने शोध सुरू होतो आनंदाचा आणि सुखाचा .मग प्रश्न पडतो, आयुष्यभराचा आनंद व समाधान नक्की कशावर अवलंबून असते ?

पुन्हा पुन्हा जीवनात येणारी दुखं:,काळजी, चिंता यांचा शिरकाव मनात आणि जीवनात झाला कि आनंद संपतो. वस्तू रूपाने मिळालेला आनंदसुध्दा टिकत नाही. मग पुन्हा नव्याने चक्र सुरू होते खऱ्या आनंदाच्या आणि समाधानाच्या शोधाचं.

प्रत्येक जण आयुष्यभर याच प्रवासात आणि याच शोधात धावत असतो. खरा आनंद मनाला झाला तरच प्रत्येकजण सुखी होतो . तो म्हणजे "आत्मिक आनंद ".त्याला पैशाची ,वस्तूची गरज नसते .हा "आत्मिक आनंद "कसा मिळू शकतो ? हा ना वयावर अवलंबून असतो ना परिस्थितीवर कारण परिस्थिती गरीब असूनही लोक खूप आनंदी असतात. गाडी ,बंगला व श्रीमंती असूनही , मानसन्मान मिळूनही काही लोक दुःखी असतातच.

मिळालेल्या जीवनाचा त्यातील प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घेता यायला हवा. त्यासाठी आपण आपली मनस्थिती चांगली ठेवणे महत्त्वाचे आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे 'सकारात्मक ' दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन विकसित केला पाहिजे . आपणच शोधायचं आपल्या आनंदाचं 'कारण'.

आपले जीवन आनंदी ठेवण्यासाठी आधी स्वतःला समजून घेतले पाहिजे. 'स्व'च्या कक्षा रुंदावल्या कि येणारे 'आत्मभान' हे निश्चितच स्वतः ला कणखर सिध्द करणारे ठरते. स्वतःवर प्रेम केले पाहिजे. उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी आशा घेऊन उगवतो, म्हणून काल काय घडलं ? याचा विचार करण्यापेक्षा, मला आज काय नवीन करता येईल असा सकारात्मक विचार केला पाहिजे.

रोज नवा दिवस नवीन संधी मानून दिवसाचा प्रत्येक क्षण छान जगण्याचा प्रयत्न करायचा. एक नवी ऊर्जा नवे क्षितीज आपली वाट पहात आहे .असं समजून सज्ज होऊया ! दिवसभराच्या प्रत्येक क्षणाला भरभरून दाद देऊया !काही बरे वाईट प्रसंग आलेच तर त्याला खंबीरपणे सामोरे जाऊया.

दिवसभरातील कडू-गोड आठवणींची एक वार उजळणी करा. कटू प्रसंग लगेच विसरून जा. ज्यांच्यामुळे ते आले त्यांना लगेच माफ करा .खरतर बोलण्याइतकं सोपं नसतं ते ,पण आपल्याला दुखावण्याचा हक्क कोणालाही मुळीच द्यायचा नाही, म्हणून हे करून पाहायचं.

कोणतेही ओझं मनावर दुसऱ्या दिवशी कॅरी फॉरवर्ड करू नका. चेहऱ्यावर छान हास्य ठेवून समाधानाने झोप आली म्हणजे आपण खरोखर नशिबवान आहोत हे मात्र नक्की .चला तर करुया सुरुवात आनंदाने जगण्याची ! स्वतःचा आनंद जपण्याची.!

 

 

लीना तांबे

लेखिका शिक्षिका आहेत.

leena.adhalrao.tambe@gmail.com

MediaBharatNews

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!